युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशातील सहा ‘खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रां’साठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून चार वर्षांसाठी 67.32 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Posted On:
07 NOV 2020 6:06PM by PIB Mumbai
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सहा खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली असून वर्ष 2020-21 आणि पुढच्या चार वर्षांत त्यांच्या अद्ययावतीकरणासाठी 67.32 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये ऑलिम्पिकसाठीच्या क्रीडा कौशल्यांना पारखून त्यांना तयार केले जाईल.
यात महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
याविषयी माहिती देतांना केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी सांगितले की, “देशभरात क्रीडा उत्कृष्टता केंद्र सुरु करण्याचा निर्णय, भारताला 2028 पर्यंत ऑलिम्पिकमध्ये जगातल्या 10 सर्वोत्कृष्ट देशांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्दिष्टाचाच एक भाग आहे. जोपर्यंत आपण या खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत नाही, तोपर्यंत आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा आपण करु शकत नाही. यापैकी प्रत्येक केंद्रात खेळाडूंना, प्रत्येक क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येईल. जिथे सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्तम दर्जाचे प्रशिक्षण घेऊ शकतील, अशा सर्व सुविधा आणि प्रशिक्षक येथे उपलब्ध असतील.प्र त्येक राज्याने या उत्कृष्टता केंद्राचे अत्यंत उत्साह आणि सकारात्मकतेणे स्वागत केले आहे, याचा मला आनंद आहे.”
या केंद्रांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांचे अद्यायावतीकरण, क्रीडा विज्ञान केंद्रांची स्थापना आणि उत्तम दर्जाचे प्रशिक्षक, फ़िजिओथेरपिस्ट, आरोग्य तज्ज्ञ अशा व्यक्तींची सेवा यांचा समावेश असेल. उत्तम दर्जाची क्रीडा उपकरणे देखील पुरवली जातील.
क्रीडा मंत्रालय सध्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात क्रीडा पायाभूत सुविधा अद्ययावत करत आहे, तसेच खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
*****
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671015)
Visitor Counter : 171