पंतप्रधान कार्यालय

भारताच्यावतीने भूतानमध्ये दुसऱ्या टप्प्यातले रूपे कार्ड जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

Posted On: 20 NOV 2020 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

 

सन्माननीय ल्योनछेन डॉ. लोटे शेरिंग,

भूतान आणि भारत यांच्याशी संबंधित असलेले सर्व महनीय अतिथी,

नमस्कार !

सर्व भारतीयांच्याप्रमाणेच, माझ्या मनातही भूतानविषयी विशेष प्रेम आणि मैत्री आहे आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्याला भेटतो, त्यावेळी एक खास आपलेपणाचा अनुभव मला येतो.

भारत आणि भूतान यांच्यातले विशिष्ट संबंध, आमचे विशेष मित्रत्व, हे काही केवळ दोन राष्ट्रांसाठी अमूल्य आहे असे नाही तर मैत्रीचे विश्वातले एक बेजोड उदाहरणही आहे.

गेल्या वर्षी झालेल्या माझ्या भूतान यात्रेच्या अनेक स्मृती अजूनही जाग्या आहेत. एका प्रकारे अगदी एका  एका मिनिटाला कोणत्या ना कोणत्या नवीन घटना, नवीन चैतन्य, नवीन उत्साह यामुळे तो दौरा म्हणजे एक स्वतःहूनच चिरस्मरणीय ठरला. आम्ही आपल्या सहयोगातून डिजिटल, अंतराळ आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांना सहभागी करण्यासाठी महत्वपूर्ण पावले टाकली होती.

21 व्या शतकामध्ये दोन्ही देशांमध्ये आणि विशेषतः आमच्या युवा पिढीसाठी हे कनेक्टिव्हिटीचे नवीन सूत्र असणार आहे. माझ्या भूतान दौऱ्याच्या काळात आपण दोन्ही देशांमध्ये रूपे कार्ड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ केला होता.

यामुळे भारतीय नागरिकांना भारतीय बँकांव्दारे जारी करण्यात आलेल्या कार्डाच्या माध्यमातून भूतानमध्ये पैसे देण्याची सुविधा मिळाली होती. आत्तापर्यंत भूतानमध्ये रूपे कार्डच्या माध्यमातून 11,000 व्यवहार यशस्वी झाले आहेत, हे जाणून मला आनंद झाला आहे. जर कोविड-19 महामारी आली नसती तर, हा आकडा नक्कीच यापेक्षा जास्त असता.

आज आम्ही या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. आणि त्याच्याबरोबरच आम्ही रूपे नेटवर्कमध्ये भूतानचे एक पूर्ण भागीदार म्हणून स्वागत करतो. या कार्यासाठी ज्या भूतानी आणि भारतीय अधिकारींनी परिश्रम घेतले आहे, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

आजच्या नंतर भूतान नॅशनल बँकेव्दारे जारी करण्यात आलेल्या रूपे कार्डचे धारक भारतामध्ये एक लाखांपेक्षा जास्त एटीएम आणि 20 लाखापेक्षा जास्त पीओएस म्हणजेच पॉइंटस् ऑफ सेल टर्मिनल सुविधेचा उपयोग करू शकणार आहेत. मला विश्वास आहे की, यामुळे भूतानच्या प्रवाशांना भारतामध्ये शिक्षण, आरोग्य, तीर्थयात्रा अथवा पर्यटन यासाठी खूप चांगली सुविधा मिळू शकणार आहे.

यामुळे भूतानमध्ये डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत मिळेल. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कोट्यवधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले आहे.

सन्माननीय, मित्रांनो,

अंतराळ क्षेत्रामुळे आपल्यामध्ये अधिक चांगली, भक्कम कनेक्टिव्हीटी मजबूत झाली आहे. भारताने अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग सदैव विकासाच्या उद्देश पूर्तीसाठीच केला आहे. भारत आणि भूतान हा उद्देश सामायिक करीत आहे.

गेल्या वर्षी मी भूतानच्या दक्षिण अशिया उपग्रहाच्या उपयोगासाठी ग्राउंड-अर्थ-स्टेशनचे उद्घाटन केले होते. मला आनंद वाटतो की, या स्टेशनच्या मदतीने भूतान प्रसारण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्षिण अशिया उपग्रहाचा अधिक प्रभावी वापर करू शकत आहे.

 

काल आम्ही ‘बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापर’ या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. यामुळे दोन्ही देशांच्या विविध संस्थांमध्ये सहयोगाचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

भारताने अलिकडेच आपल्या अंतराळ क्षेत्रामध्ये खाजगी उद्योग मुक्त केले आहे. ही खूप मोठी सुधारणा केली आहे. यामुळे क्षमता, नवसंकल्पना आणि कौशल्य यांना प्रोत्साहन मिळेल.

मला एका गोष्टीबद्दल विशेष आनंद आहे की, पुढच्यावर्षी इस्रोच्यावतीने भूतानचा उपग्रह अंतराळामध्ये पाठविण्यासाठी काम अतिशय वेगाने करण्यात येत आहे.

यासाठी भूतानचे चार प्रतिभावंत युवा अंतराळ अभियंते डिसेंबरमध्ये इस्रोमध्ये जाणार आहेत. या चारही नवयुवकांना मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. मला माहिती आहे की, आदरणीय भूतान नरेश आपल्या देशाच्या विकासामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्यासाठी मनाने तयार आहेत आणि तशी त्यांची  इच्छाशक्तीही आहे. त्यामुळे या कार्याला ते प्रोत्साहन देत आहेत. त्यांचा स्वतःचा असा एक दृष्टीकोण आहे.

त्यांच्या या दूरदृष्टीला, व्हिजनला साकार करण्यासाठी भारत आपला अनुभव आणि आपल्या सुविधा यांचे सहकार्य करण्यासाठी पूर्णतेने सिद्ध असणार आहे. अशाच प्रकारे भूतानमध्ये एक आयसीटीयुक्त नॉलेज बेस्ड सोसायटीच्या निर्माणासाठी असलेल्या उद्देशाचेही आम्ही समर्थन करीत आहोत. भूतानसाठी तिसरे आंतरराष्ट्रीय इंटरनेट गेटवे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलबरोबर केलेल्या कराराचे मी मनापासून स्वागत करीत आहे.

सन्माननीय, मित्रांनो,

तसे पाहिले तर आपण हा आनंदाचा प्रसंग एकमेकांना व्यक्तिगत स्तरावर भेटून, मिळून एका समारंभाच्या स्वरूपामध्ये साजरा करू शकलो असतो तर अधिक चांगले झाले असते. आपल्याला भेटण्याची एक संधी या कार्यक्रमामुळे मिळाली असती. परंतु कोरोनाच्या कारणामुळे प्रत्यक्ष भेटणे शक्य होणार नाही.

मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला आणि पाहिले तर एक गोष्ट योग्य सुद्धा आहे, की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये अशा पुढाकाराचा आनंदही आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने घेऊ शकत आहे.

भूतानची जनता आणि सरकारने कोविडच्या संकटाविरुद्ध दोन हात करताना जे धैर्य आणि जी शिस्त दाखवली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि आपणा सर्वांना चांगले आरोग्य आणि यश लाभावे, अशी माझ्यावतीने, एकशे तीस हिंदुस्तानवासियांच्या वतीने कामना व्यक्त करतो.

मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की, या अवघड काळामध्ये आम्ही भूतानच्या बरोबर ठाम उभे आहोत आणि आपल्या गरजा, जरूरीच्या गोष्टी यांना आमच्यादृष्टीने सर्वोच्च प्राधान्य असेल.

आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद! शाही परिवाराच्या उत्तम आरोग्याची कामना करून ताशी देलक!

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674490) Visitor Counter : 154