कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सतर्कता जागरूकता सप्ताह, 2020

Posted On: 25 OCT 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोग, येत्या 27 ऑक्टोबर 2020 पासून ते 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत दक्षता जागरूकता (सतर्कता) सप्ताहाचे पालन करत आहे. दरवर्षी ज्या आठवड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येते, त्या सप्ताहात सतर्कता जागरुकता सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या आमच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. 

यंदाच्या 2020 या वर्षी हा सप्ताह दिनांक 27 ऑक्टोबर 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 या कालावधीत "सतर्क भारत, समृध्द भारत- Satark Bharat, Samriddh Bharat (Vigilant India, Prosperous India)” ही संकल्पना घेऊन साजरा करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विषय सुचविण्यात येऊन आणि प्रस्तावित विषयावर मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे  मत घेऊन त्यानुसार हा विषय नक्की करण्यात आला आहे.

"केंद्रीय अन्वेषण विभाग, दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयावर एका राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करत असून, दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाला संबोधित करून त्याचे उद्घाटन करतील, जे थेट प्रक्षेपित करण्यात येईल आणि केंद्र सरकारच्या सर्व संघटना/विभाग ते प्रत्यक्ष पाहु शकतील.

यावेळी मास्क बांधणे, दोन मीटर अंतर राखणे, वारंवार हात धुणे या कोविड-19 चा प्रतिबंध रोखण्यासाठी पालन करण्याच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांचे कठोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व ठिकाणे/विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दिनांक 4.9.2020 रोजी अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने ओ.एम. 7[2] ई कार्ड /2020 या अंतर्गत सूचित केलेल्या खर्च कपातीच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

भ्रष्टाचार हा, राष्ट्राच्या प्रगतीतील प्रमुख अडथळा आहे, असे आयोगाचे मत आहे. समाजातील सर्व घटकांनी आपल्या राष्ट्रीय जीवनातील सचोटीचे रक्षण करण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. आयोगाची अशी इच्छा आहे, की सर्व संस्थांनी आपल्या अंतर्गत कार्यवाहीबाबत दक्ष रहायला हवे. या कार्यवाह्या वर्षाच्या दक्षता सप्ताहातील मोहीमेचा भाग असतील. यामध्ये अंतर्गत कारभारातील सुधारणा, निश्चित वेळेत कामे पूर्ण करणे आणि तांत्रिक सुधारणांसह सर्वांगीण विकास साधणे, या बाबींचा समावेश आहे. आऊट सोर्स केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणे, घर वाटप, भू-आलेखांसह सर्व मालमत्तांचे अद्ययावतीकरण आणि संगणिकीकरण करणे, जुने फर्निचर काढून टाकणे आणि निर्धारित प्रक्रिया/सध्याच्या नियमांचे पालन करत जुने रेकॉर्ड नष्ट करणे, इत्यादी कामांसह सर्व कामांत पारदर्शकता आणणे यावर आयोगाचा भर  आहे. 

संघटनांना आपल्या सर्व कामांत सुधारणा करणे ओळखून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपला कारभार आपापल्या संकेतस्थळावर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करायला सांगितले आहे, त्याचप्रमाणे सर्वांगीण सुधारणांसाठी आणि सुशासनाच्या व्यापक प्रसारासाठी त्या केंद्रीय दक्षता आयोगाकडे पाठविण्यास सांगितले आहे. 

दक्षता निवारणाच्या कार्याचा, बँकेचे परीविक्षाधीन अधिकारी आणि वैज्ञानिक आणि इतर गटातील कर्मचाऱ्यांच्या पायाभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमात समावेश केला आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांतील 'अ' वर्गाच्या सेवांतील मध्यम स्तरातील अधिकाऱ्यांसाठी मिड करीअर प्रशिक्षण कार्यक्रमात देखील दक्षता निवारणाचे प्रशिक्षिण समाविष्ट केले आहे. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विचारात परीवर्तन घडवून आणण्यासाठी उत्तम कार्य करणाऱ्या संस्था आणि गावांत भेटी आयोजित केल्या जातील.

सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येत आहे, की त्यांनी आयोगाने प्रसारित केलेल्या सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घ्यावी. विक्रेते, पुरवठादार, ठेकेदार, अशा सर्व संबंधित व्यक्तींना देखील प्रतिज्ञा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

आयोगाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये/आस्थापनांना या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमांचे आपापल्या ठिकाणी तसेच बाहेर जाऊन जनता/नागरीकांसाठी संचालन करावे, अशी विनंती केली आहे:

  1. आपल्या संकेतस्थळाचा उपयोग कर्मचारी/उपभोक्ता यांच्यासाठी सर्व माहिती उपलब्ध करुन देत तक्रार निवारणासाठी करण्याच्या उपाययोजना सुलभ कराव्यात.
  2. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कार्यक्रम आयोजित करावेत आणि भारताला समृध्द करण्यासाठी सतर्क भारताच्या आवश्यकतेवर भर द्यावा. ऑनलाईन पध्दतीचा जास्त प्रमाणात वापर करावा.
  3. जागरूकता वाढविण्यासाठी सामाजिक माध्यमे, अधिकाधिक संदेश/ई मेल, व्‍हॉट्स अप, इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट माध्यमाचा वापर करावा.

 

* * *

B.Gokhale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667508) Visitor Counter : 386