पंतप्रधान कार्यालय

ग्रँड चॅलेंजस वार्षिक बैठक 2020 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण

Posted On: 19 OCT 2020 11:51PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

मेलिंदा आणि बिल गेट्स, माझ्या मंत्रीमडळातील केंद्रीय मंत्री, डॉ हर्ष वर्धन, जगभरातील प्रतिनिधी, वैज्ञानिक, नवोन्मेषी, संशोधक, विद्यार्थी, मित्रहो, या सोळाव्या ग्रॅण्ड चॅलेंजस वार्षिक सभेमध्ये आपणा सर्वांसोबत सहभागी होत असल्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो आहे.

खरे तर ही सभा भारतात आयोजित केली जाणार होती. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे आभासी पद्धतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जगभर थैमान घालणाऱ्या साथीचा रोगही आपणा सर्वांना परस्परांपासून दूर ठेवू शकला नाही, ही खरोखर तंत्रज्ञानाची कमाल आहे. हा कार्यक्रम वेळापत्रकानुसारच होतो आहे. तंत्रज्ञानाबरोबरच ग्रॅण्ड चॅलेंजस समुदायाची वचनबद्धताही याद्वारे अधोरेखित झाली आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे आणि नाविन्यतेची कास धरून आगेकूच करणे, ही वृत्ती यातून दिसून येते.

 

मित्रहो,

विज्ञान आणि नाविन्यतेसाठी गुंतवणूक करणारा समाजच भविष्याला आकार देईल. मात्र कमी काळात हे साध्य होणार नाही. त्यासाठी विज्ञान आणि नावीन्यता क्षेत्रात आधीपासूनच गुंतवणूक करावी लागेल. असे करू, तेव्हाच आपण त्यापासून योग्य वेळी फायदा मिळवू शकू. त्याचबरोबर नवकल्पनांच्या या प्रवासाला सहकार्यातून आणि लोकसहभागातून आकार देणे गरजेचे आहे.  विज्ञानाची कास धरली तरी जगापासून अलिप्त राहून समृद्धी प्राप्त करता येणार नाही. ग्रँड चॅलेंज उपक्रमाने ही मेख जाणली आहे. ज्या प्रमाणावर हा कार्यक्रम राबविला जातो आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

जागतिक स्तरावर 15 वर्षे आपण अनेक देशांसोबत कार्यरत आहात. आपण ज्या समस्यांसंदर्भात कार्य करीत आहात, त्यांचे स्वरूप वैविध्यपूर्ण आहे. आपण प्रतिजैविके प्रतिरोध, माता आणि बालकांचे आरोग्य, कृषी, पोषण, डब्ल्यूएएसएच - पाणी, स्वच्छता आणि आरोग्य अशा समस्या सोडविण्यासाठी जागतिक प्रतिभावंतांना हाताशी धरले आहे. याशिवाय इतरही अनेक स्वागतार्ह उपक्रम राबविले जात आहेत.

 

मित्रहो,

जगभरात थैमान घालणाऱ्या या साथरोगाने आपल्याला पुन्हा एकदा संघभावनेच्या महत्वाची जाणीव करून दिली आहे. अशा प्रकारच्या साथरोगांना भौगोलिक सीमा नसतात. कोणताही साथरोग धारणा, वंश, लिंग किंवा रंगभेद जाणत नाही. आणि असे अनेक आजार, मी केवळ सध्या पसरलेल्या साथरोगाबद्दल बोलत नाही. असे अनेक संसर्गजन्य असलेले आणि नसलेले रोग लोकांसाठी, विशेषत: तरूण पिढीसाठी त्रासदायक ठरत आहेत.

 

मित्रहो,

भारतात आमच्याकडे एक सक्षम आणि उत्साही वैज्ञानिक समुदाय आहे. आमच्याकडे खूप चांगल्या वैज्ञानिक संस्थाही आहेत. या सर्व संस्था म्हणजे भारताची मोलाची संपदा आहेत. विशेषत: गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड–19 सोबत दोन हात करताना प्रादुर्भाव रोखण्यापासून प्रतिकार क्षमता वाढविण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.

 

मित्रहो,

भारताच्या आकाराने, प्रमाणाने आणि विविधतेने जागतिक समुदायाची उत्सुकता नेहमीच वाढवली आहे. आमच्या देशाची लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे. आमच्या अनेक राज्यांची लोकसंख्या  युरोपियन देशांइतकीच आहे. मात्र तरीही, लोकशाहीप्रधान अशा आमच्या भारतात कोविड – 19  मुळे दगावणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात राहिली आहे. आजघडीला आमच्या देशात नव्या रूग्णसंख्येत दररोज घट होत असून रूग्ण बरे होण्याचा दरही सुधारतो आहे. भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक अर्थात 88 टक्के इतका आहे. हे शक्य होऊ शकले, कारण सुरूवातीच्या काळात काही शेकडो रूग्ण आढळून आले तेव्हाच लवचिक टाळेबंदी स्वीकारणारा भारत हा पहिला देश होता. मास्कचा वापर करण्यास प्रोत्साहन देणारा भारत हा पहिला देश होता. कोवीड -19 रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम भारताने तातडीने हाती घेतले. त्वरेने प्रतिजैविक चाचण्या सुरू करण्यातही भारताने पुढाकार घेतला. सीआरआयएसपीआर जनुक संपादन तंत्रज्ञानाचाही भारताने नाविन्यपूर्ण वापर केला.

 

मित्रहो,

कोविड-19 साठी लस विकसित करण्याच्या बाबतीतही भारत आघाडीवर आहे. आपल्या देशात स्वदेशी बनावटीच्या 30 पेक्षा जास्त लसी विकसित केल्या जात आहेत, त्यापैकी तीन प्रगत टप्प्यात आहेत. आम्ही इतक्यावरच थांबलेलो नाही. सक्षम अशी लस वितरण यंत्रणा उभारण्यासाठी भारत कार्यरत आहे. आमच्या नागरिकांच्या लसीकरणाची खातरजमा करण्यासाठी डिजिटल आरोग्य ओळखपत्रासह डिजिटलाइज्ड नेटवर्कचा वापर केला जाईल.

 

मित्रहो,

कोविड व्यतिरिक्तसुद्धा, इतर व्याधींसाठी कमी किंमतीत दर्जेदार औषधे आणि लस तयार करण्याची क्षमता भारताने सिद्ध केली आहे. जागतिक लसीकरणासाठी 60 टक्क्यांपेक्षा जास्त लसींचे उत्पादन भारतात घेतले जाते आहे. आमच्या इंद्रधनुष लसीकरण कार्यक्रमात आम्ही स्वदेशी रोटाव्हायरस लसीचा समावेश केला. दीर्घकालीन परिणामांसाठी सक्षम अशा भागीदारीचे हे एक यशस्वी उदाहरण आहे. गेट्स फाऊंडेशन सुद्धा या प्रयत्नांमध्ये सहभागी आहे. भारताच्या अनुभवासह आणि संशोधन प्रतिभेसह, आम्ही जागतिक आरोग्यसेवेच्या केंद्रस्थानी आहोत. या क्षेत्रात इतर देशांना त्यांची क्षमता वाढविण्याच्या कामी आम्हाला मदत करायची आहे.

 

मित्रहो,

गेल्या सहा वर्षांत आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले, जे चांगल्या आरोग्य सेवा यंत्रणेच्या कामी उत्कृष्ट योगदान देत आहेत. स्वच्छतेसारखा विषय बघा. वाढलेली स्वच्छता. शौचालयांचे वाढते प्रमाण. यामुळे सर्वात जास्त मदत कोणाची होते? यामुळे गरीब आणि वंचित लोकांची मदत होते. यामुळे रोगांचे प्रमाण कमी होते. या बाबी महिलांसाठी सुद्धा उपयुक्त ठरल्या आहेत.

 

मित्रहो,

आता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आणखी काही रोगांच्या प्रमाणात घट होईल. आम्ही आणखी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करीत आहोत, विशेषत: ग्रामीण भागात ही महाविद्यालये स्थापन करत आहोत. यामुळे तरूणांना अधिक संधी उपलब्ध होतील. तसेच आमच्या ग्रामीण भागात अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील. आम्ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना राबवित आहोत आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल, याची खातरजमा करत आहोत.

 

मित्रहो,

आपण स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच सामूहिक कल्याणासाठीही या सहयोगी भावनेचा वापर करत राहू. गेट्स फाऊंडेशन आणि इतर अनेक संस्था उत्कृष्ट कार्य करीत आहेत. पुढचे तीन दिवस आपण उपयुक्त आणि फलदायक चर्चा कराल, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. या ग्रॅंड चॅलेंजेस व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक उत्साहवर्धक उपाययोजना समोर येतील, अशी आशा मला वाटते. विकास साध्य करण्यासाठी या मंचाच्या माध्यमातून मानवकेंद्रीत उपाययोजना प्राप्त व्हाव्यात, त्याचबरोबर उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या तरूणांना विचारी नेतृत्व म्हणून विकसित होण्याची संधी प्राप्त व्हावी, असे मला वाटते. मला येथे आमंत्रित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो.

धन्यवाद. मनापासून धन्यवाद!

*****

U.Ujgare/M.Pange/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1666065) Visitor Counter : 183