पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा अंतराळ क्षेत्रातील उद्योग, स्टार्ट अप्स आणि शैक्षणिक समुदायाशी संवाद


अंतराळ क्षेत्रातील सुधारणा केवळ व्यवसायसुलभतेपुरत्या मर्यादित नाहीत, प्रत्येक टप्प्यावर मदत उपलब्ध केली जात आहे- पंतप्रधान

देश लवकरच अंतराळ सामग्री उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनेल, अशी पंतप्रधानांना आशा

अंतराळ कार्यक्रमाचे फायदे गरिबातील गरिबांपर्यत पोहोचावेत यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत- पंतप्रधान

ज्या प्रकारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय गुणवत्तेने जगात प्रसिद्धी मिळवली आहे, त्याच प्रकारे अंतराळ क्षेत्रातही चित्र दिसेल- पंतप्रधान

Posted On: 14 DEC 2020 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंतराळ क्षेत्रातील प्रमुख उद्योग, स्टार्ट अप्स आणि शैक्षणिक समुदायांना त्यांच्या अंतराळविषयक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

जून 2020 मध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळ क्षेत्र खुले करण्याचा आणि सर्व प्रकारच्या अंतराळ विषयक कामांमध्ये भारतीय खासगी क्षेत्राला सहभागी होण्याची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायजेशन सेंटर (आयएन- स्पेस) च्या निर्मितीमुळे या सुधारणा खासगी कंपन्या आणि स्टार्ट अप्सना या क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यापाठोपाठ अनेक उपक्रमांनी अंतराळ विभागांतर्गत आयएन- स्पेस कडे प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांमध्ये बहुउपग्रह संयोजन, लघु उपग्रह प्रक्षेपण वाहने, भू स्थानक, जिओस्पॅशियल सेवा, प्रॉपल्शन प्रणाली आणि ऍप्लिकेश प्रॉडक्ट्स अशा अनेक प्रकारच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

 

अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता खुली करणे

अंतराळ क्षेत्रातील भारताच्या क्षमतेचा उलगडा करताना पंतप्रधानांनी या क्षेत्रात सहभागी होणाऱ्यांनी आतापर्यंतच्या अनुभवांबाबतचे अभिप्राय कळवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील क्षमतेचा वापर खुला करण्याच्या निर्णयामुळे या क्षेत्रातील सार्वजनिक खासगी भागीदारीचे एक नवे युग सुरू झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या क्षेत्रात सहभागी होणाऱ्यांना सरकारकडून संपूर्ण आणि मनापासून पाठबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकारच्या धोरणांमधील पारदर्शकता आणि व्यावसायिक वृत्तीबरोबरच निर्णय प्रक्रियेमुळे अंतराळ क्षेत्रात सहभागी होणाऱ्या कंपन्यांना फायदे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपग्रह आणि अग्निबाण बनवण्याच्या कंपन्यांच्या योजनांची दखल घेऊन पंतप्रधानांनी हा एक मोठा बदल घडून येत असल्याचे आणि त्यामुळे अंतराळ क्षेत्रात भारताची क्षमता आणखी वाढणार असल्याचे सांगितले. या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीमुळे उच्च- तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढेल आणि आयआयटी/ एनआयटी सारख्या उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे भांडार असलेल्या आणि इतर तंत्रज्ञान संस्थांना अनेक संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या प्रकारे भारतीय गुणवत्तेने जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवली आहे, तशाच प्रकारे ही गुणवत्ता अंतराळ क्षेत्रात ओळख निर्माण करेल, असा आपला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 

व्यवसाय सुलभतेच्या पलीकडे

व्यवसाय सुलभतेच्या पलीकडे जात पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील सुधारणा केवळ व्यवसाय सुलभतेपुरत्या मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले आणि या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना मदत करण्यासाठी चाचणीच्या सुविधा आणि प्रक्षेपण तळासह प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची  ग्वाही दिली. या सर्व सुधारणांच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात भारताला केवळ स्पर्धात्मक बाजारपेठ बनवण्याचा उद्देश नसून अंतराळ क्षेत्रातील फायदे गरिबातील गरिबांपर्यंत पोहोचवणे हा देखील आहे. धाडसी विचार करण्याचे आणि समाज आणि देशाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी या क्षेत्रात सहभागी होणाऱ्यांना केले.

दळणवळण आणि दिशादर्शन (नेव्हिगेशन) यामध्ये अंतराळ क्षेत्राचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अंतराळ संशोधनाच्या युगात हे सर्व सहप्रवासी असतील अशी हमी त्यांनी दिली आणि भारत लवकरच अंतराळ सामग्री उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनेल, अशी आशा व्यक्त केली.

 

आत्मनिर्भर भारत मोहिमेतील सक्रिय सहभागी

आत्मनिर्भर भारत अभियानातील सक्रिय सहभागी अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष  डॉ. के सिवन यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी विविध उद्योगांकडून आयएन- स्पेसकडे परवानगी मागण्यासंदर्भात आणि अंतराळ विभागाच्या पाठबळाची मागणी करण्यासाठी आलेल्या विविध प्रस्तावांची पंतप्रधानांना माहिती दिली. अंतराळ विषयक कामे हाती घेण्यासाठी अंतराळ विभागाशी यापूर्वीच 25 पेक्षा जास्त कंपन्यांनी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.

या संवादाच्या वेळी अंतराळ क्षेत्रात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी या सुधारणांसंदर्भात आपल्या अनुभवांची माहिती पंतप्रधानांना दिली. भारती मित्तल एंटरप्रायजेसचे सुनील भारती, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे जयंत पाटील, अग्निकुल कॉसमॉस प्रा लि चे श्रीनाथ रवीचंद्रन, स्कायरूट एरोस्पेस लि. पवन कुमार, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज प्रा लि चे कर्नल एच एस शंकर, मॅप माय इंडियाचे राकेश वर्मा, पिक्सेल इंडियाचे (PIXXEL India) अवैस अहमद आणि स्पेस किड्झ इंडियाच्या श्रीमती केसन यांनी आपली मते मांडली.  हे क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि यामुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत अभियानात सक्रिय सहभागी सदस्य बनण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इस्रोने त्यांच्या प्रकल्पांसाठी देऊ केलेल्या मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानले आणि इस्रोसोबत खाजगी कंपन्यांच्या सहकार्यामुळे दर वर्षी होणाऱ्या प्रक्षेपणांच्या संख्येत केवळ वाढ होणार नाही तर अग्निबाणांच्या इंजिनांच्या विकासामध्येही अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानविषयक सुधारणा उदयाला येतील, असा विश्वास व्यक्त केला. या क्षेत्रात आकर्षित करण्यासाठी इस्रोचे विविध विभाग बालकांना पाहण्यासाठी खुले करावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680631) Visitor Counter : 207