गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून "डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020" महोत्सवाचे उद्घाटन
योग्य निधी अभावी विकास शक्य नाही; ईशान्येकडील राज्यांसाठी 14 व्या वित्त आयोगाकडून 251 टक्के वाढीसह रु. 3,13,375 कोटींची तरतूद
विकासाच्या सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी मॉडेलचा अंगिकार करून मोदी सरकारने नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या अर्थसंकल्पाच्या 21 टक्के
खर्च मागास जिल्हे, गावे आणि वंचित समुहांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2020 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज "डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020" या महोत्सवाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले केंद्रीय गृहमंत्री नॉर्थ ईस्ट कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत. ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा विभाग आणि अंतराळ विभाग डॉ. जितेंद्र सिंह आणि ईशान्येकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की ईशान्येकडचा भाग नैसर्गिक सौंदर्याने, लोकसंस्कृती आणि कला यांनी समृद्ध आहे आणि जागतिक पर्यटनामध्ये एक महत्त्वाचे केंद्र बनण्याची त्याची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडचे प्रदेश भारतातील सर्वाधिक पसंतीच्या पर्यटन स्थळांपैकी आणि व्यावसायिक केंद्रांपैकी एक म्हणून उदयाला येतील, असे शहा म्हणाले. योग्य निधी अभावी विकास शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी ईशान्येकडच्या भागांच्या विकासाच्या योजना तयार केल्या जायच्या मात्र, त्यासाठी अतिशय कमी निधीची तरतूद केली जायची, असे त्यांनी सांगितले. ईशान्येकडील भागांसाठी 14 व्या वित्त आयोगाकडून 251 टक्के वाढीसह रु. 3,13,375 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर यापूर्वीच्या सरकारच्या काळात 13व्या वित्त आयोगाने केवळ 89,168 कोटी रुपयांची तरतूद केली होती, असे त्यांनी सांगितले.

विकासाच्या सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी मॉडेलचा अंगिकार करून मोदी सरकारने नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या अर्थसंकल्पाच्या 21 टक्के खर्च मागास जिल्हे, गावे आणि वंचित समुहांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शहा यांनी दिली.
ईशान्येकडच्या राज्यांना परस्परांना जोडण्यासाठी आणि या संपूर्ण भागाला उर्वरित भारताशी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडण्यासाठी मोदी सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. याअंतर्गत 15,088 कोटी रुपयांचे सहा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच 553 कोटी रुपये विमानतळाच्या विकासावर खर्च करण्यात येतील आणि 869 किमी लांबीच्या 19 रस्ते प्रकल्पांवर 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात मोदी सरकारने ईशान्येकडील नागरिकांना औषधे आणि एम्समधील डॉक्टरांकडून टेलिमेडिसिनच्या माध्यमातून उपचारांसह सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवल्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या काळात सरकारने 3.09 कोटी लोकांना 7.7 लाख मेट्रिक टन अन्नधान्य पुरवले. तसेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 533 कोटी रुपये आणि जनधन योजने अंतर्गत 1707 कोटी रुपये लोकांच्या बँक खात्यात थेट जमा केल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली.
स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडच्या भागांचा देशाच्या जीडीपीमध्ये 20 टक्के वाटा असायचा. मात्र, आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ईशान्येकडच्या भागांना पर्यटनाचे आणि उद्योगांचे आणि माहिती तंत्रज्ञान आणि वनौषधी लागवडीचे प्रमुख केंद्र बनवण्याचे आणि 2024 पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये या भागाचा वाटा वाढवण्याचे त्यांनी आवाहन केले. भारत सरकारच्या पूर्वाभिमुख धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग बनला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उदयोन्मुख आनंददायी स्थळे ही डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020 या महोत्सवाची संकल्पना आहे आणि त्यातून या भागामध्ये पर्यटन केंद्रे उदयाला येत असल्याचे आणि त्यांना चालना मिळाल्यावर ती अधिक आकर्षक बनणार असल्याचे सूचित होत आहे.
या चार दिवसांच्या महोत्सवात या राज्यांमधील पर्यटन स्थळांबाबत दृक-श्राव्य सादरीकरणे करण्यात येतील, राज्यांमधील मान्यवर आणि नामवंत व्यक्तिमत्वांचे संदेश प्रसारित करण्यात येतील, प्रमुख स्थानिक उद्योजकांची ओळख करून दिली जाईल आणि हस्तकला/ पारंपरिक फॅशन आणि स्थानिक उत्पादने यांचे प्रदर्शन भरवण्यात येईल. राज्यांचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांचे विशेष संदेश असतील. तसेच प्रत्येक राज्यांचे स्वतःचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि परस्परांच्या संस्कृतींच्या एकीकरणाचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.
M.Iyengar/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1659659)
आगंतुक पटल : 235