जलशक्ती मंत्रालय
मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर जल जीवन अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन
Posted On:
25 OCT 2020 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2020
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी जल जीवन अभियानांतर्गत दोन गावांसाठी दोन पाणीपुरवठा प्रकल्पांचे उद्घाटन केले. भारत- म्यानमार सीमेवरची दोन गावे दुर्गम आहेत आणि एकेकाळी तिथे दहशतवादाचा सुळसुळाट होता मात्र आता जल जीवन अभियानांतर्गत नियमित पाणीपुरवठा होत आहे. मणिपूरमधील चंदेल या महत्वाकांक्षी जिल्ह्यातील खेंगजॉय उपविभागातील खंगबरोल गाव जिल्हा मुख्यालयापासून 69 कि.मी. अंतरावर आहे. हे गाव भारत म्यानमार सीमेपासून 30 किमी अंतरावर आहे. गावात 82 कुटुंबे आहेत. 2041 पर्यंत अंदाजे 1000 लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा तयार केली आहे. अंदाजे 60 लाख रुपये खर्चून या गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा प्रणालीने सध्या सुमारे 450 लोकसंख्या असलेल्या सर्व 82 कुटुंबाना नळाद्वारे पाणी जोडणी सुनिश्चित केली. प्रक्रिया स्थळापासून 6 किमी अंतरावर असलेल्या “खंगबरोलोक” इथून पाण्याचे बारमाही स्रोत आहे. स्त्रोत प्रक्रिया केंद्रापेक्षा अधिक उंचीवर असल्याने, गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. चांदेल जिल्ह्यातील खेंगजॉय उपविभागातील आणखी एक खेंगजॉय हे गाव मुख्यालयापासून 60 कि.मी. अंतरावर आहे. हे गाव भारत-म्यानमार सीमेपासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर आहे. नव्याने उद्घाटन केलेली पाणीपुरवठा प्रणाली नळ जोडणीद्वारे 73 कुटुंबांची पाण्याची गरज भागवते. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा नियमित आणि दीर्घकाळ पुरवठा करण्यासाठी जल जीवन अभियानांतर्गत योजनेची अंमलबजावणी व देखभाल ही ग्रामीण पाणी व स्वच्छता समितीकडे आहे.
डोंगराळ भागात पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत सुगम्यता हे सर्वात मोठे आव्हान राहिले आहे कारण पावसाळ्यात इथला संपर्क तुटतो. विशिष्ट वेळेलाच सामग्रीची वाहतूक करणे केवळ शक्य आहे. तसेच सर्व साहित्य एकतर इम्फाल / पॅलेल शहरातून आणले जाते. संपर्क हे सर्वात मोठे आव्हान आहे कारण या क्षेत्राचे नेटवर्क कव्हरेज खराब आहे. कोविड -19 महामारी असूनही सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधिका्यांनी या दुर्गम खेड्यातल्या प्रत्येक ग्रामीण घरात नळाचे पाणी पोहोचावे यासाठी परिश्रम घेतले.
मणिपूरमध्ये जलजीवन अभियानाच्या अंमलबजावणीचा मध्यावधी आढावा नुकताच घेण्यात आला, ज्यामध्ये मणिपूर राज्यातील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय जल जीवन अभियान पथकासमोर प्रगती सादर केली. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये अभियानाच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक मध्यावधी आढावा घेण्यात येत आहे, ज्यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ग्रामीण घरांमध्ये तसेच संस्थात्मक यंत्रणेत नळाद्वारे पाण्याच्या जोडणीची स्थिती सादर करत आहेत.
सन 2020-21 मध्ये मणिपूर राज्यासाठी 131.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 32.95 कोटी रुपये राज्याला देण्यात आले आहेत. भौतिक आणि आर्थिक कामगिरीवर आधारित अतिरिक्त तरतुदीसाठी राज्य पात्र आहे. मणिपूरला 15 व्या वित्त आयोगांतर्गत 177 कोटी रुपये पीआरआयला देण्यात आले आहेत आणि त्यातील 50% पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार असल्याने या निधीचा ग्रामीण पाणीपुरवठा, टाकाऊ -पाणी व्यवस्थापन आणि महत्वाचे म्हणजे दीर्घकालीन देखभाल सुनिश्चित करण्यासाठी केला जाणार आहे.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667499)
Visitor Counter : 183