पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर येथे हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून केलेले भाषण

Posted On: 14 NOV 2020 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्‍हेंबर 2020

 

मित्रांनो,

जैसलमेरच्या हवाई तळावर येण्याची मला अनेकदा संधी मिळाली आहे, पण कामांची मालिकाच इतकी असते की मला कधीही थोडा वेळ थांबण्याची, कोणाशी बोलण्याची संधी मिळत नाही. पण आज पूर्णपणे तुमच्या सोबत वेळ घालवण्याची आणि दिवाळीचा सण साजरा करण्याची संधी मिळाली आहे हे माझे भाग्य आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.    

मित्रांनो,

दिवाळीच्या दिवशी आपल्या दरवाजासमोर किंवा प्रवेशद्वारासमोर शुभ-लाभ किंवा रिद्धी सिद्धी सारखी रांगोळी काढण्याची आपली परंपरा आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या घरात समृद्धी यावी हा यामागचा उद्देश असतो. ज्या प्रकारे घराला दरवाजे असतात, त्याच प्रकारे आपल्या देशाच्या सीमा आपल्या देशाची एक प्रकारची प्रवेशद्वारे असतात. अशा स्थितीत आपल्या देशाची समृद्धी तुमच्यामुळे आहे, देशाचा शुभ- लाभ तुमच्यामुळे आहे, देशाच्या रिद्धी- सिद्धी तुमच्यामुळे आहेत आणि तुमच्या पराक्रमामुळे आहेत. म्हणूनच आज देशाच्या प्रत्येक घरात तुम्हा सर्वांचे गौरवगान करत लोक तुमच्यासाठी एक दिवा उजळून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दिवाळीचे हे दिवे तुमच्या पराक्रमाच्या प्रकाशात चमचमत आहेत. दिवाळीचे हे दिवे तुमच्या सन्मानार्थ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक कुटुंबात प्रज्वलित होत आहेत. मी याच भावनेने तुमच्यामध्ये उपस्थित आहे. तुमच्या देशभक्तीला, तुमच्या शिस्तीला, देशासाठी जगण्याच्या आणि देशासाठी मरण्याच्या तुमच्या निर्धाराला वंदन करण्यासाठी मी आलो आहे.

मित्रांनो,

आज जर भारताच्या जागतिक प्रभावाचा विचार केला तर तो आर्थिक, सांस्कृतिक आणि सैन्यबळ या सर्वच स्तरांवर मजबूत होत चालला आहे. आज जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा वाढत चालला आहे. भारतीय युवकांच्या गुणवत्तेचा सन्मान जगभरात दिवसेंदिवस वाढू लागला आहे आणि जर देशाचा विचार केला तर सीमेवरील या भागात या तिन्हींचे दर्शन घडत आहे. गेल्या काही वर्षात ज्या गतीने आणि पातळीवर तुम्हाला सशक्त करण्याचे निर्णय घेण्यात आले त्यातून आपले आर्थिक सामर्थ्य दिसून येत आहे. तुम्ही सर्वजण विविध राज्यांच्या परंपरा, तिथली विविधता यांचे एकीकरण करत आहात. जगातील सर्वात मोठ्या सैन्यबळांपैकी एकाची निर्मिती करत आहात. आपल्या सैन्यदलाचे सामर्थ्यच असे आहे की ज्या वेळी कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहात  असेल त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची भावना तुम्हा सर्वांमध्ये असते. याच सर्व बाबींमुळे भारतीय सैन्यदल जगाच्या नजरेत आणखी जास्त विश्वासार्ह बनले आहे. आज भारतीय सैन्यदले जगातील मोठ- मोठ्या देशांच्या सोबत संयुक्त युद्धसराव करत आहेत. दहशतवादाच्या विरोधात आपण धोरणात्मक भागीदारी  करत आहोत. दहशतवाद्यांच्या कोणत्याही तळांवर कोणत्याही वेळी आपण स्ट्राईक करू शकत असल्याचे भारतीय सैन्यदलांनी दाखवून दिले आहे. हीच भारतीय सैन्यदले जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतीमोहिमांचे नेतृत्व करत असतात. एकीकडे जिथे शत्रूला नामोहरम करण्यामध्ये भारतीय सैन्य सक्षम आहे त्याचप्रकारे आपत्तींच्या काळात एखाद्या दिव्याप्रमाणे स्वतःला प्रज्वलित करून दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवण्याचे कामही त्यांच्याकडून होत असते.

मित्रांनो,

कोरोनाची झळ पोहोचलेल्या आपल्या नागरिकांना परदेशातून सुरक्षित परत आणण्यामध्ये आपल्या हवाई दलाने आणि नौदलाने बजावलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ज्यावेळी वुहानला जाण्याचे आव्हान होते आणि त्यावेळी त्या महाभयंकर प्रकोपाची नुकती सुरुवात झाली होती आणि वुहानमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करायची होती त्यावेळी हवाई दलाचे लोक सर्वात आधी पुढे आले. काही देश तर असे होते ज्यांनी आपल्या नागरिकांना वुहानमध्ये त्यांच्या नशीबाच्या भरवशावर सोडून दिले होते. पण भारताने केवळ आपल्या नागरिकांनांच तिथून बाहेर काढले नाही तर इतर अनेक देशांच्या नागरिकांची देखील आपल्या हवाई दलाच्या जवानांनी मदत केली. ऑपरेशन समुद्रसेतूच्या माध्यमातून परदेशातून हजारो भारतीय आपल्या नौदलाच्या मदतीमुळे भारतात सुरक्षित परतले.  केवळ देशातीलच नाही तर मालदीव्ज, मॉरिशस, अफगाणिस्तानपासून कुवेत, काँगो आणि दक्षिण सुदानसहित अनेक मित्र देशांच्या  नागरिकांच्या मदतीसाठी देखील हवाई दल सर्वात पुढे राहिले आहे. हवाई दलाच्या सहकार्याने संकटाच्या काळात हजारो टनाची मदत सामग्री गरजूंपर्यंत पोहोचू शकली आहे.

मित्रांनो,

कोरोनाच्या काळात तुम्हा सर्वांच्या या प्रयत्नांची फारशी चर्चा होऊ शकली नाही आणि म्हणूनच आज मी विशेषत्वाने देशाचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. डीआरडीओ असो, आपली तिन्ही सेनादले असोत, बीएसएफसहित आपल्या सर्व निमलष्करी दलांनी कोविड शी संबंधित सामग्रीपासून क्वारंटाईन आणि उपचारापर्यंत सर्वच बाबतीत युद्धपातळीवर जे काम केले ते अभूतपूर्व आहे. ज्यावेळी सुरुवातीला सॅनिटायझर आणि फेस मास्क पासून पीपीई पर्यंतची आव्हाने होती तेव्हा देशाच्या या गरजा पूर्ण करण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारले. प्रोटेक्शन किट असोत, व्हेंटिलेटर्स असोत, मेडिकल ऑक्सिजनशी संबंधित सुविधा असोत, रुग्णालये असोत, प्रत्येक स्तरावर तुम्ही सर्वांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. केवळ इतकेच नाही तर ज्यावेळी देशाच्या अनेक भागात चक्रीवादळे आली त्यावेळी देखील तुम्ही अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत केली. त्यांना आधार दिला. तुमचा त्याग आणि तपश्चर्या यांनी तेजस्वी बनलेल्या तुमच्या जीवनापासून प्रेरणा घेत आज प्रत्येक भारतीयांनी दिवाळीत दिवे उजळवलेत आणि दिपावली मध्ये दिवे पेटवून ते तुमचे गौरवगान करत आहेत.

मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी मिळून हा निर्धार केलात की कोरोनाच्या प्रादुर्भावाची झळ आपल्या ऑपरेशनल युनिट्सना कोणत्याही प्रकारे बसणार नाही. लष्कर असो, नौदल असो, हवाई दल असो, कोणीही आपली सज्जता कोरोनाच्या कारणामुळे थांबवली नाही, ठप्प होऊ दिली नाही. कोरोनाच्या काळात जैसलमेरमध्ये आणि आपल्या समुद्रातही युद्धसराव सतत सुरू राहिला आहे. अशा काळात जगात जेव्हा अनेक देश जागेवरच थबकले होते त्या काळात इतक्या वेगाने आगेकूच करणे इतके सोपे नव्हते पण तुम्ही सर्वांनी हे देखील करून दाखवले आहे. कोरोनाच्या काळातच आधुनिक शस्त्रसामग्री आणि उपकरणांची पोच आणि समावेश या दोन्ही गोष्टी वेगाने झाल्या आहेत. याच काळात अत्याधुनिक राफेल विमाने देशाच्या सुरक्षा कवचाचा भाग बनली. याच काळात तेजस विमानांनी स्क्वॉड्रन कार्यरत झाली. अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर यांचे संपूर्ण पाठबळ याच काळात आपल्याला मिळाले. भारतातच तयार झालेल्या दोन आधुनिक पाणबुड्या देखील नौदलाच्या ताब्यात आल्या.

मित्रांनो,

कोरोनाच्या काळात लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबरच क्षेपणास्त्रे बनवणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांनी देखील देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या काळात सातत्याने या क्षेपणास्त्राची, त्या क्षेपणास्त्राची चाचणी झाल्याच्या बातम्या येतच राहिल्या. आज या क्षेपणास्त्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. गेल्या काही महिन्यात आपले संरक्षण सामर्थ्य किती पटीने वाढले आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. गेल्या दोन महिन्यातच देशात अनेक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या झाल्या. एका सेकंदात दोन किलोमीटर अंतर कापणाऱ्या हायपरसोनिक डेमोन्स्ट्रेटर व्हेईकलच्या यशस्वी चाचणीमुळे भारत जगातील तीन-चार प्रमुख देशांच्या यादीत भारताला पुढे आणले आहे, भारताला समाविष्ट केले आहे. जल असो, स्थल असो, हवा असो प्रत्येक ठिकाणी मारा करू शकणाऱ्या लांब आणि लघु पल्ल्याच्या अनेक क्षेपणास्त्रांनी भारताच्या आकाशात अभेद्य भिंत तयार केली आहे. कोरोनाच्या याच काळात आपल्या शास्त्रज्ञांनी भारताच्या फायर पॉवर संदर्भात जगातील सर्वात श्रेष्ठ सामर्थ्यांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

मित्रांनो,

आधुनिक युद्ध सामुग्री -सामानाबरोबरच देशाच्या सीमांवर  आधुनिक संपर्क व्यवस्था असलेले मोठे पायाभूत प्रकल्प देखील याच काळात पूर्ण केले गेले आहेत.  आज अटल बोगदा लडाखला जोडण्याचे खूप मोठे माध्‍यम बनला आहे. आपल्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील सीमांवर डझनभर पूल आणि लांबच लांब रस्ते देखील याच काळात पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत. जेव्हा संपूर्ण जगात हाहाःकार  होता, प्रत्येकजण आपल्या आयुष्याबाबत चिंताग्रस्त होता तेव्हा त्या परिस्थितीत देशाच्या सुरक्षेत निरंतर सक्रिय होते. तिथे राहून कर्तव्य बजावून तुम्ही लोकांनी देशाची मने पुन्हा जिंकली आहेत.

मित्रांनो,

तुम्हा सर्वांची हीच कटिबद्धता देशाला संरक्षण, सुरक्षा या बाबतीत मजबूत करत आहे. आज देशात एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे याकडे लक्ष दिले जात आहे. तर दुसरीकडे संरक्षण क्षेत्रातील सुधारणांवर देखील तेवढ्याच गंभीरतेने काम सुरु आहे. संरक्षण क्षेत्रात आत्‍मनिर्भरतेमागे हेच उद्दिष्ट आहे की, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानासाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी व्हावे. हेच लक्षात घेऊन आपल्या तिन्ही सैन्यदलानी एकत्रितपणे एक प्रशंसनीय निर्णय घेतला आहे. त्यांनी असे ठरवले आहे कि आता सुरक्षेसंबंधी 100 पेक्षा अधिक उत्पादनांची आता परदेशातून आयात नव्हे तर आपल्याच देशात उत्पादित केली जातील किंवा उत्पादन होत असलेल्या वस्तू अधिक चांगल्या बनवल्या जातील आणि इथूनच घेतल्या जातील. आतापर्यन्त जे सुटे भाग आयात केले जात होते ते देखील देशातच बनवण्याचा प्रयत्न केला  जात आहे. आपल्या सैन्यदलांची ही इच्‍छाशक्ती देशातील अन्य लोकांनाही लोकलसाठी व्होकल होण्याची प्रेरणा देत आहे.

मित्रांनो

भारतात शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या जास्तीत जास्त कंपन्या याव्यात यासाठी संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवून 74 टक्के करण्यात आली आहे. भारतात ज्या कंपन्यांना यायचे आहे त्यांच्यासाठी इथे उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी उत्‍तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन मोठ्या संरक्षण कॉरीडोरवर देखील वेगाने काम सुरु आहे. 

मित्रांनो,

सैन्याचे  आधुनिकीकरण आणि सैन्याला उपकरणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात जुन्या काळच्या प्रक्रिया सर्वात मोठ्या अडथळा होत्या. या प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी देखील सातत्याने काम केले जात आहे. अलिकडेच आणखी काही मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. पूर्वी चाचणीची प्रक्रिया खूप क्लिष्ट होती. त्याला वेळही खूप लागायचा. यामुळे संरक्षण क्षेत्रात उपकरणांच्या समावेशाला खूप विलंब व्हायचा. आता ते एकदम सोपे करण्यात आले आहे. आपल्या तिन्ही सेवादलांमध्ये समन्‍वय आणखी वाढावा, जलद गतीने निर्णय व्हावेत यासाठी संरक्षण दलांच्या प्रमुखांची व्यवस्था तुम्हा सर्वांसमोर आहे. इतक्या कमी काळातच देशाने या नवीन व्यवस्थेचे महत्व जाणले आहे.  एवढ्या कमी वेळेत ही नवीन व्यवस्‍था मजबूत होणे, आपल्या सैन्य, हवाई आणि नौदलाच्या कटिबद्धतेमुळेच शक्य झाले आहे. आणि म्हणूनच आपली तिन्ही सैन्यदले अभिनंदनाला पात्र आहेत. आपल्या सैन्यांच्या सामूहिक संकल्पाने  सीडीएसचे यश निश्चित केले आहे. 

मित्रांनो,

सीमावर्ती भागात काय आव्हाने असतात, इथे किती अडचणी येतात हे तुम्हा सर्वांपेक्षा उत्तम कोण जाणू शकते. या समस्यांच्या निवारणासाठी सीमा भागाच्या विकासाबरोबरच सीमा भागात युवकांचे विशेष प्रशिक्षण देखील तेवढेच आवश्यक आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी म्हटले होते की  देशातील 100  हून अधिक सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये युवकांना एनसीसीशी जोडण्यासाठी विशेष अभियान चालवले जाईल. सीमावर्ती आणि समुद्रालगतच्या या क्षेत्रांमध्ये सुमारे 1 लाख युवकाना तयार केले जात आहे. यामध्ये विशेष बाब अशी आहे कि या युवकांना लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रशिक्षण देईल. म्हणजे जिथे लष्कराचा तळ आहे तिथे लष्कर प्रशिक्षण देईल, जिथे हवाई दलाचा तळ आहे तिथे हवाई दल आणि जिथे नौदलाचा तळ आहे तिथे नौदल प्रशिक्षण देईल.

मित्रांनो,

यातही मोठ्या संख्येने मुलींना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा त्या प्रयत्नांचा भाग आहे ज्याअंतर्गत देशाची आत्‍मनिर्भरता आणि आत्‍मविश्‍वास वाढवण्यासाठी मुलींची भूमिका विस्‍तारली जात आहे. आज ज्या प्रकारे अन्य क्षेत्रांमध्ये महिलांना पुढे जाण्यासाठी  प्रोत्‍साहित केले जात आहे, त्याच प्रकारे आपल्या सुरक्षा व्यवस्थेतही नारी शक्तीची भूमिका अधिक व्यापक केली जात आहे. आज हवाई दलात आणि नौदलात महिलांना लढाऊ जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. लष्करी पोलिसात देखील मुलींची भर्ती केली जात आहे. बीएसएफ तर त्या अव्वल संस्थांपैकी एक आहे जिथे सीमा सुरक्षेत महिलांच्या भूमिकेचा सातत्याने विस्तार झाला आहे. असे अनेक प्रयत्न आपला आत्‍मविश्‍वास वाढवतात, देशाचा विश्‍वास वाढवतात.

मित्रांनो,

दीपावली निमित्त तुम्ही सर्वानी आणखी एक गोष्ट पाहिली असेल. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा नेहमी एका दिव्याने अन्य दिवे देखील पेटवतो. एका दिव्यातून दुसरा, असे हजार दिवे, तुम्ही देखील त्या एका दिव्याप्रमाणे संपूर्ण देशाला उजळून टाकता, त्याला  ऊर्जावान बनवता. सीमेवर तुमच्यासारख्या एकेका सैनिकाच्या शौर्यामुळे  देशवासियांमध्ये राष्‍ट्रभक्तीचा निर्धार अधिक बुलंद होतो. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक  देशबांधव आपापल्या पद्धतीने राष्ट्रहितासाठी पुढे येत आहे. कुणी स्‍वच्‍छतेच्या संकल्पात सहभागी होत आहे, कुणी भ्रष्‍टाचाराविरोधात मोहीम राबवत आहे, कुणी प्रत्येक घरात पाणी या अभियानात सहभागी झाला आहे, कुणी क्षयरोग मुक्‍त भारतासाठी  काम करत आहे, कुणी कुपोषण विरुद्ध अभियानाला बळ देत आहे, कुणी दुसऱ्याला डिजिटल व्यवहार शिकवून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

मित्रांनो,

आता तर आत्‍मनिर्भर भारत अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकाने आपले अभियान बनवले आहे. वोकल फॉर लोकल आज प्रत्येक भारतीयाचे ध्येय बनले आहे. आज भारत प्रथम, भारतीय प्रथम हा आत्‍मविश्‍वास चारही बाजूला पसरत आहे. हे सगळे शक्य होत आहे, त्यामागे तुमची ताकद आहे, तुमच्यावरील विश्वास आहे. जेव्हा देशाचा विश्‍वास वाढतो ना, तेव्हा जग तेवढ्याच वेगाने त्यानंतरही देशाला पुढे जाताना पाहत असते. चला,  विश्‍वास, आत्‍मविश्‍वासाचा हा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आपण सर्वजण पुढे येऊ.  दीपावलीच्या या पवित्र पर्वानिमित्त नवीन संकल्पांसह, नव्या उमेदीने, आपण खांद्याला खांदा लावून, एकत्रितपणे पावले टाकत एक जीवन एक मिशन सह उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रमाची पराकाष्‍ठा करत, 130 कोटींचा हा देश, आपण सर्वानी मिळून पुढे जाऊ आणि भारतमातेला ज्या रूपात शक्तिशाली, समृद्ध बनवू इच्छितो, ते स्वप्न आपण पूर्ण करूया याच एका भावनेसह तुम्ही माझ्याबरोबर सहभागी होऊन म्हणा, भारत माता की… जय, भारत माता की….जय, भारत माता की…जय। पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना  दीपावली निमित्त अनेक-अनेक शुभेच्छा, धन्‍यवाद !!

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673005) Visitor Counter : 250