आदिवासी विकास मंत्रालय

छत्तीसगड येथील एमएफपी महामंडळ आणि आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयाची ट्रायफेड ही संस्था उद्या “टेक फॉर ट्रायबल्स” उपक्रमाची सुरुवात करणार

Posted On: 12 OCT 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020


केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या  अधिपत्याखाली असलेली ट्रायफेड अर्थात आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळ ही संस्था, छत्तीसगड येथील एमएफपी महामंडळ आणि आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त सहकार्याने उद्या “टेक फॉर ट्रायबल्स” या नव्या उपक्रमाची सुरुवात करणार आहे. वनधन योजनेच्या आदिवासी लाभार्थ्यांना  उच्च पातळीचे तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ट्रायफेडने ईएसडीपी अर्थात औद्योगिक कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे  सहकार्य  घेतले असून, त्यांच्या माध्यमातून  वनधन योजनेच्या आदिवासी लाभार्थ्यांना त्यांचे शाश्वत स्वरूपाचे उद्योग विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे कौशल्य मिळविणे आणि त्यांच्यातील औद्योगिक क्षमतेचा विकास करणे यासाठी मदत पुरविण्यात येणार आहे. “टेक फॉर ट्रायबल्स” नामक या नव्या उपक्रमाद्वारे वन धन केंद्रांतर्फे चालविण्यात येणाऱ्या स्व-मदत गटांच्या माध्यमातून उद्योजकता विकास, पायाभूत कौशल्ये, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसायाचा विकास या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या संदर्भात आदिवासींचा सर्वंकष विकास घडवून आणला जाणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत ट्रायफेडने महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ,कर्नाटक,ओडिशा,तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये वन धन-ईएसडीपी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी आयआयटी कानपूर, बंगलुरुची आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था, मुंबईची टीस ही संस्था, भुवनेश्वरची कीस ही संस्था, तामिळनाडूचे विवेकानंद केंद्र तसेच राजस्थानची सृजन ही संस्था यांच्यासारख्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी करार केले आहेत. देशातील आदिवासी समाजाला :आत्मनिर्भर” करण्याच्या दृष्टीने “टेक फॉर ट्रायबल्स” हा अत्यंत एकमेवाद्वितीय कार्यक्रम ठरणार असून त्याद्वारे आदिवासी समाजातील उद्योजक आणि शहरी भागातील बाजार यांच्यातील अंतर भरून काढण्यावर भर दिला जाणार आहे.

“टेक फॉर ट्रायबल्स” हा उपक्रम 30 दिवसांचा असून तो सहा आठवड्यांच्या कालावधीत 120 भागांमध्ये घेतला जाईल. सुरुवातीला छत्तिसगढ राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील वनधन लाभार्थ्यांसाठी 12ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सूक्ष्म उद्योग निर्मिती, त्या उद्योगाचे व्यवस्थापन आणि  कार्यान्वयन या विषयांचा उहापोह केला जाईल.कानपूरच्या आयआयटी संस्थेतील तज्ञांनी विकसित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार ऑनलाईन व्याख्याने आणि प्रशिक्षण, ऑनलाईन कार्यशाळा आणि हळू हळू प्रत्यक्ष समोरासमोर संवाद, प्रात्याक्षिके, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी या टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना विषयाची माहिती दिली जाईल.

निर्मिती क्षेत्रातील उत्तम पद्धतींची माहिती करून देण्यासाठी उद्योगांच्या ठिकाणी दिलेल्या डेमोच्या माध्यमातून निर्मिती, उत्पादनाचा एकूण दर्जा, स्वच्छता आणि बाजारात पाळली जाणारी प्रमाणित मानके यांचा देखील या प्रशिक्षणात समावेश आहे. हा कार्यक्रम मुख्यतः सहभाग, क्षमता बांधणी आणि बाजाराशी जोडणी या शाश्वत उद्योजकता विकास कार्यक्रमाची त्रिसूत्री मानल्या गेलेल्या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर आधारित आहे.

 

* * *

M.Iyengar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663764) Visitor Counter : 205