पंतप्रधान कार्यालय
वाराणसीमधल्या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमी पूजन
दिवाळीमध्ये स्थानिक उत्पादनाना प्रोत्साहन देण्याचे केले आवाहन
वाराणसीच्या दळणवळण सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे वाराणसीमधल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पंतप्रधानांनाच्या हस्ते 220 कोटी रुपयांच्या 16 योजनांचा आज प्रारंभ झाला. वाराणसीमध्ये 400 कोटी रुपयांच्या 14 योजनांचे काम आधीच सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली.
सारनाथ इथला लाईट अँन्ड साउंड अर्थात प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम, राम नगर इथले लाल बहादूर शास्त्री रुग्णालय अद्ययावत करण्याचे काम, स्वच्छताविषयक कामे, गायींच्या संरक्षण आणि जोपासनेसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प, बहु उपयोगी बियाणे गोदाम, 100 मेट्रिक टन क्षमतेचे कृषी मालाचे गोदाम, आयपीडीएस टप्पा-2, संपूर्णानंद स्टेडीयममध्ये क्रीडापटूसाठी गृह संकुल, वाराणसी शहर स्मार्ट लायटिंग काम, 105 अंगणवाडी केंद्र आणि 102 गौ आश्रय केंद्र यांचा आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पात समावेश होता.
पर्यटन हा वाराणसी शहरआणि परिसराच्या विकास आराखड्याचा भाग असल्याचे सांगत पंतप्रधानांनी यावेळी म्हणाले की गंगा नदी स्वच्छता, आरोग्य सेवा, रस्ते, पायाभूत सुविधा, पर्यटन, विद्युत सेवा, युवा, क्रीडा, शेतकरी इत्यादी विविध क्षेत्रातल्या सुधारणा किती वेगाने होत आहेत याचे वाराणसी आहे. गंगा कृती आराखड्या अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी आज जाहीर केले. वाराणसीमध्ये सुरु असलेल्या घाट सुशोभीकरण, प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीचा वापर, दशाश्वमेध घाटावर पर्यटक प्लाझा यासारख्या पायाभूत कामाबाबत त्यांनी माहिती दिली.
गंगा नदीसंदर्भात सुरु असलेल्या कामांचा उल्लेख करत काशीसाठी या नव्या संधी असून इथल्या घाटांची स्थिती सुधारत आहे, स्वच्छता आणि गंगा घाट सुशोभिकरणामुळे शहराला नवा चेहरामोहरा प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले आज सुरु करण्यात आलेल्या लाईट अँन्ड साउंड शो मुळे सारनाथचे वैभव वृद्धींगत होईल असं पंतप्रधान म्हणाले. विजेच्या लटकणाऱ्या तारांपासून काशीचा बराच भाग मुक्त झाला असून भूमिगत तारांचा आणखी एक टप्पा आज पूर्ण झाला आहे. स्मार्ट एलईडी दिव्यांमुळे रस्ते अधिकच उजळून निघतील असे पंतप्रधानांनी सांगितले.
वाराणसीच्या दळणवळण सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत असल्यामुळे काशीच्या जनतेला आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही. बाबतपुरला जोडणाऱ्या रस्त्यामुळे वाराणसीला नवी ओळख मिळाल्याचे ते म्हणाले. वाराणसी विमानतळावर ६ वर्षांपूर्वी दररोज फक्त 12 विमान फेऱ्या होत होत्या त्यांची संख्या आता 48 विमान फेऱ्या अशी झाल्याचं सांगत त्यापार्श्वभूमीवर विमानतळावर दोन प्रवासी पूलाची गरज निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितले. वाराणसी इथं राहणाऱ्या आणि तिथे भेट देणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी वाराणसी मध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षात वाराणसीमध्ये आरोग्य क्षेत्रातही अभूतपूर्व पायाभूत कामे करण्यात आली आहेत. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण पूर्वांचल क्षेत्रासाठी हे आरोग्य सुविधा केंद्र उपयुक्त ठरत असल्याचे ते म्हणाले. राम नगर इथले लाल बहादूर शास्त्री रुग्णालय अद्ययावत करण्याच्या कामासह वाराणसी मध्ये आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेल्या पायाभूत कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
वाराणसी मध्ये सर्वांगीण विकास करण्यात येत असून पूर्वांचलसह संपूर्ण पूर्व भारताला याचा लाभ होत आहे. पूर्वांचलमधल्या जनतेला आता छोट्या गोष्टींसाठी दिल्ली किंवा मुंबईला जावे लागत नाही असे त्यानी सांगितले.
वाराणसी आणि पूर्वांचल मधल्या शेतकऱ्यांसाठी कृषीमालाची साठवण ते वाहतुक यासाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या असून आंतरराष्ट्रीय तांदूळ संस्था,दुध प्रक्रिया केंद्र,नाशवंत मालासाठी बांधण्यात आलेले केंद्र यांचा यात समवेश आहे. या सुविधांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. या वर्षात प्रथमच वाराणसी भागातली फळे, भाज्या आणि तांदूळ परदेशात निर्यात झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 100 मेट्रिक टन क्षमतेच्या आजपासून सुरु करण्यात आलेल्या गोदामामुळे काशी मधल्या कृषीमालाच्या साठवणूक क्षमतेत भर पडणार आहे.
गावातला गरीब वर्ग आणि शेतकरी हे आत्मनिर्भर भारताचे महत्वाचे स्तंभ आणि लाभार्थीही आहेत असे पंतप्रधान म्हणाले.नुकत्याच करण्यात आलेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा थेट लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांना सुलभ कर्ज मिळत असल्याने कोविड महामारी नंतर त्यांना काम पुन्हा सुरु करता येईल असे ते म्हणाले.
गावात राहणाऱ्यांना त्यांची जमिन आणि घर याबाबत कायदेशीर हक्क पुरवणारी स्वामित्व योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजने अंतर्गत मालमत्ता कार्ड जारी केल्याने गावात मालमत्ते वरच्या तंट्यासाठी वावच उरणार नाही. गावातले घर किंवा जमीन यावर बँके कडून कर्ज मिळणेही आता सुलभ होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज या सणासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीसाठी स्थानिक वस्तूनाच प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे स्थानिक ओळख अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
JPS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671480)
आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam