पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

हवामान बदलाविषयी खाजगी क्षेत्राचा जाहीरनामा ऐतिहासिक पाऊल : प्रकाश जावडेकर


भारत सरकार आणि खाजगी क्षेत्रादरम्यान, हवामान बदलाविषयी दीर्घकाळ आणि शाश्वत भागीदारी करण्याबाबत भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचा पुढाकार

Posted On: 05 NOV 2020 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020

पॅरिस कराराअंतर्गत भारताने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात भारत एक पाऊल पुढेच असून भारत आपल्या राष्ट्रीय कटिबद्धतेच्या योगदानानुसार (NDC’s) उद्दिष्टपूर्ती करत आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

हवामान बदलाचा सामना करताना जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सियस पर्यंत रोखण्यासाठीच्या यशस्वी उपाययोजना करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असे जावडेकर यांनी सांगितले. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी भारताने अनेक निर्णायक उपाययोजना केल्या असून, त्या केवळ शासकीय स्तरावरच नाही,तर खाजगी स्तरावर देखील करण्यात आल्या आहेत, ज्यातूनच आमची या प्रश्नाविषयीची कटीबद्धता आणि दृढनिश्चय प्रतीत होतो, असे त्यांनी सांगितले. 

देशातील 24 अग्रगण्य उद्योजक आणि पर्यावरण, वन तसेच हवामान बदल मंत्रालय यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी केलेल्या हवामानविषयक जाहीरनाम्याचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले. या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आभासी बैठकीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. उद्योगजगताने स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध केलेला हा जाहीरनामा, हवामान बदल विषयक लढ्यातले ऐतिहासिक पाऊल आहे, असे जावडेकर म्हणाले.  

हवामान बदलविषयक जाहीरनाम्यावर उद्योगजगताने स्वाक्षऱ्या करणे, अत्यंत महत्वाची घडामोड आहे. यातून या प्रश्नाविषयी भारताची कटिबद्धता आणि निश्चयाचा प्रत्यय येतो, असं सांगत संपूर्ण जगाने याची नोंद घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

 जगात अनेक लोक अनेक गोष्टी शिकवत असतात, मात्र त्या प्रत्यक्ष आचरणात आणणे अत्यंत कठीण असते. मला असे वाटते की, भारत आणि देशातील कॉर्पोरेट जगताने हाती घेतलेल्या या महत्वाच्या उपक्रमाची नोंद संयुक्त राष्ट्र परिसंस्था आणि UNFCCC ने निश्चितपणे घ्यावी, या क्षेत्राने, स्वतःचे कार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयी उपाययोजना करण्याचा निश्चय या जाहीरनाम्यातून व्यक्त केला आहे, असे जावडेकर म्हणाले.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने काय उपाययोजना किंवा उपक्रम राबवले याची नियमित माहिती सरकारला दिली जावी, असेच त्याचा अधिकाधिक प्रसारही केला जावा, अशी अपेक्षा जावडेकर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. तसेच प्रदूषण करणाऱ्या गोष्टी सरकारच्या निदर्शनात आणल्या जाव्यात. विकसित अर्थव्यवस्थांकडून, वित्तीय आणि तांत्रिक सहकार्य मिळवण्यासाठी सरकार आणि उद्योगजगताला एका विचाराने काम करावे, लागेल तरच भारत प्रगती करु शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला टाटा, रिलायंस, अदानी ग्रुप, महिंद्रा, सन फार्मा, डॉ रेड्डी’ज यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. हवामान बदलविषयक प्रयत्नांत सरकारला संपूर्ण सहकार्य करत समन्वयाने काम करु, अशी ग्वाही कॉर्पोरेट जगताने या कार्यक्रमात दिली. पॅरीस कराराची उद्दिष्टे पूर्ण करण्यात भारताला यश मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कमी कार्बन शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करण्यात खाजगी क्षेत्रांची भूमिका महत्वाची असून त्यांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी  स्वयंस्फूर्तीने अनेक कृती केल्या आहेत, जेणेकरुन भारताला राष्ट्रीय कटिबद्धता योगदानाची उद्दिष्टे गाठ्ण्यात मदत होईल. भारताच्या क्योटो करारातील स्वच्छ विकास यंत्रणेत सहभागी होण्याच्या निर्णयाचा खाजगी क्षेत्रांना देखील लाभ मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक परिषदेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या पॅरिस करारावर भारतानेही स्वाक्षरी केली आहे. भारताच्या स्वत:च्या राष्ट्रीय कटिबद्धता योगदानाच्या (NDC) भारताची तीन उद्दिष्टे आहेत. वर्ष 2030 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात उत्सर्जन  33 ते  35 टक्क्यांनी कमी करणे, एकूण ऊर्जानिर्मितीतील 40 टक्के ऊर्जा बिगर-जीवाष्म इंधनापासून (स्वच्छ उर्जा) तयार करणे आणि 2030 पर्यंत अधिक झाले आणि वनीकरण करुन अतिरिक्त 2.5 ते  3 अब्ज टन कार्बन शोषून घेण्याची क्षमता विकसित करणे.

संपूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी इथे क्लिक करा.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670377) Visitor Counter : 669