दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ‘डाक पे’ या डिजिटल पेमेंट सेवेची सुरुवात, शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचे लक्ष्य


ऑनलाईन पेमेंट आणि घरपोच आर्थिक सेवांच्या रुपाने सेवा देणारी ‘डाक पे’ ही सेवा दुप्पट शक्तिशाली सेवा – रवी शंकर प्रसाद

Posted On: 15 DEC 2020 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2020


टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक(आयपीपीबी) यांनी आज डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या ‘डाक पे’ या नव्या डिजिटल पेमेंट अ‍ॅपचे एका व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे उद्घाटन केले. देशातील शेवटच्या घटकाला आर्थिक समावेशनाचा  लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. डाक पे हे केवळ एक डिजिटल पेमेंट अ‍ॅप नसून देशभरात पसरलेल्या विश्वासार्ह टपाल (डाक) जाळ्याच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी इंडिया पोस्ट आणि आयपीपीबी कडून दिल्या जाणाऱ्या  डिजिटल आर्थिक आणि सहाय्यकारी बँकिंग सेवांचा एकीकृत संच आहे.  मग त्यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तींना पैसे पाठवण्याच्या सेवा ( डोमेस्टिक मनी ट्रान्स्फर- डीएमटी) असोत, क्यू आर कोड स्कॅन करणे आणि  सेवांना/ व्यापाऱ्यांना डिजिटली पेमेंट करणे (व्हर्चुअल डेबिट कार्ड आणि यूपीआयसह), बायोमेट्रिक्सद्वारे कॅशलेस देवाणघेवाणीची व्यवस्था असो, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आंतरबँकिंग वापराची सुविधा असो आणि बिले चुकती करण्याची सुविधा असो या सर्वांचा यात समावेश आहे.

या अ‍ॅपच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी कोविड-19च्या काळात लोकांना एईपीएसच्या माध्यमातून घरपोच आर्थिक सुविधा देऊन बँकचे ग्राहक नसलेल्या आणि बँक सेवा न परवडणाऱ्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. विविध टपाल सेवांच्या मदतीने डिजिटल माध्यमातून आणि प्रत्यक्ष उपस्थिती द्वारे लॉकडाऊनच्या काळात देशाची सेवा करून भारतीय टपाल खात्याने काळाच्या कसोटीवर आपले महत्त्व सिद्ध केले आहे, असे रवीशंकर प्रसाद यांनी या अ‍ॅपचे उद्घाटन करताना सांगितले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याच्या भारतीय टपाल विभागाच्या वारशामध्ये डाक पे च्या प्रारंभामुळे भर पडली आहे, असे ते म्हणाले. या नावीन्यपूर्ण सेवेमुळे केवळ बँकिंग सेवा आणि टपाल उत्पादनेच ऑनलाईन उपलब्ध होणार नसून, एखाद्याला आता टपाल विभागाच्या आर्थिक सेवा घरपोच मागवण्याची एक आगळीवेगळी संकल्पना देखील प्रत्यक्षात उतरवता येणार आहे. टपाल विभागाच्या देशभर पसरलेल्या जाळ्याच्या जोडीने ऑनलाईन पेमेंट आणि घरपोच आर्थिक सेवांच्या रुपाने सेवा देणारी  डाक पे ही सेवा दुप्पट शक्तिशाली सेवा ठरेल आणि आर्थिक समावेशनाचे आणि आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक मोठी झेप ठरेल, असा ठाम विश्वास आपल्याला वाटत असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले.

सर्व ग्राहकांना बँकिंग सेवा आणि पेमेंट उत्पादने आणि सेवा अ‍ॅपच्या किंवा विश्वासार्ह पोस्टमनच्या मदतीने सहाय्यकारी सेवा देणारी डाक पे ही एक अतिशय सुलभ पेमेंट सुविधा आहे, असे आयपीपीबी बोर्डाचे अध्यक्ष आणि टपाल सचिव प्रदीप्ता कुमार बिसोई यांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आलेली डाक पे ही खऱ्या अर्थाने एक भारतीय सुविधा आहे, असे ते म्हणाले.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680836) Visitor Counter : 270