पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 42 सीएनजी स्टेशन्स आणि 3 सिटी गेट स्टेशन्स समाजाच्या सेवेसाठी लोकार्पण


नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकार 60 अब्ज रुपयांची गुंतवणूक करीत आहे : प्रधान

Posted On: 06 OCT 2020 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020

 

देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरणस्नेही नैसर्गिक वायुरूप इंधनाच्या पुरवठ्याचा विस्तार वाढविण्याच्या उद्देशाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज 42 सीएनजी स्टेशन्स आणि टोरेंट कंपनीची 3 सिटी गेट स्टेशन्स यांचे लोकार्पण केले.  या लोकार्पण सोहोळ्यासाठी सर्व सीएनजी स्टेशन्स आणि सिटी गेट स्टेशन्स यांना व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून देण्यात आला.

टोरेंट गॅस या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांमध्ये शहरी गॅस वितरणासाठीचे अधिकार देण्यात आले आहेत. यामध्ये 14 सीएनजी केंद्रे उत्तर प्रदेशात, 8 महाराष्ट्रात, 6 गुजरातमध्ये,4 पंजाबात आणि प्रत्येकी 5 केंद्रे तेलंगणा आणि राजस्थान राज्यात आहेत. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबात प्रत्येकी 1 सिटी गेट स्टेशन उभारण्यात आले आहे.

सर्व शहरी गॅस वितरक एजन्सींनी सर्वसमावेशक उर्जा पुरवठादार व्हावे असे आवाहन प्रधान यांनी याप्रसंगी बोलताना केले. ग्राहकांना त्यांची क्रय क्षमता आणि पसंती यानुसार पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी किंवा वीज यापैकी कोणत्याही प्रकारचे इंधन उपलब्ध व्हायला हवे अशा प्रकारची व्यवस्था उभारण्याचा सरकारचा विचार आहे असे ते म्हणाले. लोकांच्या सोयीनुसार, त्यांच्या घराजवळच इंधन उपलब्ध व्हावे या हेतूने सरकारला फिरती इंधन वाटप सुविधा सुरु करायची आहे असे देखील त्यांनी सांगितले. बॅटरी बदलण्यासाठीच्या सुविधेचा विस्तार करण्यासाठी सरकार धोरण आखत आहे अशी माहिती त्यांनी दिली. व्यवहारांच्या प्रत्येक टप्प्यावर डिजिटल मंचाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु करावा असा सल्ला त्यांनी दिला.

येत्या काही वर्षांमध्ये भारत हा इंधनाचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असेल. पॅरीस परिषदेतील हवामान बदलांबाबत ठरविण्यात आलेल्या लक्ष्याची येत्या 2030 सालापर्यंत पूर्तता करण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी आखून दिलेल्या मार्गाला अनुसरूनच भारतातील शहरी गॅस वितरणाचे जाळे विस्तारण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. सौर उर्जा क्षेत्रात भारताने या आधीच आदर्श घालून दिला आहे असेही ते म्हणाले. नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी आवश्यक पाईपलाईन घालणे, टर्मिनलची उभारणी तसेच गॅस क्षेत्र उभारणे यासारख्या पायाभूत सुविधांसाठी सरकार 60 अब्ज अमेरिकी डॉलर्स म्हणजे 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची गुंतवणूक करीत आहे अशी माहिती प्रधान यांनी दिली. आपला देश वायू इंधनावर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे, ही अर्थव्यवस्था फक्त स्वच्छ आणि कार्यक्षमच नसेल तर आयात केलेल्या कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी करणारी असेल असे त्यांनी सांगितले. शेतातील निकामी अवशेष, वन उत्पादने, शहरातील कचरा आणि शेणाचा उपयोग करून कम्प्रेसड बायो- गॅस उत्पादन करण्यासाठी बायोमास प्रकल्प उभारणीत गुंतवणूक करण्याचे आवाहन प्रधान यांनी गॅस वितरक कंपन्यांना केले. देशात 2014 साली फक्त 938 सीएनजी स्टेशन्स होती, आता त्यांची संख्या दुपटीने वाढून 2020 मध्ये सुमारे 2300 सीएनजी स्टेशन्स कार्यरत आहेत आणि विद्यमान स्टेशन्ससह येत्या काही वर्षांमध्ये देशात सुमारे 10,000 सीएनजी स्टेशन्सचा मजबूत पायाभूत विस्तार झालेला असेल.

 

सीएनजी क्षेत्राच्या क्षमतेत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे शहरी गॅस वितरण क्षेत्राकडून मोठ्या मागणीची अपेक्षा आहे,जेणेकरून देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला गती मिळेल आणि आत्म निर्भर भारत अभियानाला मोठे प्रोत्साहन मिळून देशाच्या विविध भागांमध्ये स्वच्छ इंधन सुरळीतपणे उपलब्ध होईल, अशी अशा प्रधान यांनी व्यक्त केली.

 

 

M.Iyengar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1662078) Visitor Counter : 145