युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम मध्ये जागतिक तोडीची सहा स्क्वाश कोर्ट, किरेन रिजीजू यांच्या उपस्थितीत परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी केली पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2020 8:25PM by PIB Mumbai
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम मध्ये सहा स्क्वाश कोर्टची,केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली. मुख्य अतिथी क्रीडा प्रेमी डॉ एस जयशंकर यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. भारताकडे प्रचंड क्रीडा कौशल्य आहे आणि या कौशल्याला पैलू पाडण्यासाठी उत्साही प्रशिक्षकही आहेत.मात्र अभाव होता तो यासाठीच्या सुयोग्य कोर्ट्सचा असे सांगून ही सुविधा आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपण क्रीडाविश्वाचे लोकशाहीकरण केले असून ही कोणाची मक्तेदारी राहता कामा नये.ज्या क्रीडा प्रकारात आपण उत्तम कामगिरी केली ती त्याचे लोकशाहीकरण केल्यामुळे शक्य झाल्याचेत्यांनी सांगितले.स्क्वाश संदर्भात हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे असे ते म्हणाले.
750 चौरस मीटर वरच्या या प्रकल्पासाठीच्या 5.52 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली असून तो 6 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये 6 एकल स्क्वाश कोर्ट असून 3 कोर्ट्सचे सरकत्या भिंतीचा उपयोग करत दुहेरीसाठीच्या कोर्ट मध्ये रुपांतर करता येणार आहे.
या नव्या सुविधेमुळे जागतिक तोडीचे चॅम्पियन घडतील असा विश्वास क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी व्यक्त केला. ही सहा कोर्ट्स केवळ जागतिक तोडीची राहतील असे नव्हे तर या सर्वोत्तम केंद्रात जागतिक तोडीचे विजेते घडतील. उदयोन्मुख होतकरू खेळाडू या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सुविधांच्या शोधात खेळाडूना राहायला लागता कामा नये असे सांगून खेळाडूंना सुविधा आम्ही पुरवू असे त्यांनी सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्क्वाश हा भारतासाठी यशस्वी क्रीडा प्रकार राहीला असून सौरव घोशाल, दीपिका पल्लीकल आणि ज्योत्स्ना चिनप्पा यांनी देशासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महा संचालक संदीप प्रधान यांच्या सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.




***
G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1681252)
आगंतुक पटल : 159