पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे लखनौ विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी  स्थापना दिनाला संबोधन


विद्यापीठाकडून स्थानिक उत्पादनाचा पुरस्कार व्हावा: पंतप्रधान

विचारातील सकारात्मकता आणि शक्यता बाळगणारा दृष्टिकोन या दोहोंना कायम ताजेतवाने राखले पाहिजे : पंतप्रधान

''राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ''लवचिकता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारे : पंतप्रधान

गेल्या सहा वर्षात खादीची विक्री ही त्याआधीच्या वीस वर्षांतील विक्रीहून जास्त: पंतप्रधान

Posted On: 25 NOV 2020 9:56PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. पंतप्रधानांनी याप्रसंगी विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या नाण्याचे विमोचन केले.  याशिवाय भारतीय टपाल खात्याने प्रसृत केलेल्या विशेष स्मरण टपाल तिकीटाचेही प्रकाशन केले.  संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्याला उपस्थित होते.

विद्यापीठाने स्थानिक कला आणि उत्पादनांशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचना पंतप्रधानांनी केली तसेच या स्थानिक उत्पादनांमध्ये गुणात्मकदृष्ट्या सुधारणा करण्यासाठी संशोधन करण्याचेही आवाहन केले.

लखनवी चिकनकारी सारखी उत्पादने, मोरादाबाद मधील ब्रासची भांडी, अलिगड मधील कुलुपे, भदोही गालिचे यांना जागतिक नकाशावर स्पर्धात्मक मूल्य मिळवून देण्यासाठी  व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि धोरण या गोष्टींचा अंतर्भाव यासंबंधीच्या अभ्यासक्रमात विद्यापीठाने करावा यामुळे 'एक जिल्हा एक उत्पादन' ही कल्पना समजून घेण्यासही मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

आपली कला,संस्कृती आणि अध्यात्म यांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून  देण्यासाठी  विद्यार्थ्यांना या विषयांशी बंध कायम राखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

एखाद्याची कार्यक्षमता समजून घेण्याची आवश्यकता असते हे सांगताना पंतप्रधानांनी रायबरेलीतील रेल्वे डबे निर्मिती  कारखान्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की , बराच काळ या कारखान्यातीन गुंतवणूक ही फुटकळ उत्पादने आणि कपूरथळा येथे बनलेल्या डब्यांमध्ये काही जोडकाम करणे या पलीकडे गेली नव्हती. हा कारखाना रेल्वे डबे बनवण्याच्या काम करण्याच्या योग्यतेचा होता. पण त्याचा पूर्णपणे वापर केला गेला नाही. वापर-क्षमतेचा हा अनादर 2014 मध्ये बदलला आणि या कारखान्याची पूर्ण क्षमता समजून वापरली गेली. आज शेकडो रेल्वे डबे या कारखान्यातून बनून तयार होऊन बाहेर पडतात. मोदी म्हणाले की इच्छाशक्ती आणि ध्येय हे दोन्ही कार्यक्षमतेएवढेच महत्वाचे आहे.  इतर काही उदाहरणे देत पंतप्रधान म्हणाले, विचारातील सकारात्मकता आणि शक्यता बाळगणारा दृष्टिकोन या दोहोंना कायम ताजातवाने राखले पाहिजे.

नरेंद्र मोदींनी गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने गांधी जयंतीला पोरबंदर येथे फॅशन शो करून खादीला लोकप्रिय करण्याचा अनुभव यावेळी कथन केला. यामुळे खादीला फॅशनेबल बनवता आले. गेल्या सहा वर्षात खादीची झालेली विक्री ही त्या आधीच्या 20 वर्षात झालेल्या विक्रीहून अधिक असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

लक्ष विचलित करणारी आधुनिक जगातील साधने आणि एकाग्रतेला आव्हान देणारी गॅजेट्स याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की  चिंतन आणि आत्मज्ञान यांची सवय युवा वर्गातून हळूहळू लोप पावत आहे. सर्व व्यवधानातून तरुणांनी स्वतःसाठी वेळ काढण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे इच्छाशक्ती सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले .

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे परीक्षण करण्याचे साधन आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि लवचिकता देण्याचा प्रयत्न नवीन धोरणात आहे.  जुनाट गोष्टीना वगळून चौकटीच्या बाहेरचा विचार करा आणि बदलाची भीती बाळगू नका असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी नवीन धोरणावर चर्चा आणि त्याच्या अंमलबजावणीस सहकार्य करण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली.

 

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675881) Visitor Counter : 170