रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्ग क्र.45–अ वर पुदुचेरी येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण


या प्रकल्पामुळे स्थानिक जनतेची खूप काळापासून प्रलंबित असलेली गरज पूर्ण झाली

प्रविष्टि तिथि: 07 OCT 2020 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुदुचेरीमधील अरुमपार्थपुरम येथे वर बांधलेला उड्डाण पुल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने देशाला अर्पण केला. सुमारे 35 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा उड्डाण पूल 1 किलोमीटर लांबीचा असून तो राष्ट्रीय महामार्ग क्र.45-अ वरील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. हा पूल पूर्ण झाल्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून पुदुचेरीमधील विशेषतः विल्लीयानुर, अरीयुर,कांडमंगलम, मानवेली,गोरीमेडू,अरोविल आणि अरीयानकुप्पम भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची प्रलंबित गरज पूर्ण झाली आहे. या प्रसंगी पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल डॉ.किरण बेदी, मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी तसेच रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ.व्हि.के.सिंग यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ह्या प्रकल्पामुळे जनतेची वाहतूक कोंडीपासून सुटका होईल आणि परिणामी त्यांचा वेळ तसेच इंधनाची बचत होईल, त्याचबरोबर सुरक्षित प्रवास, प्रदूषणात घट, धोकादायक लेव्हल क्रॉसिंग बंद होणे आणि रेल्वे वाहतूक  अखंडितपणे सुरु राहणे इत्यादी फायदे होतील असे नितीन गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. 

राष्ट्रीय महामार्ग क्र.45  चे चौपदरीकरण झाल्यामुळे पुदुचेरी परिसर कराईकल बंदर आणि कन्याकुमारीपर्यंत जाणारा ईसीआर रस्ता यांच्याशी अखंडितपणे जोडला जाईल. यातून स्थानिक पातळीवरच्या कृषी क्षेत्राला आणि मासेमारीला प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.गेल्या सहा वर्षात पुदुचेरीमध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून,सध्या 11,000 कोटी रुपये खर्चाच्या तामीळनाडू-पुडुचेरी दरम्यानच्या एकूण 287 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची बांधकामे सुरु आहेत अशी माहिती त्यांनी दिली.  

रस्ते आणि महामार्ग मंत्रालय पुदुचेरी भागाला तामिळनाडू आणि उर्वरित देशाशी जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे असे रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ.व्हि.के.सिंग यांनी सांगितले. या साठी सुरु असलेल्या विविध कामांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

केंद्रशासित प्रदेशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांचे पुदुचेरीच्या नायब राज्यपाल डॉ.किरण बेदी यांनी कौतुक केले. प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आणि प्रकल्प पूर्ण व्हायला आणखी विलंब होतो हे टाळायला हवे अशी सूचना त्यांनी केली.

या प्रसंगी पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल डॉ.किरण बेदी, मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

B.Gokhale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1662323) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Tamil , Telugu