वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सच्या 74 व्या वार्षिक सत्रामध्ये पीयूष गोयल यांचे भाषण
भारताकडे स्वावलंबी होण्याची क्षमता आहे, कामाची व्याप्ती वाढविण्याची तसेच चांगल्या उत्पादन पद्धतीचा अभ्यास करणे आणि गुणवत्ता सुधारण्याची इच्छा आहे; या सर्व गोष्टी जगाने मान्य केल्या आहेत- गोयल
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2020 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सच्या 74 व्या वार्षिक सत्रामध्ये आभासी कार्यक्रमामध्ये भाषण केले. चेंबर ऑफ कॉमर्सचे महत्व सातत्याने वाढत असून अधिकाधिक चांगले, उपयुक्त कार्य या संस्थेमार्फत केले जात आहे. कोविड-19 महामारीच्या उद्रेकामध्ये सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना चेंबस ऑफ कॉमर्सने उद्योग क्षेत्रातल्या समस्या सोडविण्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून प्रश्नांचे निराकरण केले. अशा अवघड काळामध्ये या संस्थेने महत्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी मंत्री गोयल म्हणाले, आपण सगळेजण एकत्रित काम करीत आहोत, व्यवसायाच्या बळकटीसाठी नव्या कल्पना येत आहेत. त्यावर सरकारही वेगाने कार्य करीत आहे. ज्या कामांची, गोष्टींची विभागणी करणे आवश्यक आहे, त्यांचा विचार करण्यात येत आहे. नवीन धोरण, सुधारणा केलेले कायदे तसेच नियम आणि कार्यपद्धतीमध्ये झालेला बदल, याचा फायदा उद्योग व्यवसायांना होत आहे.
उद्योजक आणि सरकार यांनी मिळून समाजातल्या सर्व घटकांना विशेषतः समाजातल्या दुर्लक्षित वर्गासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली तरीही समाजाचा एक घटक अनेक लाभापासून वंचित राहिला आहे, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे व्यवसायाचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे 1.3 अब्ज भारतीयांचे भविष्य चांगले घडविता येणार आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.
जगभरामध्ये पीपीई संच आणि मास्क तसेच व्हँटिलेटर, औषधे यांच्या निर्मितीमध्ये आपला देश आघाडीवर आहे. कोविडमध्ये आवश्यक ठरलेल्या या सर्व गोष्टींची आपण निर्यातही करीत आहोत. कडक टाळेबंदीच्या काळातही या वस्तू आपण निर्यात करीत होतो. उत्पादनामध्ये खंड पडला नाही. भारत संकटाच्या काळातही विश्वासू साथीदार असल्याचे आपण जगाला दाखवून दिले आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये एक विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
आर्थिक पुनरूज्जीवनाविषयी मंत्री गोयल म्हणाले, आता वाईट काळ संपुष्टात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये व्यापारी निर्यातीमध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. तसेच जीएसटी संकलनामध्ये याच कालावधीमध्ये चार टक्के वाढ झाली आहे. रेल्वेने 15 टक्के जास्त मालवाहतूक केली आहे. त्यामुळे आता विकासाच्या उच्च पातळीकडे आपली वाटचाल सुरू आहे, असे म्हणता येईल.
अलिकडेच सरकारने कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणांविषयी माहिती देताना गोयल म्हणाले, सुमारे दहा कोटी शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रूपये देण्यात येत आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. तसेच कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661459)
आगंतुक पटल : 205