पंतप्रधान कार्यालय

कॅनडामधील "इन्व्हेस्ट इंडिया" परिषदेत पंतप्रधानांचे बीजभाषण

Posted On: 08 OCT 2020 10:44PM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्ते !

सर्व प्रथम, हा मंच तयार केल्याबद्दल मी प्रेम वत्सा यांचे अभिनंदन करू इच्छितो. या मंचावर कॅनडामधील अनेक  गुंतवणूकदार आणि उद्योजक  पाहून समाधान वाटत आहे.  भारतातील प्रचंड गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी तुमच्यासमोर सादर होत असल्याचा मला आनंद आहे.

मित्रांनो, प्रेक्षकांमधील बहुतेक लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे  इथे गुंतवणूक बाबतचे निर्णय घेणारे लोक आहेत. जोखमीचे मूल्यांकन या निर्णयामुळे करता येऊ शकते. गुंतवणूक करताना परताव्याचा अंदाज घेणारे हे  निर्णय असतात.

मला तुम्हाला विचारायचे आहे : एखाद्या देशात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही कसा विचार करता ? त्या देशात लोकशाही आहे का? त्या देशात राजकीय स्थिरता आहे का? त्या  देशात गुंतवणूक आणि उद्योगाला  अनुकूल धोरणे आहेत का? देशाच्या  कारभारात पारदर्शकता आहे का? देशात  कुशल प्रतिभावान मनुष्यबळ आहे का? देशात मोठी बाजारपेठ आहे का? असे अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही  विचारत असाल.

या सर्व प्रश्नांचे निर्विवाद एकच उत्तर  आहे: आणि ते भारत हे आहे.

संस्थात्मक गुंतवणूकदार, उत्पादक, नाविन्यपूर्ण परिसंस्था आणि पायाभूत कंपन्यांचे समर्थक अशा सर्वांसाठी इथे संधी आहे.  इथे गुंतवणूक करण्याची, कारखाने उभारण्याची आणि व्यवसाय चालवण्यासाठी अनेक संधी आहेत. आमच्या खासगी क्षेत्राबरोबर आणि सरकारबरोबर भागीदारी करण्याच्या संधी आहे. कमावण्याची तसेच शिकण्याची संधी आहे, एवढेच नाही तर विकासाच्या ही संधी आहेत.

मित्रांनो, कोविड नंतरच्या  जगात तुम्हाला बर्‍याचदा विविध प्रकारच्या समस्या ऐकायला मिळतील-उत्पादनाच्या समस्या, पुरवठा साखळ्यांच्या समस्या, पीपीई समस्या इत्यादी या समस्या नैसर्गिक आहेत.

मात्र, भारताने या समस्या होऊ दिल्या नाहीत. आम्ही लवचिकता दाखवली आणि विविध उपायांची भूमी  म्हणून  उदयाला आलो.

आम्ही 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आणि सुमारे 8 कोटी कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस पुरवला आहे आणि दीर्घकाळ पुरवला आहे. वाहतूक व्यवस्था  विस्कळीत असूनही आम्ही 40 कोटींहून अधिक शेतकरी, महिला, गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत कमी दिवसात त्यांच्या  बँक खात्यात थेट पैसे जमा करू शकलो.

यातून गेल्या काही  वर्षांमध्ये आम्ही उभारलेल्या प्रशासकीय  व्यवस्था आणि यंत्रणांची ताकद दिसून येते.

मित्रांनो, भारत जगात फार्मसीची भूमिका पार पाडत आहे.  या महामारी च्या काळात आम्ही जवळपास 150 देशांना औषधे पुरवली आहेत.

यावर्षी मार्च ते जून या कालावधीत आमच्या कृषी निर्यातीत 23% वाढ झाली आहे. संपूर्ण देश कठोर टाळेबंदीत असताना ही वाढ झाली आहे.

आज, आमचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु आहे. महामारीपूर्वी भारताने क्वचितच पीपीई किट उत्पादन केले . आज भारत दरमहा कोट्यवधी पीपीई किट बनवतो, आणि ती निर्यातही करतो.

आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी देखील वचनबद्ध आहोत. कोविड -19.साठी  लस उत्पादनाबाबत आम्ही संपूर्ण जगाला मदत करू इच्छितो.

मित्रांनो, भारताची कामगिरी आज भक्कम आहे आणि उद्या ती अधिक मजबूत असेल.  कसे ते मी समजावून सांगतो.

आज थेट परदेशी गुंतवणूक क्षेत्र अधिक खुले करण्यात आले आहे. आम्ही सार्वभौम संपत्ती आणि निवृत्तीवेतन निधीसाठी  एक अनुकूल कर प्रणाली तयार केली आहे.

आम्ही मजबूत रोखे  बाजाराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेतल्या.  आम्ही चॅम्पियन क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना घेऊन आलो आहोत.

औषध निर्मिती , वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती सारख्या क्षेत्रातील योजना यापूर्वीच कार्यरत आहेत. आम्हाला गुंतवणूकदारांना उच्च दर्जाच्या सेवा आणि मदत मार्गदर्शन पुरवायचे आहे. त्यासाठी सचिवांचा एक समर्पित सक्षम  गट तयार केला आहे.

विमानतळ, रेल्वे, महामार्ग, वीज पारेषण लाईन्स इत्यादी क्षेत्रांमध्ये आम्ही सक्रियपणे मालमत्तांचे मुद्रीकरण  करत आहोत. रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट आणि पायाभूत  गुंतवणूक ट्रस्ट सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत.

मित्रांनो, आज भारत  व्यवसायिकांच्या मानसिकतेत तसेच बाजारपेठेत वेगाने बदल घडवून आणत आहे. कंपनी कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांचे विनियमन आणि  गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत.

गेल्या पाच वर्षात जागतिक नाविन्यता निर्देशांक क्रमवारीत भारताने 81 व्या क्रमांकावरून 48 स्थानापर्यंत झेप घेतली आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत गेल्या पाच वर्षात भारताने 142 व्या क्रमांकावरून 63 वे स्थान प्राप्त केलें आहे. जानेवारी 2019 ते जुलै 2020 या दीड वर्षाच्या काळात संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतात 70 अब्ज डॉलर्स गुंतवणूक प्राप्त झाली आहे. 2013 ते 2017 या चार वर्षाच्या काळात प्राप्त झालेल्या गुंतवणुकी इतकीच ही रक्कम आहे.  2019 मध्ये भारतातल्या  थेट परकीय गुंतवणुकीत 20 % वाढ झाली ती सुद्धा जागतिक थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 1 % ने घसरला असतानाही भारतात झालेली ही गुंतवणूक म्हणजे  जागतिक गुंतवणूकदार समुदायाचा भारतावर कायम असलेल्या विश्वासाचेच द्योतक आहे.  

जगभरातून भारताला या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 20 अब्ज डॉलर्स प्राप्त झाले आहेत, ते सुद्धा जगभरात कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना. गिफ्ट सिटी इथले आंतरराष्ट्रीय वित्तीत सेवा केंद्र हा आमच्या महत्वाच्या उपक्रमापैकी एक आहे. गुंतवणूकदार त्याचा प्राधान्य मंच म्हणून उपयोग करू शकतात. यासाठी आम्ही नुकताच युनिफाईड  रेग्युलेटर निर्माण केला आहे.

मित्रहो, भारताने कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात अनोखा दृष्टीकोन स्वीकारला आहे.

गरीब आणि छोट्या व्यवसायांना आम्ही प्रोत्साहन आणि दिलासा देणारे पॅकेज दिले आहे. संरचनात्मक सुधारणा हाती घेण्यासाठीही आम्ही या संधीचा उपयोग करत आहोत. या सुधारणा अधिक उत्पादकता आणि समृद्धी सुनिश्चित करतात.

शिक्षण, श्रम आणि कृषी या तीन  क्षेत्रात भारताने सुधारणा हाती घेतल्या आहेत. प्रत्येक भारतीयावर  यांचा  एकत्रित सकारात्मक  परिणाम नक्कीच जाणवेल.

कृषी आणि कामगार क्षेत्रात भारताने कायद्यात सुधारणा सुनिश्चित केल्या आहेत. सरकारचे सुरक्षा जाळे मजबूत करतानाच खाजगी क्षेत्राचा अधिक सहभाग यामुळे सुनिश्चित करण्यात येत आहे. 

या सुधारणा उद्योजक आणि मेहनती  जनता या दोन्हीसाठी  लाभदायी आहेत. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा आमच्या युवकांच्या कौशल्याची शिक्षणाशी सांगड घालणार आहेत. वाव मिळणार आहे.

श्रम कायद्यातल्या सुधारणांमुळे कामगार संहितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या सुधारणा नियोक्तास्नेही आणि कामगारस्नेही आहेत यामुळे व्यवसाय सुलभता वाढणार आहे.

कृषी क्षेतार्तल्या सुधारणा दूरगामी आहेत. शेतकऱ्याला अधिक पर्याय उपलब्ध करून देण्या बरोबरच त्यामुळे निर्यातीलाही चालना मिळेल.

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना या सुधारणा  सहाय्य करतील.स्वयंपूर्णता  साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतानाच जागतिक समृद्धी साठी आमचे योगदान सुरूच राहील.

मित्रहो, शिक्षण क्षेत्रात  भागीदाराच्या शोधात तुम्ही असाल तर त्यासाठी भारत हे स्थान आहे. तुम्हाला उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी भारत हे स्थान आहे. कृषी क्षेत्रात भागीदारी करायची असेल तर त्यासाठी भारत हे स्थान आहे.

 

मित्रहो,

सामायिक लोकशाही मुल्ये आणि सामायिक हित यावर  भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंध आधारित आहेत.

कॅनडा हा भारतातला 20 वा मोठा विदेशी गुंतवणूकदार आहे. भारतात 600 हून अधिक कॅनडीयन कंपन्या आहेत.

आपले संबंध इथे दिसणाऱ्या आकड्यांपेक्षा अधिक बळकट आहेत. आपण एकत्रितपणे अधिक साध्य करू शकतो.

काही सर्वात मोठ्या आणि अधिक अनुभवी पायाभूत गुंतवणूकदारांचे कॅनडा हे माहेरघर आहे. कॅनडीयन पेन्शन फंड हे भारतात थेट गुंतवणूक सुरु करणारे पहिले होते. महामार्ग, विमानतळ,लाॅजीस्टीक, टेलीकाॅमबांधकाम क्षेत्र यासारख्या क्षेत्रात  यातल्या अनेकांनी मोठ्या संधी आधीच शोधल्या आहेत. आपले  अस्तित्व विस्तारण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या   नव्या क्षेत्राच्या शोधात ते आहेत.सुजाण कॅनडीयन गुंतवणूकदार, जे भारतात अनेक वर्षे आहेत ते आमचे उत्तम ब्रांड एम्बेसीडर ठरू शकतात.

त्यांचा स्वतःचा अनुभव,विस्ताराचा त्याचा आराखडा, आणि गुंतवणूक हा इथे येऊ इच्छिणाऱ्यासाठी मोठा विश्वासार्ह दाखला राहील.कॅनडा मध्ये मोठा भारतीय समुदाय आहे. तुम्हाला इथे कोणतीही अडचण राहणार नाही. आपल्या स्वतःच्या देशाप्रमाणेच तुमचे इथे स्वागत राहील.

या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी मला  आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद !!!!

****

B.Gokhale/ S.Kane/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662905) Visitor Counter : 248