वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची भारताच्या यजमानपदाखाली बैठक


कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था वेगाने सावरण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक वृद्धिंगत करण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे एससीओ राष्ट्रांना आवाहन

Posted On: 28 OCT 2020 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020


शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची भारताच्या यजमानपदाखाली आज 19 वी बैठक झाली. 

कोविड-19 मुळे निर्माण झालेली संकटाची स्थिती म्हणजे  आर्थिक बळ एकवटून या भागात व्यापार आणि गुंतवणुक वृद्धिंगत करणाऱ्या भागीदारी शोधण्यासाठीची हाक असल्याचे वाणिज्य आणि उद्योग  मंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले.

एससीओ अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी सहकार्य सुरूच ठेवायला हवे असे सांगतानाच महामारीतून लवकर सावरण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक देशाच्या जगाकडे पाहण्याच्या  दृष्टीकोनाला त्याच्या संस्कृती आणि तात्विक बैठकीमुळे आकार प्राप्त होतो. प्राचीन काळापासून संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब ’वसुधैव कुटुंबकम’ अशी भारताची धारणा आहे असे त्यांनी सांगितले. 

वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री  हरदीपसिंह पुरी यांनीही आपले विचार मांडले. दुरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीला एससीओ चे महासचिव आणि किरगीझ रिपब्लिक, कझाकस्तान, पाकिस्तान,रशिया, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांचे मंत्री उपस्थित होते. 

या बैठकीत चार दस्तावेजांचा स्वीकार करण्यात आला-

  1. कोविड-19 संदर्भातल्या प्रतिसादाबाबत निवेदन- औषध प्राप्ती  आणि व्यापार सुलभ करण्यासाठी अधिक सहकार्याच्या गरजेचा पुनरुच्चार यामध्ये करण्यात आला आहे. 
  2. जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असणाऱ्या  एससीओ देशांच्या मंत्र्यांचे बहुपक्षीय व्यापार प्रणालीबाबत निवेदन. नियमाधारित बहुपक्षीय वाटाघाटीचे महत्व यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. 
  3. बौद्धिक संपदा हक्काबाबत एससीओ सहकार्याबाबत निवेदन- बौद्धिक संपदा विषयक सहकार्याबाबत तसेच कायदा आणि अंमलबजावणी याबाबत माहिती/अनुभव यांची देवाण घेवाण,आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सहकार्य यांचा  समावेश आहे. 
  4. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात एससीओ चौकटीत राहून सहकार्याला गती देणाऱ्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा. एमएसएमई मध्ये माहितीचे आदान-प्रदान, संशोधन आणि क्षमता वृद्धी क्षेत्रात सहयोग यासह इतर क्षेत्रात सहकार्य. 

या बैठकीची फलनिष्पत्ती ही एससीओ ऐक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असण्यावर गोयल यांनी भर दिला. 


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668229) Visitor Counter : 167