सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
कोविड -19 च्या संकटातही गांधी जयंती दिनी खादी इंडियाच्या फ्लॅगशिप सीपी आऊटलेटने 1.02 कोटी रुपयांची विक्री नोंदवली
Posted On:
04 OCT 2020 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
कोविड -19 च्या भीतीवर खादी प्रेमींच्या उत्साहाने मात केली असून यंदा गांधी जयंती दिनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील खादी इंडिया दुकानातील खादी विक्रीने 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी (2 ऑक्टोबर) खादीची एकूण विक्री 1,02,19,496 रुपये इतकी नोंदली गेली, जी सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत लक्षणीय अशी आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला खादीच्या सीपी आउटलेटमध्ये एकूण विक्री 1.27 कोटी रुपये इतकी होती.
दिवसभरात अंदाजे 1633 पावत्या तयार झाल्या ज्यात प्रत्येक पावतीची सरासरी खरेदी 6258 रुपये होती. विविध क्षेत्र आणि वयोगटातील ग्राहकांनी सकाळपासूनच खादी इंडिया दुकानाबाहेर रांग लावली होती. विशेष म्हणजे, खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी ) महात्मा गांधींची 151 वी जयंती साजरी करण्यासाठी सर्व उत्पादनांवर वार्षिक 20 टक्के सवलत दिली आहे.
केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी मोठ्या प्रमाणातील खादी विक्रीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार खादी विकत घेण्याचे केलेले आवाहन तसेच जनतेत विशेषत: तरुणांमध्ये खादीच्या वाढत्या लोकप्रियतेला दिले. “कोरोना महामारी असूनही, मोठ्या संख्येने लोक खादी विकत घेण्यासाठी बाहेर पडले , हा पंतप्रधानांनी वारंवार केलेल्या आवाहनांचा एक परिणाम आहे. खादी हे नाव घराघरात पोहचले असून खादी प्रेमींची संख्या सतत वाढत आहे. आणि उत्पादन अनेक पटींनी वाढूनही केव्हीआयसीने आपल्या उत्पादनाच्या श्रेणीचा सर्वोच्च दर्जा कायम ठेवल्यामुळे ग्राहक कायम राहिले आहेत, असे सक्सेना म्हणाले. जरी यावर्षी विक्रीचा आकडा गेल्या वर्षीपेक्षा किंचित कमी असला तरी एका दिवसात एक कोटी रुपयांहून अधिक विक्रीचा आकडा समाधानकारक आहे.
कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान जवळपास सर्व व्यवहार बंद असताना, केव्हीआयसीने संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबवले ज्यामध्ये विविध प्रकारची वस्त्र आणि ग्रामीण उद्योग उत्पादनांव्यतिरिक्त फेस मास्क आणि हँड वॉश आणि हँड सॅनिटायझर्स सारख्या वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांचा समावेश आहे.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661553)