आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
"ई-संजीवनी" टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत 10 लाख टेलिकन्सलटेशन पूर्ण
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2020 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020
भारताने आपल्या ई-आरोग्य व्यवस्थेच्या प्रवासातील एक मैलाचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी टेलीमेडिसिन सेवेअंतर्गत एकूण 10 लाख रूग्णांना ऑनलाईन उपचार विषयक सल्ला देण्याचा विक्रम आज गाठण्यात आला. टेलिमेडिसिन अंतर्गत रूग्णांना इंटरनेटच्या मदतीने दुरून आरोग्यविषयक सल्ला आणि इतर सेवा दिल्या जातात. या सेवेमुळे आरोग्यसेवांची व्याप्ती तर वाढली आहेच, शिवाय, आरोग्य सेवांचा दर्जाही सुधारला आहे. तसेच, वेळ आणि पैशांचीही बचत होते आहे.
एखाद्या विकसनशील देशाने राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सेवांसाठी डिजिटल साधनांचा वापर करुन, दिलेली ई-संजीवनी योजना कदाचित अशा प्रकारची पहिलीच ई-आरोग्य योजना असावी. कोविड-19 च्या काळात ई-संजीवनी योजनेमुळे आरोग्य सेवाक्षेत्रात मोठे डिजिटल परिवर्तन आणले, त्यासोबतच, देशातील डिजिटल आरोग्य व्यवस्थाही बळकट करण्यास मदत झाली.
आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी उपक्रमाअंतर्गत 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन शाखांमध्ये काम केले जात आहे. ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी योजनेद्वारे, अनुभवी डॉक्टरांकडून नव्या डॉक्टरांना सल्ला दिली जातो. ही सेवा देशभरातील 6000 आरोग्य आणि निरामयता केंद्रांद्वारे वापरली जाते. तर दुसऱ्या शाखेनुसार, ई-संजीवनीओपीडी सेवेद्वारे दुर्गम भागात आपल्या घरात अडकलेल्या रूग्णांना डॉक्टर डिजिटल माध्यमाने चिकित्सा सल्ले देतात.
ई-संजीवनीओपीडी सेवेमुळे संपर्करहित, निर्धोक आणी सुरक्षित सल्ला रूग्णांना मिळू शकतो. या सेवेला रुग्ण आणि डॉक्टर्स या दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. ई-संजीवनीओपीडी सेवेअंतर्गत सुमारे 8000 डॉक्टरांनी नोंदणी केली असून, त्यांना प्रसिक्षण देण्यात आले आहे. दररोज सुमारे 225 ऑनलाईन ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) प्लॅटफॉर्म वरुन साधारण 1500 डॉक्टर्स टेलीमेडिसिन सेवा देतात. यापैकी 190 तज्ञ डॉक्टर्स सेवा असून 30 सर्वसामान्य सेवा ओपीडी आहेत. अलीकडे, ई संजीवनी योजनेअंतर्गत दररोज देशभरात सुमारे 14,000 रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते.
देशभरातील 550 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील रुग्ण आज या सेवेचा लाभ घेत आहेत. यापैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रयत्नांना राज्य सरकारांनीही साथ दिली असून, ई-संजीवनीची अंमलबजावणी करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने एक सशक्त डिजिटल आरोग्य सेवाव्यवस्था निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात ई-संजीवनीद्वारे आतापर्यंत 12,635 चिकित्सा सल्ले देण्यात आले आहेत.

* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1680556)
आगंतुक पटल : 277