पंतप्रधान कार्यालय

पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्थांचे राष्ट्रर्पण


एकात्मिक औषध प्रणालीसह सर्वांगीण पद्धतीने आरोग्यविषयक आव्हानांचा सामना केला जात आहे : पंतप्रधान

21 व्या शतकातील   जागतिक भूमिकेकरिता आयुर्वेदासाठी पुरावा-आधारित संशोधन रचना विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित

भारतात पारंपारिक औषधांसाठी डब्ल्यूएचओ जागतिक  पारंपरिक औषध  केंद्र  सुरू करणार: महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना

Posted On: 13 NOV 2020 9:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे  दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातच्या जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे.

श्रीपाद नाईक, राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), आयुष मंत्रालयराजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतगुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी भारताला लाभलेला पारंपारिक औषधांचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. कोविड -19 या जागतिक महामारीच्या काळात त्याचा फायदा आणि आरोग्यासाठी कल्याणकारी असल्याचे जगभरात ओळखले गेले.  देशात  आता रोग प्रतिबंध व निरोगी आयुष्य आणि लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सर्वांगीण व एकात्मिक औषध प्रणालींचे महत्त्व याकडे  लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताच्या पारंपारिक औषध प्रणालींनी आयुर्वेदाचे सामर्थ्य जगासमोर दाखवून दिले आहे. एकविसाव्या शतकात पुढे जाण्यासाठी आधुनिक ज्ञानासोबत सुसंगत होण्यासाठी आता वैज्ञानिक पुरावे-आधारित संशोधन रचना विकसित करणे महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. एकात्मिक औषध प्रणाली ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले. पुरावा-आधारित संशोधनासह भारत फार्मसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखला जात आहे, परंतु पारंपारिक औषध प्रणाली आणि आयुर्वेद याला आपण नवीन उंचीवर नेऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

कोरोना कालावधीत जगभर आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी वेगाने वाढली आहे असे पंतप्रधान म्हणाले. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे हळद, आले यासारख्या मसाल्यांच्या  पदार्थांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली त्यामुळे जगभरात आयुर्वेदिक उपाय आणि भारतीय मसाले यांची विश्वासार्हता  वाढल्याचे दिसून आले असे त्यांनी नमूद केले. कोरोना कालावधीत केवळ आयुर्वेद नाही तर आयुषशी  संबंधित  देशातील  आणि जगातील संशोधनाकडेही लक्ष दिले जात आहे.

आयुर्वेद हा आता पर्याय नाही, तर तो देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा आधारस्तंभ आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी या दोन प्रमुख आयुर्वेद संस्थांचे अभिनंदन केले आणि आधुनिक औषधाच्या क्षेत्रातील नवीन आव्हाने व संधींचा शोध घेण्यासाठी नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनी यावर काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. यामुळे डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटच्या अभ्यासाला चालना मिळेल.

जागतिक स्तरावर आयुर्वेदाच्या जागतिक मागणीचा अभ्यास करण्यासाठी खासगी क्षेत्र आणि स्टार्ट-अप उद्योगांना पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. तसेच या क्षेत्रातील नवीन घडामोडींसह जगभरात व्होकल फोर लोकलसाठी चॅम्पियन बनण्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जगात आरोग्य आणि वेलनेस  क्षेत्रात बदल घडवून त्याचे अग्रदूत आपण बनले पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले.

निरोगीपणाचे  महत्त्व सांगून पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेचा एक भाग म्हणून देशभरात 1.5 लाख आरोग्य व वेलनेस  केंद्रे स्थापन करण्याचा उल्लेख केला. यापैकी 12,500 केंद्रे एकात्मिक औषध प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारे आयुष वेलनेस केंद्रे असतील असे ते म्हणाले.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांचा   एक व्हिडिओ संदेश  यावेळी दाखविण्यात आला. . आयुष्मान भारत योजनेविषयी  पंतप्रधानांच्या कटिबद्धतेचे आणि आरोग्याशी संबंधित उद्दीष्टे पार पाडण्यासाठी पारंपारिक औषधांच्या पुरावा  आधारित उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी भारतात ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना करण्याची घोषणा केली. ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनसाठी भारत निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे आणि महासंचालक  आभार मानले. आयुर्वेद हा भारतीय वारसा आहे आणि भारताचे पारंपारिक ज्ञान इतर देशांनाही समृद्ध करीत आहे ही आनंदाची बाब आहे, असे डॉ टेड्रोस यावेळी म्हणाले.

2016 पासून आयुष मंत्रालय धन्वंतरी जयंती /धनतेरस निमित्त दरवर्षी आयुर्वेद दिनसाजरा करत आहे.

 

आयटीआरए, जामनगर:-

संसदेच्या अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या गुजरातमधील जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीआरए)  ही जागतिक स्तरावरील आयुर्वेदिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून उदयास येत आहे.  आयटीआरएमध्ये 12 वेगवेगळे विभाग असून, तीन वैद्यकीय प्रयोगशाळा आणि तीन संशोधन प्रयोगशाळा आहेत. पारंपरिक औषधोपचार संशोधन क्षेत्रामध्ये ही संस्था अग्रणी आहे. सध्या या संस्थेच्यावतीने 33 संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जामनगरमध्ये गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या परिसरातल्या चार आयुर्वेद संस्थांना एकत्रित करून आयटीआरएची निर्मिती करण्यात आली आहे. आयुष क्षेत्रातली ही पहिलीच संस्था असून ती राष्ट्रीय महत्वाची संस्था (आयएनआय) आहे. आता सुधारित दर्जानुसार आयुर्वेदाचे शिक्षण देणारी स्वायत्त संस्था आहे. आयटीआरएमध्ये आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर आंतर-शाखीय सहकार्यातून समकालिन आयुर्वेदाच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे.

 

एनआयए, जयपूर:-

राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेला संपूर्ण देशभरातून मान्यता मिळाली आहे. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. या संस्थेला 175 वर्षांचा वारसा लाभला असून अधिकृत आयुर्वेदाचे जतन, संवर्धन आणि उन्नती यांच्यासाठी एनआयएने मोठे योगदान दिले आहे. आयुर्वेदाचे परंपरागत ज्ञान जतन करण्यात या संस्थेचे कार्य महत्वपूर्ण आहे. सध्या एनआयएमध्ये 14 वेगवेगळे विभाग आहेत. या संस्थेमध्ये सध्या 955 विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी 75 अध्यापक आहेत. 2019-20 मध्ये या संस्थेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचे गुणोत्तर चांगले आहे. एनआयएच्यावतीने अगदी प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते डाॅक्टरेट स्तरापर्यंतचे विविध  अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अत्याधुनिक प्रयोगशाळेसह एनआयए संशोधन कार्यामध्ये आघाडीवर आहे. सध्या संस्थेमध्ये वेगवेगळे  54 संशोधन प्रकल्प सुरू आहेत. अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आल्यामुळे ही राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रामध्ये नवीन उंची गाठण्यासाठी कार्य करण्यास सिद्ध आहे.

 

Jaydevi PS/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672786) Visitor Counter : 194