संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांनी आसियान संरक्षण मंत्र्यांच्या मिटिंग प्लसला  ऑनलाईन  संबोधित केले


नियम आधारित व्यवस्था , सागरी सुरक्षा, सायबर संबंधित गुन्हे आणि दहशतवादाचे धोके दूर करण्याची गरज आहेः राजनाथ सिंह

Posted On: 10 DEC 2020 6:27PM by PIB Mumbai

 

 आसियान संरक्षण मंत्र्यांच्या प्लस ऑनलाईन बैठकीच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 डिसेंबर 2020 रोजी व्हिएतनामच्या हनोई येथे ऑनलाईन आयोजित 14 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

एडीएमएम प्लस ही 10 आसियान देशांच्या आणि आठ भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक आहे. हे वर्ष एडीएमएम प्लस फोरमच्या स्थापनेचे दहावे वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित विशेष सोहळ्याला व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन  झुआन फुक उपस्थित होते आणि या सोहळ्याला संबोधित करण्याचा बहुमान राजनाथ सिंह यांना मिळाला ज्यातून या  मंचाने भारताला दिलेली मान्यता प्रतिबिबित होते.

आपल्या भाषणात  राजनाथ सिंह यांनी आशियामधील बहुलवादी, सहकार्यात्मक सुरक्षा व्यवस्थेच्या दिशेने संवाद आणि सहभागाला प्रोत्साहित करण्यात आसियान केंद्रित मंचाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. धोरणात्मक संवाद आणि व्यावहारिक सुरक्षा सहभागाच्या माध्यमातून बहुपक्षीय सहकार्य प्रगत करण्याच्या दृष्टीने  गेल्या दशकात एडीएमएम प्लसच्या सामूहिक कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी समुद्री सुरक्षा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, दहशतवाद प्रतिबंध आणि शांतता मोहीम यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी सात तज्ञ कृतीगटांच्या  कामगिरीचे त्यांनी  कौतुक केले.

संरक्षण मंत्री म्हणाले की, प्रदेश आणि जगासाठी दहशतवाद हा सर्वात मोठा त्रास आहे. भारताच्या शेजारच्या क्षेत्रात दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या संरचना अस्तित्त्वात आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे आणि जोमाने लढा देण्यासाठी दृढ वचनबद्धता आणि त्यासाठी  आंतरराष्ट्रीय यंत्रणा मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.

कोविड -19 ने घातलेले निर्बंध असूनही एडीएमएम प्लससह आसियान संबंधित संरक्षण कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे आभार मानले. त्यांनी नवीन अध्यक्ष म्हणून ब्रुनेई दारुसलामचे स्वागत केले आणि 2021 मध्ये यशस्वी आयोजनासाठी  शुभेच्छा दिल्या.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679725) Visitor Counter : 317