वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी सुधारणा कायदे आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतील- पीयुष गोयल
कोविडमुळे निर्माण झालेल्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी लवचिकता, सामूहिक ऊर्जा आणि प्रक्रियांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर
Posted On:
30 SEP 2020 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
केंद्र सरकारने केलेले कृषी सुधारणा कायदे, आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतील, असं मत,केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केलं. तेलंगणा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महासंघाच्या “नव्या जगाची रचना- आत्मनिर्भर भारत” या विषयवरील कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कायद्यांमुळे देशातील कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असे ते म्हणाले. “ यामुळे शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. कृषी क्षेत्राला अधिक सुसंघटीत करुन, खाजगी क्षेत्रांचा यात सहभाग वाढवणे आणि नव्या संधी निर्माण झाल्यामुळे शेतकरी या कायद्यामुळे अधिक सक्षम होईल. आपल्या शेतकऱ्यांना किमान हमी भावाचा पर्याय असेल किंवा ते थेट बाजारपेठेत आपला माल विकू शकतील” असे गोयल म्हणाले.
आत्मनिर्भर भारताविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, यामुळे जागतिक बाजारासाठी भारताची कवाडे अधिकच खुली झाली आहेत. आपण जगातल्या कुठल्याही भागातून आता असे आधुनिक तंत्रज्ञान घेऊ शकतो, जे भारताला अधिक चांगल्या सेवा पुरवण्यास सक्षम असेल. आपण देशांतर्गत उद्योगांचा विस्तार करण्यासाठी देखील, तंत्रज्ञानाचा वापर करु शकतो. आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणारी व्होकल फॉर लोकल योजना, या अभियानाच्या भविष्यासाठीचा अविभाज्य भाग आहे. भारत एक अशी अर्थव्यवस्था तयार करेल, जिथे उच्च दर्जाची उत्पादने देशातच तयार होतील आणि आपण एक आत्मनिर्भर देश बनू शकू.”
भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी पुढे येऊन एकत्र काम करावे, असे आवाहन गोयल यांनी केले. जेणेकरुन भारत एक युवा, सशक्त जागतिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल आणि जागतिक पटलावर आपल्या हक्काची आणि योग्यतेची जागा आपल्याला मिळू शकेल. “चला आपण सर्व मिळून भारताला असा एक देश बनवूया ज्याकडे संपूर्ण जग एक विश्वासार्ह भागीदार म्हणून बघू शकेल. शाश्वत पायाभूत सुविधांचे निर्माण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठीचे आमचे प्रयत्न आम्हाला वाढवण्याची गरज आहे. जिथे भारताचे तुलनात्मक आणि स्पर्धात्मक पातळीवर भक्कम स्थान आहे, अशा क्षेत्रात, जागतिक नेतृत्व करण्यासाठी आपल्याला देशाला तयार करायचे आहे.
भारताच्या क्षमता ओळखून त्यांचा विस्तार करण्यासाठी सरकार राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. एकल-खिडकी मंजुरी योजना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी व्यवस्था, ज्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देखील आपला व्यापार करणे सोपे जाईल, केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांच्या मदतीने आपण या संकटातून बाहेर पडू आणि आपला मंत्र, ‘सबका साथ सबका विकास,” यशस्वी होईल आणि आपण ‘सबका विश्वास’ म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन करण्यातही यश मिळवू.
गोयल यांनी आपल्या भाषणात, लवचिकता, सामूहिक उर्जा आणि कोविडच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रक्रियांचे पुनरुज्जीवन या मुद्दयांवर भर दिला. या संदर्भात, भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांची माहिती देतांना त्यांनी सांगितले की सप्टेंबरच्या या 29 दिवसात, गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के अधिक मालवाहतूक झाली आहे. आपण काल, 29 सप्टेंबर 2019 च्या तुलनेत आणखी 33 टक्के मालवाहतूक केली आहे. माल तसेच प्रवासी वाहतूक वाढवली आहे. मालवाहू गाड्या, दुप्पट गतीने धावत आहेत. आता आम्ही नव्याने वेळापत्रक जाहीर करतो आहोत, असेही गोयल यांनी सांगितले. रेल्वेने या काळात गेल्यावर्षीचा मालवाहतुकीचा आकडाही यंदा पार केला आहे, असेही त्यांनी सांगितले. आधी आपल्याकडे मास्क, पीपीई किट, चाचण्यांच्या किट्स आणि व्हेंटीलेटर्स चे फारसे उत्पादन होत नसे. मात्र, आज आपण या सर्व उत्पादनांत केवळ आत्मनिर्भर झालो नाहीत, तर या उत्पादनांची निर्यातही करतो आहोत, असे गोयल यांनी सांगितले.
M.Chopade/R.Aghor/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660424)
Visitor Counter : 158