जलशक्ती मंत्रालय

केंद्रीय जल शक्ती मंत्र्यांनी जल जीवन मिशन प्रगतीचा घेतला आढावा, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 महामारीच्या काळातही ग्रामीण घरांना नळजोडणी दिल्याबद्दल केले कौतुक


जल जीवन मिशनमुळे लोकांच्या जीवन सुकर होवून, राहणीमान उंचावून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल- शेखावत

Posted On: 03 NOV 2020 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्र्यांबरोबर आभासी परिषद घेतली आणि जल जीवन मिशनचा आढावा घेतला. ग्रामीण भागामध्ये 2024 पर्यंत सर्वांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेच्या कामांची प्रगती यावेळी मंत्र्यांनी जाणून घेतली. या आभासी परिषदेमध्ये जल शक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया, हरियाणा आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी कामांचे नियोजन करून ग्रामीण भागातल्या उर्वरित सर्व घरांना लवकरात लवकर नळ जोडणी देण्याविषयी चर्चा करण्यात आली. 

संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही ग्रामीण भागामध्ये नळ जोडणी देण्याचे काम करण्यात आले, या अनुकरणीय कामाबद्दल गजेंद्रसिंह शेखावत यांनी सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कौतुक केले. जल जीवन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी नळ पाणी पुरवठा योजनंाच्या अंमलबजावणीला वेग देण्याचे त्यांनी आवाहन केले. 

या परिषदेनंतर शेखावत यांनी प्रसार माध्यमांच्या  प्रतिनिधींना जल जीवन मोहिमेच्या प्रगतीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले असून ग्रामीण भागातले जीवनमान उंचविण्यासाठी आणि लोकांचे जीवन अधिक सुकर व्हावे, यासाठी घराघरांमध्ये नळाने पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. नळासाठी लागणारे प्लंबर्स तसेच विद्युत मोटारचालक यांची आवश्यकता निर्माण होत असून त्यासाठी होतकरूंना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे शेखावत यांनी सांगितले. 

‘हर घर जल’ सुनिश्चित करण्यासाठी केंद्र  सरकार अथक प्रयत्न करीत आहे. आज झालेल्या आभासी परिषदेमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेचे उत्तम काम करणा-या राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली, असेही मंत्री शेखावत यांनी सांगितले. 

नियोजित विशिष्ट कालमर्यादेमध्ये 100 टक्के नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करणा-या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची माहिती पुढील प्रमाणे आहे: 

  • 100 टक्के वाहिनीव्दारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट 2020 मध्ये पूर्ण झाले  - गोवा 
  • 100 टक्के वाहिनीव्दारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट 2021 मध्ये पूर्ण करणार - अंदमान आणि निकोबार बेटे, बिहार, पुडुचेरी, तेलंगणा
  • 100 टक्के वाहिनीव्दारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट 2022 मध्ये पूर्ण करणार - हरियाणा, जम्मू आणि काश्मिर, लडाख, हिमाचल प्रदेश, गुजरात, मेघालय, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश.
  • 100 टक्के वाहिनीव्दारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट 2023 मध्ये पूर्ण करणार - अरूणाचल प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालँड, तामिळनाडू, त्रिपुरा
  • 100 टक्के वाहिनीव्दारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट 2024 मध्ये पूर्ण  करणार - आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल.

(या मोहिमेचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.)


* * *

M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669840) Visitor Counter : 313