पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातल्या सोलंग खो-यामध्ये आयोजित सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
03 OCT 2020 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान राजनाथ सिंह जी, हिमाचल प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री भाई जयराम ठाकूर जी, हिमाचलचे खासदार आणि केंद्रामधले माझे सहकारी, हिमाचलचे पुत्र अनुराग ठाकूर जी, स्थानिक आमदार, खासदार आणि हिमाचल सरकारमधले मंत्री भाई गोविंद ठाकूर जी, इतर मंत्रीवर्ग, खासदार, आमदार , भगिनी आणि बंधूंनो,
तुसा सेभी रेए अपने प्यारे अटल बिहारी बाजपेयी जी री सोचा रै बदौलतए
कुल्लुए लाहुलए लेह.लद्दाखा रे लोका री तैंयी ऐ सुरंगा रा तौहफाए तुसा सेभी वे मेलू।
तुसा सेभी वै बहुत.बहुत बधायी होर मुबारक।
माता हिंडिम्बेची, ऋषी-मुनींची ही तपोभूमी आहे. येथे 18 करडू म्हणजेच गांवा-गांवामध्ये देवतांच्या जीवंत आणि अनोख्या परंपरा आहेत. या दिव्य धरेला- भूमीला मी प्रणाम करतो, वंदन करतो. ही कांचननागची भूमी आहे. आपले मुख्यमंत्री जयराम जी माझ्या पॅराग्लायडिंगच्या छंदाचे वर्णन आत्ताच करीत होते. खरंतर असे उडायला खूप चांगलं वाटत होतच. परंतु ज्यावेळी तो संपूर्ण संच उचलून, पेलत वरपर्यंत जावे लागत होते, त्यावेळी चांगलाच दम लागत होता. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, हे दुनियेमध्ये इतर कुणी केले आहे, की नाही मला माहिती नाही. एकदा अटलजी मनाली येथे आले होते, मी त्यावेळी इथे संघटनेची व्यवस्था पाहणारा व्यक्ती होतो. त्यामुळे मी जरा आधी येवून पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही एक कार्यक्रम बनवला होता. 11 पॅराग्लायडर्स, पायलट एकाच वेळी मनालीच्या आकाशामध्ये तरंगत होते, ज्यावेळी अटलजी पोहोचले, त्याचवेळी सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती. जगामध्ये पॅराग्लायडिंगच्या छंदाचा असा उपयोग फारच क्वचित कुणी केला असेल. त्यादिवशी संध्याकाळी मी अटलजींना भेटायला गेलो, तर ते म्हणाले, ‘‘भाई फारच मोठे धाडसी कृत्य केलेस, इतकं कशाला करतोस?’’ परंतु तो दिवस माझ्या मनालीच्या वास्तव्य काळात एक मोठी संधी घेवून आला. पॅराग्लायडिंग करीत पुष्पवृष्टीने वाजपेयीजींचे स्वागत करण्याची कल्पना अतिशय प्रासंगिक, कौतुकास्पद ठरली होती.
हिमाचलचे माझे प्रिय बंधू, भगिनींनो, आपल्या सर्वांचे अटल बोगदा लोकार्पणाबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो. आज हा सार्वजनिक कार्यक्रम होत आहे, परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे अगदी काटेकोर पालन होत असल्याचे दिसून येत आहे. या सभेचे अगदी सुयोग्य नियोजन केले आहे. दूर-दूर पर्यंत सर्वजण सामाजिक अंतर राखून बसले आहेत, त्यामुळे मला सर्वांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. हे स्थान माझ्यासाठी अतिशय चिर-परिचित आहे. मी काही एका जागी फार काळ थांबणारा माणूस नाही. खूप झंझावाती दौरे करीत होतो. परंतु ज्यावेळी अटलजी इथे येत होते आणि ते जितके दिवस थांबत होते, तितके दिवस मीही थांबत होतो. त्यामुळे मला या स्थानाविषयी खूप आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. त्यावेळी अटलजींच्याबरोबर मनालीविषयी तसेच हिमाचलच्या विकासाविषयी अनेकदा चर्चा होत असे.
अटल जी इथल्या पायाभूत सुविधा, इथली संपर्क व्यवस्था आणि इथला पर्यटन व्यवसाय यांच्याविषयी नेहमीच चिंता व्यक्त करीत होते.
ते नेहमी स्वतःची एक प्रसिद्ध कविता ऐकवत होते. मनालीवासियांनी तर ही कविता नक्कीच अनेकदा ऐकली आहे. आणि विचार करा, ज्यांना हे स्थान आपल्या घरासारखे वाटत होतं, ज्यांना या गावांमध्ये राहणं, वेळ घालवणं खूप चांगलं वाटत होतं, जे इथल्या लोकांवर इतकं प्रेम करीत होते, तेच अटल जी म्हणत होते, आपल्या कवितेमधून ते म्हणते होते -
मनाली मत जइयो,
राजा के राज में।
जइयो तो जइयो,
उड़िके मत जइयो,
अधर में लटकीहौ,
वायुदूत के जहाज़ में।
जइयो तो जइयो,
सन्देसा न पइयो,
टेलिफोन बिगड़े हैं,
मिर्धा महाराज में।
मित्रांनो,
मनाली हे सर्वाधिक आवडते आणि पसंत करणा-या अटल जींची ही अटळ इच्छा होती की, इथली स्थिती पूर्णपणे बदलावी. इथं चांगली संपर्क व्यवस्था असावी, याच विचाराने त्यांनी रोहतांगमध्ये बोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
मला आनंद आहे की, आज अटलजींचा हा संकल्प सिद्ध झाला आहे. हा अटल बोगदा आापल्यावर भलेही प्रचंड मोठ्या डोंगराचा (म्हणजे जवळपास 2 किलोमीटर उंचीचा डोंगर या बोगद्याच्यावर आहे.) बोझा उचलत आहे. तो बोझा कधी लाहौल-स्पिती आणि मनालीच्या लोकांनी आपल्या खांद्यांवर उचलला होता. इतके प्रचंड ओझे आता हा बोगदा उचलत आहे. आणि या बोगद्यने इथल्या नागरिकांना एक प्रकारे ओझेमुक्त केले आहे. सामान्य लोकांचे खूप मोठे ओझे कमी होणे, त्यांचे लाहौल-स्पितीला येणे-जाणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यांचा प्रवास सुकर होणे ही एक आनंदाची, गौरवाची, समाधानाची गोष्ट आहे.
आता पर्यटक कुल्लू-मनाली येथे सकाळी ‘सिड्डू घी’चा नाष्टा करतील, प्रवासाला निघतील आणि लाहौलमध्ये येवून ‘दू-मार’ आणि ‘चिलडे’ यांच्या भोजनाचा आस्वाद घेवू शकतील, हा दिवस आता दूर नाही. आधी असे करणे अशक्य होते.
ठीक आहे, कोरोना आहे, परंतु आता हळूहळू देश अनलॉकही होत आहे. मला आशा आहे की, आता देशातल्या इतर क्षेत्राप्रमाणेच पर्यटन व्यवसायही हळूहळू वेग घेईल. आणि अगदी शानदारपणाने कुल्लूच्या दस-याचा सण साजरा होईल.
मित्रांनो,
अटल बोगद्याच्या बरोबरच हिमाचलच्या लोकांसाठी आणखी एक मोठा, महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हमिरपूरमध्ये 66 मेगावॅटचा धौलसिद्ध जल विद्युत प्रकल्प उभारण्यास स्वीकृती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे देशाला वीज तर मिळेलच त्याच बरोबर हिमाचलच्या अनेक युवकांना रोजगारही मिळणार आहे.
मित्रांनो,
आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्माणाचे अभियान संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. त्यामध्ये हिमाचल प्रदेशाचीही खूप मोठी भागीदारी आहे. हिमाचलमध्ये ग्रामीण भागात रस्ते असो, महामार्ग असो, विद्युत प्रकल्प असो, रेल्वे संपर्क व्यवस्था असो, हवाई सेवा असो, यासाठी अनेक प्रकल्पांची कामे वेगाने केली जात आहेत.
मग ते किरतपूर-कुल्लू- मनाली रोड कॉरिडॉर – झिरकपूर-परवानू- सोलन- कैथलिघाट रोड कॉरिडॉर – नांगल धरण. तलवारा रेल मार्ग, भानुपाली- बिलासपूर रेल मार्ग, या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे. हे प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि हिमाचलवासियांना लवकरच सेवा देण्यास प्रारंभ होईल.
मित्रांनो,
हिमाचल प्रदेशच्या लोकांचे जीवन अधिकाधिक सुकर, चांगले बनविण्यासाठी रस्ते, विजपुरवठा यासारख्या मूलभूत गरजांबरोबरच मोबाइल आणि इंटरनेट संपर्क यंत्रणाही खूप आवश्यक आहे. आणि जी स्थाने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत, तेथे तर आजच्या काळात इंटरनेट असणे ही अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठीही सरकारने काम सुरू कले आहे.
दूरसंचार व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने देशातल्या सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा प्रकल्प एक हजार दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पा अंतर्गत गावांमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे घरांमध्येही इंटरनेट उपलब्ध होवू शकणार आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी लाभ होईल. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय पर्यटन क्षेत्रालाही फायदा मिळेल.
मित्रांनो,
लोकांचे जगणे अधिक सुलभ व्हावे आणि त्यांना सर्व अधिकारांचा लाभ घेता यावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये पगार, निवृत्ती वेतन, बँकिंग सेवा वीज आणि दूरध्वनी सारख्या बिलांचा भरणा करणे तसचे जवळपास सर्व सरकारी सेवा आता डिजिटल करण्यात आल्या आहेत. अशा पगार, निवृत्ती वेतनसारख्या सुविधांसाठी वारंवार कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत नाहीत.
आधी हिमालयातील दूरदूरच्या मग आतून फक्त कागदपत्रांवर प्रमाणन घेण्यासाठी आमचे तरुण मित्र, निवृत्त अधिकारी आणि नेत्यांकडे फेऱ्या मारत असत. आता कागदपत्रांच्या प्रमाणनाची आवश्यकताच एक प्रकारे काढून टाकली आहे.
आठवून बघा, आधी वीज आणि टेलिफोनची बिले भरण्यासाठी पूर्ण दिवस लागत असे. आता ही कामे आपण घर बसल्या एका क्लिकवर बोट दाबून करू शकता. आता बँकेशी संलग्न कित्येक सेवा ज्या बँकेत जाऊनच मिळवता येत होत्या, त्या आता घरबसल्या मिळतात.
मित्रांनो, अशा अनेक सुधारणांमुळे वेळेचीही बचत होत आहे, पैसा वाचतोय आणि भ्रष्टाचारासाठी स्कोपच उरलेला नाही, करोना कालखंडातच हिमाचल प्रदेशातील पाच लाखाहून जास्त पेन्शनर आणि जवळजवळ सहा लाख भगिनींच्या जनधन खात्यात शेकडो करोड रुपये एका क्लिक मध्ये जमा केले गेले. सव्वा लाखाहून जास्त गरीब भगिनींना उज्वलाचा मोफत सिलेंडर मिळू शकला.
देशात आज जे बदल केले जात आहेत त्यांच्यामुळे अशा लोकांना त्रास होत आहे ज्यांनी सदैव फक्त आपल्या राजकारणाच्या भल्यासाठीच काम केले. काळ बदलला पण त्यांची विचारसरणी बदललेली नाही. आता काळ बदलला आहे, विचारसरणी सुद्धा बदलायची आहे आणि नवीन काळानुसार देशातही बदल करायचे आहेत. आज जेव्हा अशा लोकांनी तयार केलेले मध्यस्थ आणि दलालांच्या व्यवस्थेवर प्रहार होत असताना ते गडबडले आहेत. मध्यस्थांना प्रोत्साहन देणाऱ्यांनी देशातील शेतकऱ्यांचे हाल कसे केले होते हे हिमाचलातील लोकांना व्यवस्थित माहिती आहे.
हिमाचल हा देशातील सर्वात मोठ्या फळ उत्पादक राज्यांमधील एक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. येथील टोमॅटो, मशरूम यासारख्या भाज्या अनेक शहराच्या गरजा पुरवतात. परंतु, परिस्थिती काय सांगत आली आहे? शिमला किंवा किन्नौरचा शेतकरी बागेतून सफरचंद 40 ते 50 रुपये किलोच्या हिशेबाने काढतो. ते दिल्लीत राहणाऱ्यांच्या घरी जाईपर्यंत जवळजवळ शंभर दीडशे रुपये पर्यंत जाऊन ठेपते. मग यामधील साधारणतः शंभर रुपयांचा हिशोब आहे जो कधी शेतकऱ्याला मिळाला नाही वा खरेदीदारालाही मिळालेला नाही, मग तो गेला कुठे? शेतकऱ्याचे नुकसान, शहरातील खरेदीदाराचे नुकसान. एवढेच नाही येथील सर्व बागायतदार मित्र जाणून आहेत की सफरचंदाचा सीझन जसाजसा पूर्ण बहरात येतो, तसा त्याच्या किमती धडाधड कोसळतात. यामध्ये छोट्या बागायती असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास भोगावा लागतो.
मित्रहो, कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करणारे म्हणतात की जसे आहे तसेच राहू द्या. गेल्या शतकात जगायचे आहे तसेच जगू द्या. परंतु, देश आज परिवर्तनासाठी सज्ज आहे. आणि म्हणूनच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कायद्यांमध्ये ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या आहेत. आणि या ज्या सुधारणा आहेत त्या आधी त्यांच्याही विचाराधीन होत्याच. विचाराधीन त्यांच्याही होत्या, आमच्याही. परंतु, त्यांच्यामध्ये हिम्मत कमी होती. आमच्यात हिम्मत आहे. त्यांच्यासमोर निवडणुका होत्या. आम्हासमोर देश आहे. आमच्या समोर आमच्या देशाचा शेतकरी आहे. आमच्यासाठी आमच्या देशातील शेतकऱ्यांचे उज्वल भविष्य समोर आहे. म्हणूनच आम्ही निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाऊ इच्छितो.
आपण हिमाचलातील छोटे-छोटे बागायतदार शेतकरी जर समूह तयार करून आपल्या सफरचंदांची विक्री थेट दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन करू इच्छित असतील तर त्यांना ते स्वातंत्र्य मिळाले आहे. पण त्यांना स्थानिक बाजारपेठेत जास्त फायदा मिळत असेल, आधीच्या व्यवस्थेनुसार फायदा मिळत असेल तर तो पर्याय उपलब्ध आहेच. तो काढून टाकलेला नाही. म्हणजेच प्रत्येक प्रकारे शेतकरी, बागायतदारांना फायदा व्हावा म्हणूनच या सुधारणा केल्या गेल्या आहेत.
मित्रहो, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीशी संलग्न असलेल्या त्यांच्या छोट्या छोट्या आवश्यकता पूर्ण करणे यासाठी कटिबद्ध आहे. कृषी सन्मान निधी अंतर्गत देशभरातील साधारणतः सव्वा दहा कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आत्तापर्यंत एक लाख कोटी रुपये जमा केले गेले आहेत यामध्ये हिमाचलमधील सव्वानऊ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यातही साधारणपणे एक हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत.
कल्पना करा, जर आधीच्या सरकारच्या कालावधीत 1000 कोटी रुपयांचे एखादे पॅकेज तुमच्यासाठी घोषित झाले असते तर तो पैसा कुठे कुठे कुणाच्या खिशात पोहोचला असता? त्यावर त्याचे राजनैतिक श्रेय घेण्यासाठी किती प्रयत्न झाले असते? परंतु इथे लहान शेतकऱ्यांच्या खात्यात हे रुपये आले आणि त्याबद्दल कोणताही गोंधळ झाला नाही.
मित्रांनो, नुकतीच एक अजून मोठी सुधारणा आपल्या देशातील श्रमशक्तीला खासकर भगिनी आणि लेकींना अधिकार मिळावे यासाठी केले गेले आहेत. हिमाचलातील भगिनी आणि लेकी अशा प्रत्येक क्षेत्रात कठीणातील कठीण काम करण्यातही पुढे असतात. परंतु आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती देशातील अनेक क्षेत्रात भगिनींवर कामे करण्याबाबत बंधन होते. नुकत्याच कामगारांसाठी कामगार कायद्यांमध्ये केल्या केलेल्या सुधारणांनुसार आता स्त्रियांनाही मोबदल्यापासून काम स्वीकारण्यापर्यंत सर्व अधिकार दिले गेले आहेत जे आधीपासून पुरुषांना आहेत.
मित्रांनो, देशातील प्रत्येक क्षेत्राच्या, प्रत्येक नागरिकाच्य़ा आत्मविश्वासाला हाक घालण्यासाठी आत्मनिर्भर भारत तयार करण्यासाठी सुधारणांची ही मालिका अशीच सुरू राहील. गेल्या शतकातील नियम आणि कायद्यांनी आपण पुढील शतकात जाऊ शकत नाही. समाज आणि व्यवस्थेतील अर्थपूर्ण बदलाला विरोध करणारे आपल्या स्वार्थाचे राजकारण जेवढे करायचे तेवढे करू देत, देश थांबणार नाही.
हिमाचल येथील आमचा तरुण वर्ग, देशातील प्रत्येक तरुणाची स्वप्ने आणि आकांक्षा आम्हासाठी सर्व काही आहेत आणि त्या घेऊन आम्ही देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहू
मित्रांनो मी आज पुन्हा एकदा अटल टनेल साठी आणि आपण कल्पना करू शकता की ज्यामुळे किती मोठा बदल घडून येणार आहे किती शक्यतांचे दारे उघडली आहेत त्याचा कितीतरी लाभ आपण घेऊ शकता.
करोनाचा कालखंड आहे. हिमाचलने परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली तरीही या संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. देवधरांला प्रणाम करत, कंचननागजी या धरतीला प्रणाम करत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भेटायची, आपले दर्शन घ्यायची संधी मिळाली. करोनाचा कालखंड नसता तर अजून चांगले वाटले असते. आपल्याला आलिंगन देऊन भेटता आले असते. अनेक परिचित चेहरे माझ्यासमोर आहेत परंतु आज या परिस्थितीमुळे आपल्याला भेटू शकत नाही. तरीही आपल्या दर्शनाची संधी मला मिळाली हीसुद्धा माझ्यासाठी मोठी आनंदाचीच बाब आहे. मला इथून लवकर निघायचे आहे म्हणून आपली परवानगी घेऊन आपल्याला शुभेच्छा देत,
खूप खूप धन्यवाद !!
* * *
BG/SB/VS/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661610)
Visitor Counter : 152
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam