विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
हिमालयीन क्षेत्रामध्ये हिंग लागवडीला प्रारंभ करून सीएसआयआर-आयएचबीटीने (CSIR-IHBT) रचला इतिहास
Posted On:
19 OCT 2020 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2020
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असलेल्या पालमपूरच्या हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम लाहौल खो-यामध्ये हिंगाची लागवड करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात आला आहे. हिमालयीन क्षेत्रात असलेल्या अतिशय थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिंगाची लागवड करण्यात येत आहे. या भागामधील अतिथंडीमुळे खूप मोठे क्षेत्र कोणत्याही पिकाविना पडीक राहते. त्या पडीक जमिनीचा वापर करण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले हिंगाचे बियाणे लावण्यात येवून येथे हिंगाची शेती करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात येत आहे.
भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये हिंगाला महत्वाचे स्थान आहे. भारतामध्ये हिंगाचा वापर प्रचंड प्रमाणावर केला जातो. देशाची हिंगाची गरज पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तान, इराण आणि उजबेकिस्तान या देशांकडून भारत सुमारे 1200 टन कच्च्या स्वरूपातला हिंग आयात करतो. यासाठी देशाला अंदाजे 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर दरवर्षी खर्च करावे लागतात. रोजच्या वापरातला हिंग तयार करण्यासाठी, तो मिळविण्यासाठी फेरूला अॅसा फोइटिडा या जातीच्या झाडांची लागवड करावी लागते. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या साधन-सामुग्रीचा अभाव आपल्याकडे होता. आता मात्र ही सुविधा उपलब्ध झाली आहे. सीएयआयआर-आयएचबीटीचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी दि. 15ऑक्टोबर, 2020 रोजी लाहौल खो-यातल्या कवारिंग या खेड्यातल्या एका शेतक-या च्या शेतामध्ये हिंगाच्या झाडाची पहिल्यांदा लागवड केली.
गेल्या तीस वर्षात देशात अशा प्रकारे हिंगाचे बियाणे लावण्याचा हा पहिलाच प्रयत्न झाला आहे, अशी माहिती आयसीएआर- एनबीपीजीआर यांनी दिली आहे. हिंगाचे झाड अतिशीत आणि कोरड्या हवामानामध्ये चांगले वाढते. त्यामुळे हिमालयीन क्षेत्रातल्या अतिथंड प्रदेशामध्ये हिंगाची लागवड करणे योग्य ठरणार असल्याने, या भागात हिंगाची लागवड करण्यात आली आहे.
हिंग लागवडीसाठी या विज्ञानविषयक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना मान्यता देऊन हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दि. 6 मार्च, 2020 रोजी आपल्या अंदाजपत्रकावरील भाषणात राज्यात हिंगाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची आणि या राज्याला हिंग उत्पादन करणारे राज्य म्हणून वेगळे ओळख निर्माण करून देण्याची घोषणा केली होती.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665859)
Visitor Counter : 299