सांस्कृतिक मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटनेतल्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन


एससीओ सरकार प्रमुखांच्या परिषदेचे 2020 चे अध्यक्ष म्हणून व्यंकय्या नायडू यांनी प्रदर्शनाचे केले उद्घाटन

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर एससीओ देशांमधल्या बौद्ध कला, पुरातन वस्तूंचे प्रदर्शन

Posted On: 30 NOV 2020 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2020

 

भारताचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू आणि शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेचे 2020 चे अध्यक्ष यांनी आज शांघाय सहकार्य संघटनेतल्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची आज 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत प्रस्तुत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

अशा प्रकारे शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांचे एकत्रित पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृतींचे  त्रिमितीय स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेबजीएल मंच, आभासी जागेचा विनियोग, नवसंकल्पनेतून मांडणी आणि पुरातन वस्तूंविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी मुक्त करण्यात आले असून त्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे आहे -  https://nmvirtual.in/

बौद्ध तत्वज्ञान आणि मध्य अशियातील कला हे शांघाय सहकार्य संघटनेतल्या (एससीओ) देशांना एकमेकांशी जोडणारे आहे. ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शन प्रेक्षकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वांना आपल्या सुविधेनुसार शांघाय सहकार्य संघटनेतल्या देशांकडे असलेल्या बौद्ध कला पुरातुन वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यामुळे अशा पद्धतीने आयोजित प्रदर्शन एकमेकांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरत असून समुदायांचा कायाकल्प घडवून आणण्याची क्षमता यामध्ये आहे.

या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अशिया खंडातल्या विविध संग्रहालयातल्या कलात्मक समृद्धीची झलक पहायला मिळते. त्याचबरोबर बौद्ध शाळांचा विकास कसा टप्प्याटप्याने होत गेला, याची माहिती देणारे lआणि ऐतिहासिक काळाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन आहे.

नवी दिल्लीचे राष्ट्रीय संग्रहालय, कोलकाताचे भारतीय संग्रहालय, कझाकिस्तानचे राष्ट्रीय संग्रहालय, चीनची दुन हुआंग अकादमी, किर्गिझ प्रजासत्ताकचे राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहालय, पाकिस्तानचे संग्रहालय, रशियातल्या मॉस्कोचे ओरिएंटल संग्रहालय, ताजिकिस्तानचे राष्ट्रीय संग्रहालय आणि राष्ट्रीय पुरातन कला संग्रहालय आणि उझबेकिस्तानचा प्रसिद्ध पुरातत्व विभाग यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे.

या प्रदर्शनाला भेट देणारे भारतीय बौद्ध खजिना पाहण्यासाठी गांधार आणि मथुरा कला शाळा, नालंदा, अमरावती, सारनाथ इत्यादी ठिकाणांवर त्रिमिती आभासी स्वरूपात फेरफटका मारू शकणार आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी कक्षामध्ये गौतम बुद्धांचे जीवन, बौद्ध कला यांच्या संग्रहाची प्रभावी , गांधार शैलीतल्या चित्रांची   मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये कराची, लाहोर, तक्सलिआ, इस्लामाबाद, स्वात आणि पेशावर संग्रहालयातल्या वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे.  यामध्ये सिद्धार्थाचे उपोषण आणि सिकरी येथे असलेल्या बुद्धाच्या पदचिन्ह प्रदर्शित केले आहे. साहरी बाहलोई येथे असलेली बुद्धाची साधनामग्न मुद्रेची मूर्ती, गांधार येथील श्रावस्ती मूर्ती यांचा प्रदर्शनामध्ये समावेश आहे.

या कला दालनामध्ये मॉस्कोच्या ओरिएंटल संग्रहालयातल्या 100पेक्षा जास्त कलाकृतींचा समावेश आहे. यामध्ये बौद्ध मठ परंपरा दर्शविणा-या विविध चिन्हे, वस्तू यांचा समावेश आहे. चीनच्या दून हुआंग अकादमीने उत्कृष्ट डिजिटल संग्रहाचे प्रदर्शन केले आहे. त्यामध्ये नाविन्यपूर्ण वास्तूरचना, मोहक शिल्पांचा आणि सजावटीच्या सुरेख कलाकृतींचा, वेशभूषा यांचा समावेश आहे.

प्राचिन तेरमेझ, करातेपा, फायझतेपा वारसा स्थानी असलेल्या उत्कृष्ट बौद्ध कलेचे प्रदर्शन उझबेकिस्तानचा कक्षात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध वारसा स्थळांवरील कलाकृती तसेच कझाकस्तान आणि किरिगस्तानमधील संग्रहालयातल्या दुर्मिळ बौद्ध कला वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले आहे. ताजिकिस्तान कक्षाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अजिना -तेपामधील 13 मीटर लांबीचा बुद्धाची निर्वाण अवस्थेतील मूर्ती आहे.

नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाने हे ऑनलाइन त्रिमिती आभासी प्रदर्शन विकसित केले आहे. अशा आभासी पद्धतीनेही पुरातन कला वस्तूंचा प्रदर्शनाचा आनंददायक अनुभव घेता येऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या या प्रयत्नाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 29.11.2020 च्या ‘मन की बात’मध्ये कौतुक केले आहे.

  


* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677245) Visitor Counter : 270