आयुष मंत्रालय

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांनी आयुष निर्यात संवर्धन परिषद स्थापन करण्याचा घेतला निर्णय

Posted On: 06 DEC 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 डिसेंबर 2020


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांनी मिळून आयुष निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात संवर्धन परिषद स्थापन करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी  नुकत्याच घेतलेल्या आयुष  व्यापार आणि उद्योग यांच्या संयुक्त आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण आयुष (उत्पादनांच्या) निर्यातीला चालना देऊन किंमत आणि दर्जा यांच्या स्पर्धात्मकतेसाठी संपूर्ण आयुष क्षेत्र एकत्रितपणे कार्य करेल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 4 डिसेंबर 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीला उद्योग आणि व्यापार जगतातील 50 प्रतिनिधी आणि आयुष क्षेत्रातील 2000 भागधारक उपस्थित होते.

आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी मागच्या बैठकीत केलेल्या शिफारशींवर कोणती कार्यवाही झाली त्यासंदर्भातील सादरीकरण करत चर्चेला सुरुवात केली.

त्यानंतर झालेल्या खुल्या चर्चेत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आरआयएस, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS), इन्वेस्ट इंडिया यातील अधिकारी आणि आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी यांनी आपले विचार व्यक्त केले. आयुष मंत्रालयाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आयुष आधारीत उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची सर्वांनी प्रशंसा केली.

कोविड-19 महामारीच्या कठीण काळात या रोगाविरुध्द प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी आयुष आधारीत उपाययोजनांवरील  जागतिक रुची वाढत आहे ,यावर. श्रीपाद नाईक यांनी प्रकाश टाकला. भारतात आणि जगभरात वाढत असलेल्या मागण्यांसाठी आयुष क्षेत्रातील उद्योग आणि वाणिज्य क्षेत्राने आपल्याला अधिक वेगाने उंचावण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. आयुषने आयुर्वेद आणि योगावर आधारीत रोगप्रतिबंधक मार्गदर्शक तत्वे आणि कोविड -19 साठी पाळण्यात येणारी राष्ट्रीय रुग्णालय व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वे लोकांना मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरली.

पीयुष गोयल यांनी कोविड-19 महामारीच्या विरोधात आयुष क्षेत्राने बजाविलेल्या आघाडीच्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली. अलीकडच्या काही महिन्यांत आयुष उत्पादनांच्या निर्यातीत झालेली वृध्दी हे त्या उत्पादनांचे विविध देशांत वाढत असलेल्या लोकप्रियतेचे थेट प्रतिबिंब आहे. निर्यातीसंदर्भात एचएस (HS) कोडचे प्रमाणीकरण करण्याचा विचार तातडीने करण्यात येईल, जेणेकरून निर्यातीला चालना मिळेल. त्यांनी आयुष मंत्रालयाला त्यासाठी लवकरच वाणिज्य आणि अर्थ मंत्रालयांसोबत समन्वय साधून कार्य करण्याचे आवाहन केले. जागतिक बाजारात स्पर्धात्मक दृष्ट्या उत्तम ठरण्यासाठी उद्योगधुरीणांनी त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता आणि किंमत यावर एकाच वेळी काम करावे, असा  सल्ला वाणिज्य मंत्र्यांनी दिला. आयुष निर्यात संवर्धन परिषदेच्या संकल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि ते म्हणाले की वाणिज्य मंत्रालयाला असा पाठिंबा देण्यात आनंद होत आहे.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय:

  1. आयुष मंत्रालय आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आयुष निर्यात संवर्धन परीषद(AEPC) स्थापन करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील.  ही संकल्पित एईपीसी आयुष मंत्रालयात स्थापन करण्यात येईल.
  2. आयुषसाठी एचएस कोडचे प्रमाणीकरण लवकरच करण्यात येईल.
  3. आयुषची उत्पादने आणि सेवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सशी समन्वय साधून काम करेल.
  4. आयुष मंत्रालय आणि आयुष उद्योग त्यांच्या उत्तम कार्यपद्धती/यशोगाथा ओळखून त्यांचा लोकांपर्यंत प्रचार करतील.
  5. आयुष उद्योग आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि मानके तसेच त्यांची किंमत स्पर्धात्मक दृष्ट्या योग्य असतील हे सुनिश्चित करतील.
  6. आयुष ब्रँड इंडिया उपक्रमांसाठी प्रयत्न करेल.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678725) Visitor Counter : 291