पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी उत्तराखंडात नमामी गंगे अंतर्गत सहा भव्य प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण

Posted On: 29 SEP 2020 5:27PM by PIB Mumbai

 

उत्तराखंड राज्यपाल श्रीमती बेबी राणी मौर्यजी, मुख्यमंत्री श्रीमान त्रिवेंद्र सिंग रावत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गजेंद्र सिंह शेखावत जी, डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक जीरतनलाल कटारिया जी आणि इतर अधिकारी तसेच उत्तराखंडातील माझ्या बंधु भगिनींनो, चारधामचे पावित्र्य सामावून घेणाऱ्या देवभूमी उत्तराखंडच्या धरतीला माझा आदरपूर्वक नमस्कार.

माता गंगेची निर्मळता  अधोरेखीत करणाऱ्या सहा मोठ्या प्रकल्पांचे आज लोकार्पण केले गेले. यात हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, आणि मुनी ची रेती मध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच वस्तुसंग्रहालय यासारख्या प्रकल्पांचाही समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी उत्तराखंडमधील माझ्या सर्व साथीदारांना  खुप खुप शुभेच्छा.

मित्रहो, आता काही वेळापूर्वीच जनजीवन मिशनचा सुंदर व्यावसायिक चिन्ह तसेच त्याची मार्गदर्शिका प्रकाशित झाली. जलजीवन मिशनहे भारतातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पाईपने शुद्ध पाणी पोहोचवते. मिशनचा लोगो सतत या गोष्टीची आठवण करुन देईल की ही मार्गदर्शिका सरकारी मशीनरी एवढीच गावातले ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीसाठीही आवश्यक आहे. योजनेच्या यशाची खात्री देणारे असे हे मौल्यवान माध्यम आहे.

मित्रांनो, आज ज्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे त्यातही गंगा  ही कश्याप्रकारे  आपल्या सांस्कृतिक वैभव , आस्था आणि परंपरा या तिन्ही गोष्टींचे भव्य प्रतिक आहे हे सविस्तरपणे सांगितले आहे. उत्तराखंडात उगम पावणारी गंगा पश्चिम बंगालमध्ये गंगासागरपर्यंत देशाचे जीवन समृद्ध करत जाते. म्हणूनच गंगा निर्मळ राखणं आवश्यक आहेगंगेचे अथक वाहणे आवश्यक आहे.

गेल्या दशकांमध्ये गंगा जलाच्या स्वच्छतेसाठी मोठमोठ्या मोहिमा सुरू झाल्या, पण त्या मोहिमांमध्ये लोकसहभाग नव्हता, तसेच द्रष्टेपणासुद्धा नव्हता.  त्यामुळेच गंगेचे पाणी कधीही स्वच्छ होऊ शकले नाही.

मित्रांनो, जर गंगा जलाच्या स्वच्छतेसाठी तेच जुने प्रयत्न केले गेले असते तर आजही अवस्था तेवढीच वाईट असती. आम्ही नवीन विचार घेऊन पुढे आलो.  आम्ही नमामि गंगे मिशन फक्त गंगेच्या साफसफाईपुरते मर्यादित न ठेवता देशातील सर्वात मोठा आणि सविस्तर नदी संरक्षण कार्यक्रम तयार केला. सरकारने चारही दिशांना एकत्रित काम सुरू केले. प्रथम गंगेच्या पाण्यात घाणेरड्या पाण्याची भर पडू नये म्हणून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे जाळे पसरले. दुसरे, प्रक्रिया प्लँट अशा तऱ्हेने विकसित केले गेले की जे येत्या दहा पंधरा वर्षांची गरज पूर्ण करतील.  तिसरे, गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेली शंभर महानगरे आणि 5000 गावांना हागणदारी मुक्त करणे, आणि चौथा म्हणजे गंगेच्या उपनद्यांमधील  प्रदूषण रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे.

मित्रहो आज चारही बाजूने केलेल्या कामाचा परिणाम आपल्या सर्वांनाच दिसत आहे. आज नमामि गंगे या कार्यक्रमाच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक नीधीसह अधिक प्रकल्पांवर काम सुरू आहे, किंवा पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यासोबतच उत्तराखंडमध्ये या अभियानांतर्गत सुरू असलेले जवळपास सर्व मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

मित्रांनो, हजारो कोटींच्या या प्रकल्पांमुळे फक्त सहाच वर्षात उत्तराखंडमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता जवळपास चौपट झाली आहे.

मित्रहो उत्तराखंडात अशी परिस्थिती होती की गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ ते हरिद्वार पर्यंत 130 पेक्षा जास्त नाले गंगेत प्रवेशत होते. आज या पैकी अधिकांश थांबवण्यात आले आहेत.  यामध्ये ऋषिकेशजवळचा मुनी की रेती येथील चंद्रेश्वर नगर नाला ही समाविष्ट आहे. यामुळे तिच्या दर्शनाला येणाऱ्या राफ्टींग करणाऱ्यांना अतिशय त्रास होत होता. आजपासून इथे देशातील पहिले वहिले चार मजली सांडपाणी प्रकिया केंद्र सुरू झाले आहे.  हरिद्वारमध्ये ही असे वीसपेक्षा जास्त नाले बंद केले गेले आहेत. मित्रांनो, प्रयागराज कुंभ मध्ये गंगेची निर्मलता जगभरातील श्रद्धाळूंनी  अनुभवली. आता हरिद्वार कुंभ दरम्यानही निर्मळ गंगास्नानाचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

मित्रांनो, नमामी गंगा मिशन अंतर्गत गंगेच्या शेकडो घाटांचे सुशोभिकरण केले जात आहे आणि गंगा विहारासाठी आधुनिक रिव्हर फ्रंट सुद्धा बांधले जात आहे. हरिद्वार मध्ये तरी रिव्हर फ्रंट बांधून तयार आहे. आता गंगा म्युझियम सुरु झाल्यानंतर यासाठी आकर्षण अधिक वाढेल. गंगेला संलग्न असलेली परंपरा हरिद्वारला येणाऱ्या पर्यटकांना  समजून देण्याच्या दृष्टीने हे वस्तुसंग्रहालय महत्वाचे काम करेल.

मित्रांनो, आता नमामि गंगा अभियान एका नवीन पायरीपर्यंत येऊन ठेपले आहे. गंगेच्या स्वच्छतेबरोबरच आता गंगेच्या आजूबाजूच्या संपूर्ण क्षेत्राची अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचा विकास यावरही फोकस आहे. सरकारने उत्तराखंडसह सर्व राज्यांमधील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसंच आयुर्वेदिक वनस्पती यांची शेती याचा लाभ घेता यावा यासाठी मोठी योजना तयार केली आहे. गंगेच्या दोन्ही किनाऱ्यावर अजून झाडे लावणे तसेच सेंद्रिय शेती कॉरिडॉर विकसित केला जात आहे. गंगाजल अजून स्वच्छ  करण्यासाठी या मैदानी प्रदेशात मिशन डॉल्फिनची मदतही मिळणार आहे.  या 15 ऑगस्टला मिशन डॉल्फिनची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे गंगेत डॉल्फिन संवर्धन अधिक जोरकसपणे होईल.

मित्रहो, ज्या काळात पाण्याप्रमाणे पैसा खर्च होत होता परंतु परिणाम दिसत नव्हता त्या काळातून देश आता बाहेर पडला आहे. आज पैसा पाण्याबरोबर वाहत नाही किंवा पाण्यात ही वाहून जात नाही त्याऐवजी पैसा न् पैसा पाण्यावर लावला जातो. पाण्यासारखा महत्त्वाचा विषय अनेक मंत्रालय आणि विभागांमध्ये वाटला गेला होता ही आपल्याकडची परिस्थिती होती.  या मंत्रालयात आणि विभागांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता किंवा एकच लक्ष्य ठरवून काम करण्यासाठी कोणतेही स्पष्ट निर्देश नव्हते. परिणामी देशात सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याबद्दलच्या समस्या सतत वाढत, अक्राळविक्राळ होत गेल्या. आपणच विचार करा, स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षातही 15 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये पाइपने तळ्याचे पाणी पोचत नव्हते. उत्तराखंडातसुद्धा हजारो घरांमध्ये हीच परिस्थिती होती. गावात डोंगरांमध्ये जिथे ये जा करणे कठीण होते तिथे आमच्या माता-भगिनी, मुलींना पाण्याची सोय करण्यासाठी सर्वात जास्त कष्ट घेणे भाग पडते.  अभ्यास शिक्षण सोडावे लागत होते या सर्व अडचणी दूर करण्यासाठी देशातील पाण्याच्या सर्व आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठीच जलशक्ती मंत्रालय स्थापन केले गेले. या जलशक्ति मंत्रालयाने अत्यंत कमी कालावधीत आपले काम सुरु केले आनंदाची गोष्ट आहे. पाण्याच्या समस्या सोडवण्यासोबतच आता हे मंत्रालय देशातील प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या मिशनमध्ये आहे.  जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक दिवशी जवळपास एक लाख कुटुंबांना शुद्ध पेयजल सुविधा मिळू लागली आहे. फक्त  वर्षभरात देशातील दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचले आहे.  उत्तराखंडात त्रिवेंद्रजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत फक्त एक रुपयात पाण्याची जोडणी देण्याचा विडा उचलला आहे. उत्तराखंड सरकारने वर्ष 2022 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचवण्याचं ध्येय ठेवलं आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या या कालखंडातही उत्तराखंडात गेल्या 4-5 महिन्याच 50000 हून अधिक कुटुंबांना पाण्याची जोडणी दिली गेली आहे. ही गोष्ट उत्तराखंड सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला देते, कमिटमेंटचा दाखला देते.

मित्रांनो जलजीवन अभियान गाव आणि गरीबाच्या घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे अभियान तर आहेच, त्याचबरोबर ते एक प्रकारे ग्राम स्वराज्य, गावांचे सशक्तीकरण यासाठी देखील एक नवीन ऊर्जा, नवी ताकद , नवीन उंची देणारे अभियान आहे. सरकारच्या  काम करण्यामध्ये किती मोठा बदल झाला आहे, हे त्याचेही उदाहरण आहे. यापूर्वी सरकारच्या योजनांवर बऱ्याचदा दिल्लीत बसूनच निर्णय होत होते. कुठल्या गावात कुठे सोर्स टैंक बनेल, कुठून पाइपलाइन टाकली जाईल, हे सर्व निर्णय अनेकदा राजधानीतच व्हायचे. मात्र जल जीवन अभियानाने आता या सर्वच बाबतीत बदल घडवून आणला आहे. गावांमध्ये पाण्याशी संबंधित कुठली कामे आहेत, कुठे कामे आहेत, त्याची काय तयारी करायची हे सर्व ठरवण्याचे , निर्णय घेण्याचे अधिकार आता गावातील लोकांना देण्यात आले आहेत. पाण्याच्या प्रकल्पांच्या नियोजनापासून देखभाल आणि परिचालन पर्यंत संपूर्ण व्यवस्था ग्राम पंचायत करेल, जल समित्या करतील. जल समित्यां मध्येही 50 टक्के गावातील भगिनी-मुली असाव्यात हे देखील सुनिश्चित केले आहे.

मित्रानो, आज ज्या  मार्गदर्शिकेचे विमोचन करण्यात आले आहे, ते याच भगिनी-मुलींसाठी , जल समितीच्या सदस्यांसाठी, पंचायत सदस्यांसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे. एक प्रकारे मार्गदर्शिका आहे आणि मला पूर्ण विश्‍वास आहे कि पाण्याचे संकट काय असते, पाण्याचे मोल काय असते, पाण्याची गरज सुविधा आणि संकट दोन्ही कसे बरोबर घेऊन येते . ही बाब आपल्या माता -भगिनी जेवढ्या समजू शकतात तेवढे क्वचितच अन्य कुणी समजू शकेल.  आणि म्हणूनच यांचे पूर्ण कामकाज माता-भगिनींच्या हातात जाते, तेव्हा अतिशय संवेदनशीलतेने , जबाबदारीने त्या हे काम पार पाडतात आणि उत्तम परिणाम देखील देतात.

ही मार्गदर्शिका गावातील लोकांना एक मार्ग दाखवेल, त्यांना निर्णय घेण्यात मदत करेल. मला वाटते, जल जीवन अभियानाने  गावातील लोकांना एक संधी दिली आहे. एक संधी, आपल्या गावाला पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्याची, एक संधी आपल्या गावात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची.  मला सांगण्यात आले आहे  की जल जीवन अभियान  2 ऑक्टोबर पासून गांधी जयंतीपासून आणखी एक अभियान सुरु करणार आहे.  100 दिवसांचे एक विशेष अभियान, ज्या अंतर्गत देशातील प्रत्येक शाळा आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये नळाद्वारे पाणी सुनिश्चित केले जाईल. मी हे अभियान यशस्वी होण्यासाठी  शुभेच्छा देतो.

मित्रानोनमामि गंगे अभियान असो, जल जीवन अभियान असोस्वच्छ भारत अभियान असो, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम गेल्या  6 वर्षातील मोठ्या सुधारणांचा भाग आहेत. या अशा सुधारणा आहेत, ज्या सामान्य लोकांच्या जीवनात, सामाजिक व्यवस्थेमध्ये नेहमीच सार्थक बदल घडवून आणण्यात सहायक आहेत. मागील एक-दीड वर्षात तर यात आणखी गती आली आहे. आता जे संसदेचे अधिवेशन संपले, यामध्ये देशातील शेतकरी, कामगार आणि देशातील आरोग्याशी संबंधित मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे देशातील कामगार अधिक सशक्त होईल, देशातील युवक सशक्त होईल , देशातील महिला सक्षम होतील, देशातील शेतकरी सक्षम होईल. मात्र आज देश पाहत आहे कि कशा प्रकारे काही लोक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत.

मित्रानो, काही दिवसांपूर्वी, देशाने आपल्या शेतकऱ्यांना अनेक बंधनांमधून मुक्त केले आहे. आता देशातील शेतकरी, कुठेही, कुणालाही आपला शेतमाल विकू शकतो. मात्र, आज जेव्हा  केंद्र सरकार, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देत आहे, तेव्हाही हे लोक विरोध करायला उतरले आहेत. देशातील शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला शेतमाल विकू नये अशी यांची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या गाडया जप्त होत राहाव्यात, त्यांच्याकडून वसुली सुरु राहावी, त्यांच्याकडून कमी किमतीत धान्य खरेदी करून दलालांनी नफा कमवत राहावे असे त्यांना वाटते. ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा विरोध करत आहेत. ज्या सामानांची, उपकरणांची शेतकरी पूजा करतो, ते पेटवून देऊन हे लोक आता शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत.

मित्रानो, गेली अनेक वर्षे हे लोक म्हणत होते  एम एस पी लागू करू, मात्र केले नाही. किमान हमी भाव लागू करण्याचे काम स्‍वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आमच्या सरकारने केले. आज हे लोक हमी भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. देशात हमी भाव देखील राहील आणि शेतकऱ्यांना कुठेही आपला शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य असेल.  मात्र ही मोकळीक काही लोक सहन करू शकत नाहीत. त्यांच्या काळ्या पैशाचे आणखी एक साधन संपुष्ठात आले आहे म्हणून ते संतप्त आहेत.

मित्रांनोकोरोनाच्या या काळात देशाने पाहिले आहे कि डिजिटल भारत अभियानाने   जनधन बँक खात्यांनी, रूपे कार्डनी  कशा प्रकारे लोकांची मदत केली आहे. मात्र तुम्हाला आठवत असेल, जेव्हा हेच काम आमच्या सरकारने सुरु केले तेव्हा हे लोक त्याला विरोध करत होते. त्यांच्या नजरेत देशाचा गरीब, देशातील गावांमधील लोक निरक्षर होतेअज्ञानी होते. देशातील गरीबांचे बँक खाते उघडले जावे, त्यांनीही डिजिटल व्यवहार करावेत, याचा या लोकांनी कायम विरोध केला.

मित्रांनो, देशाने हे देखील पाहिले आहे कि जेव्हा एक देश-एक कर हा मुद्दा आला, जीएसटीचा मुद्दा आला तेव्हा पुन्हा या लोकांनी विरोध केला. जीएसटीमुळे देशांतर्गत वस्तूंवर आकारला जाणारा कर खूपच कमी झाला आहे. बहुतांश घरगुती सामानावर, स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तूंवर आता कर जवळजवळ नाहीच किंवा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.पूर्वी याच वस्तूंवर जास्त कर आकारला जायचा, लोकांना आपल्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागत होते.मात्र, तुम्ही पहा या लोकांना जीएसटीचा देखील त्रास होत आहे, ते त्याची टिंगल करतात, त्याचा विरोध करतात.

मित्रानो, हे लोक शेतकऱ्यांबरोबर नाहीत, युवकांबरोबर नाहीत, आणि जवानांबरोबर देखील नाहीत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आमचे सरकारने एक पद एक निवृत्तीवेतन योजना आणलीउत्तराखंडच्या  हजारों माजी  सैनिकाना त्यांचा  अधिकार दिला, तेव्हा हे लोक विरोध करत होते.   वन रैंक-वन पेंशन लागू केल्यापासून सरकारने माजी सैनिकांना सुमारे  11 हजार कोटी रुपये थकबाकी स्वरूपात दिले आहेत. इथे उत्तराखंडमध्ये देखील  एक लाखाहून अधिक माजी सैनिकांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र या लोकांना  वन रैंक-वन पेंशन लागू केल्यामुळे नेहमी त्रास झाला. या लोकांनी  वन रैंक-वन पेंशनचा देखील विरोध केला. 

मित्रांनो, अनेक वर्षे या लोकांनी देशातील सैन्यदलांना, हवाई दलाला सशक्त करण्यासाठी काहीही केलेले नाही. हवाई दल म्हणत राहिले कि आम्हाला आधुनिक लढाऊ विमाने हवीत. मात्र हे लोक हवाई दलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत राहिले. जेव्हा आमच्या सरकारने  थेट  फ्रांस सरकारबरोबर राफेल लढाऊ विमानांसाठी करार केला तेव्हा पुन्हा त्यांना त्रास होऊ लागला.  भारतीय हवाई दलाकडे राफेल यावे, हवाई दलाची ताकद आणखी वाढावी, याचाही ते विरोध करू लागले. मला आनंद आहे कि आज राफेल हवाई दलाचे सामर्थ्य वाढवत आहे.  अंबाला पासून  लेह पर्यंत त्याची गर्जना, भारतीय शूर जवानांचे मनोबल उंचावत आहे.

मित्रांनो, चार वर्षांपूर्वी हीच ती वेळ होती जेव्हा देशाच्या शूर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवादाचे अड्डे उध्वस्त केले होते. मात्र हे लोक आपल्या शूर जवानांच्या साहसाची प्रशंसा करायची सोडून त्यांच्याकडे  सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. सर्जिकल स्ट्राइकचा देखील विरोध करून या लोकांनी देशासमोर आपली इच्छा, आपला हेतू  स्पष्ट दाखवला आहे. देशासाठी होत असलेल्या प्रत्येक कामाला विरोध करणे, या लोकांची सवय बनली आहे. त्यांच्या राजकारणाची एकमेव पद्धत आहे विरोध करणे. तुम्ही आठवून पहा, भारताच्या पुढाकाराने जेव्हा संपूर्ण जग अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत होते, तेव्हा हे लोक भारतातच बसून त्याचा विरोध करत होते. जेव्हा देशातील शेकडो संस्थानांना जोडण्याचे ऐतिहासिक काम करणाऱ्या सरदार पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले जात होते तेव्हा देखील हे लोक त्याचा विरोध करत होते.. आजपर्यंत त्यांचा कुणीही प्रमुख नेता स्टॅचू ऑफ युनिटी पाहायला गेलेला नाही. का? कारण त्यांना विरोध करायचा आहे

मित्रानो, जेव्हा गरीबांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला, तेव्हा देखील हे लोक त्याविरोधात उभे ठाकले. जेव्हा 26 नोव्हेम्बर रोजी संविधान दिन साजरा करण्याचा विचार झाला तेव्हा देखील ते त्याला विरोध करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करत होते. मित्रानो, गेल्याच महिन्यात अयोध्या इथे भव्य राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. हे लोक आधी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराला विरोध करत होते, नंतर  भूमिपूजनला विरोध करायला लागले. प्रत्येक बदलत्या तारखेबरोबर विरोधासाठी विरोध करणारे हे लोक देशासाठी, समाजासाठी अप्रासंगिक होत चालले आहेत. यामुळेच  बेचैनी आहे, निराशा आहेएक असा पक्ष ज्याच्या एका कुटुंबाच्या चार-चार पिढ्यानी देशावर राज्य केले, ते आज दुसऱ्यांच्या खांदयावर स्वार होऊन देशहिताशी संबंधित प्रत्येक कामाला विरोध करून आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छित आहेत.

मित्रानो, आपल्या देशात असे अनेक छोटे छोटे पक्ष आहेत, ज्यांना कधीही सत्तेत येण्याची संधी मिळाली नाही. स्थापनेपासून आतापर्यन्त त्यांनी बहुतांश काळ विरोधी पक्षातच काढला आहे.इतकी वर्षे विरोधी बाकांवर बसून देखील त्यांनी कधी देशाला विरोध केला नाही.  देशविरोधी कारवाया केल्या नाहीत. मात्र काही लोकांनी विरोधी बाकांवर बसून काही वर्षच लोटली आहेत . त्यांची पद्धत काय आहे, त्यांचा स्वभाव काय आहे ते आज देश पाहत आहे, समजले आहे. त्यांच्या स्वार्थी धोरणांच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारतासाठी मोठ्या सुधारणा करण्याचा , देशातील संसाधने उत्तम करण्याचे हे काम देशहिताचे आहे, देशाला गरीबीपासून मुक्त करण्याच्या या अभियानासाठी आहे, देशाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे, आणि ते निरंतर सुरूच राहील.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे विकासाच्या सर्व प्रकल्पांसाठी खूप-खूप अभिनंदन. 

मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वानी आपली काळजी घ्या. स्वस्थ रहासुरक्षित रहा.  बाबा केदार यांची आपणा सर्वांवर कायम कृपा राहो.

याच इच्छेसह खूप-खूप  धन्यवाद ! जय गंगे !

****"

B.Gokhale/V.Sahajrao/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660049) Visitor Counter : 265