युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
टेबल टेनिससाठीच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरालाभारतीय क्रीडा प्राधिकरणाची मान्यता; टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया घेणार सोनपत येथे शिबिर
Posted On:
24 OCT 2020 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने टेबल टेनिसच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी मान्यता दिली असून, ते 28 ऑक्टोबर ते 8 डिसेंबर या काळात घेतले जाणार आहे. शिबिरामध्ये 11 खेळाडू (5 पुरूष, 6 महिला) आणि चार सहयोगी कर्मचारी यांचा समावेश असलेले हे शिबिर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कूल, सोनपत येथे घेतले जाणार आहे. या शिबिरासाठी एकूण सुमारे रुपये 18 लाख खर्चाची मान्यता देण्यात आली आहे (अधिक हवाई प्रवास आणि वैद्यकीय खर्च).
शिबिरार्थींसाठी दिल्ली पब्लिक स्कूल, सोनपत येथील निवासी व्यवस्थेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. क्रीडा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्थापित केलेल्या मानक कार्यपद्धतीचे हे शिबिर पालन करेल. यावर्षी मार्चमध्ये देशभरात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर टेबल टेनिससाठी आयोजित करण्यात आलेले हे पहिले राष्ट्रीय शिबिर आहे.
चार वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अचंता शरद कमल हे पुरुष प्रशिक्षण गटात सहभागी होणार आहेत. तेथे मानुष शाह, मानव ठक्कर, सुधांशु ग्रोव्हर आणि जुबीन कुमार देखील सहभागी होणार आहेत. महिलांच्या प्रशिक्षण गटात अनुशा कुटुंबले, दिया चितळे, सुथिर्था मुखर्जी, अर्चना कामत, तकेमी सरकार आणि कौशनी नाथ यांचा समावेश असेल.
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना विकास गटाचा भाग असलेली आणि 2018 च्या युवा ऑलिम्पिक्समध्ये उपान्त्य फेरीतील खेळाडू असलेली अर्चना कामत या शिबिराच्या वातावरणात पुन्हा येण्याबद्दल उत्सुक आहे आणि बऱ्याच दिवसांनंतर तिची संघातील सहकाऱ्यांशी भेट होणार आहे, “मी बंगळुरू येथे माझ्या मूळ गावी प्रशिक्षण घेत होते परंतु, पुन्हा प्रशिक्षण शिबिराच्या वातावरणात परत येण्याची उत्सुकता आहे. जिथे मला बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघात असलेले माझे सहकारी भेटतील आणि त्यांच्याबरोबर मला प्रशिक्षण घेता येईल.” कामत पुढे म्हणाली की, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि त्यामध्ये खेळणे हे तिचे अंतिम लक्ष्य आहे, त्यामुळे सध्या ती फक्त एकावेळी एका सामन्यावर सध्या लक्ष केंद्रित करीत आहे.
अलिकडच्या काळात 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 8 पदके जिंकून त्याच वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदके जिंकून भारताने टेबल टेनिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667369)
Visitor Counter : 156