पंतप्रधान कार्यालय

संयुक्त राष्ट्र संघाच्‍या (UNGA) 2020 च्‍या 75 व्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 26 SEP 2020 9:54PM by PIB Mumbai

 

अध्यक्ष महोदय,

संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी भारताच्या  130 कोटींहून अधिक लोकांच्या वतीने प्रत्येक सदस्य देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो. भारताला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की, तो संयुक्त राष्ट्राच्या संस्थापक देशांपैकी एक आहे. आजच्या या  ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर भारताच्या 130 कोटी लोकांच्या भावना या जागतिक मंचावर सामायिक करायला आलो आहे.

 

अध्यक्ष महोदय,

1945 च्या वेळचे जग निश्चितपणे आजच्यापेक्षा वेगळे होते. जागतिक परिस्थिती, साधन-संसाधनेसमस्या-उपाय सगळे काही वेगळे होते. अशा स्थितीत  विश्व कल्याणाच्या भावनेसह ज्या संस्थेची स्थापना झाली, ज्या स्वरूपात स्थापना झाली ती देखील त्यावेळच्या परिस्थितीनुसार होती. आज आपण एका एकदम वेगळ्या युगात आहोत.  21व्या शतकात आपल्या  वर्तमानातील, आपल्या भविष्यातील गरजा आणि आव्हाने आता पूर्वीपेक्षा वेगळी आहेत. म्हणूनच आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एक मोठा प्रश्न आहे कि ज्या संस्थेची स्थापना त्यावेळच्या परिस्थितित झाली होती त्याचे स्वरूप आजही  प्रासंगिक आहे का? शतक बदलले आणि आपण नाही बदललो तर बदल घडवून आणण्याची ताकद देखील कमी होते. जर आपण मागील 75 वर्षातील संयुक्त राष्ट्राच्या कामगिरीचे मूल्यमापन केले तर अनेक प्रकारची कामगिरी दिसून येईल. मात्र त्याचबरोबर अशी अनेक  उदाहरणे देखील आहेत जी संयुक्त राष्ट्रांसमोर गंभीर आत्मचिंतन करण्याची  आवश्यकता निर्माण करतात. ही गोष्ट खरी आहे कि जरी तिसरे जागतिक युद्ध झालेले नसले तरी ही गोष्ट नाकारता येत नाही कि अनेक युद्धे झाली, अनेक गृहयुद्ध देखील झाली. कितीतरी दहशतवादी हल्ल्यानी संपूर्ण जगाला हादरवून सोडले, रक्त सांडले.

या युद्धांमध्ये, या हल्ल्यांमध्ये जे मारले गेले, ते तुमच्या-आमच्यासारखी माणसेच होती. ती लाखो निष्पाप मुले ज्यांनी हे जग समृद्ध केले असते ती हे जग सोडून गेली. कितीतरी लोकांना आपली आयुष्यभराची कमाई गमवावी लागली, आपल्या स्वप्नातील घर सोडावे लागले. त्याकाळी आणि आजही , संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न पुरेसे होते का ? मागील  8-9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना महामारी विरोधात लढत आहे. या जागतिक महामारी विरुद्ध निपटण्याच्या प्रयत्नांमध्ये  संयुक्त राष्ट्र कुठे आहे , त्याचा  प्रभावशाली प्रतिसाद कुठे आहे?

 

अध्यक्ष महोदय,

संयुक्त राष्ट्राच्या प्रतिक्रियामध्ये बदल, व्यवस्थामध्ये बदल, स्वरूपात बदलआज काळाची गरज आहे. संयुक्त राष्ट्राचा भारतात आज आदर आहे , भारताच्या  130 कोटींहून अधिक लोकांचा या जागतिक संस्थेवरील अतूट विश्वास आहे. जो तुम्हाला खूप कमी देशांमध्ये मिळेल. मात्र हे देखील तेवढेच सत्य आहे कि  भारतीय लोक  संयुक्त राष्ट्राच्या सुधारणांबाबत जी प्रक्रिया सुरु आहे, ती पूर्ण होण्याची बऱ्याच  काळापासून प्रतीक्षा करत होते. आज भारतीय लोक चिंतित आहेत कि ही प्रक्रिया कधी एका निर्णायक टप्प्यावर पोहचू शकेल का ? आणखी किती काळ भारताला संयुक्त  व्यवस्थेपासून दूर ठेवले जाणार आहे ? एक असा देश जो जगातील सर्वात मोठी लोकशाही आहेएक असा देश, जिथे जगातील 18 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते, एक असा देश जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात, अनेक पंथ आहेत, अनेक विचारधारा आहेत, ज्या देशाने शेकडो वर्षांपर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व केले आहे आणि शेकडो वर्षांची  गुलामी, पाहिली आहे. 

 

अध्यक्ष महोदय,

जेव्हा आम्ही मजबूत होतो, तेव्हा आम्ही जगाला कधीही अडचणीत टाकले नाही, जेव्हा आम्ही कमजोर होतो, तेव्हा जगावर कधी ओझे बनलो नाही.

 

अध्यक्ष महोदय,

ज्या देशात वर्तमान विकास विषय असलेल्या परिवर्तनांचा प्रभाव जगातील खूप मोठ्या भागावर पडतो, त्या देशाला आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे ?

 

अध्यक्ष महोदय,

संयुक्त राष्ट्राची ज्या आदर्श मूल्यांवर स्थापना झाली, आणि ती भारताच्या मूलभूत तत्वांशी खूप मिळतीजुळती आहेत, वेगळी नाहीत. संयुक्त राष्ट्राच्या याच सभागृहात हे  शब्द अनेकदा घुमले आहेत - वसुधैव कुटुम्बकम. आम्ही सम्पूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. ही आमची  संस्कृति, संस्कार आणि विचारांचा भाग आहे. संयुक्त राष्ट्रांतही भारताने नेहमी जागतिक कल्याणाला प्राधान्य दिले आहे. भारत तो देश आहे ज्याने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुमारे  50 शांतता मोहिमांमधून आपले शूर सैनिक पाठवले. भारत तो देश आहे, ज्याने शांतता प्रस्थापित करण्यात सर्वात जास्त आपले वीर सैनिक गमावले आहेत.  आज प्रत्येक भारतीय , संयुक्त राष्ट्रात आपले  योगदान पाहत असताना  संयुक्त राष्ट्रात आपली विस्तारित भूमिका देखील पाहत आहे. 

 

अध्यक्ष महोदय,

02 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनआणि 21 जून रोजी अंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यासाठी भारतानेच पुढाकार घेतला होता. आपत्ती रोधक पायाभूत विकास आघाडी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, हे देखील भारताचेच प्रयत्न आहेत.

भारताने कधीच  निहीत स्वार्थाचा विचार केला नाही आणि नेहमीच संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारताने आपल्या नीतीधोरणांची आखणीही याच तत्वाने प्रेरित होवून केली आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्टम्हणजेच सर्वप्रथम शेजारधर्म या धोरणापासून ते अॅक्ट ईस्टधोरणापर्यंत, तसेच संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा आणि वृद्धी करण्याचा विचार असो, इंडो पॅसिफिक क्षेत्राविषयी आमचे विचार या सर्वांमधून आमच्या तत्वांची झलक दाखवतात. भारताच्या सहभागीतेसाठीही असेच मार्गदर्शक सिद्धांत निश्चित करतात. भारत ज्यावेळी मित्रत्वाचा हात पुढे करतो, त्यावेळी तो कुणा तिस-याच्या विरोधात कार्य करीत नाही. भारत ज्यावेळी विकासासाठी मजबूत सहभागीता, सामंजस्य करतो, त्यावेळी त्याच्यामागे कोणत्याही प्रकारे इतर सहकारी देशांना अडचणीत आणून त्रास देण्याचा विचारही करीत नाही. आम्ही आमच्या विकास यात्रेमध्ये आलेले अनुभव सामायिक करण्याचे कामही करतो, या कामात आम्ही कधीच मागे नसतो.

 

अध्यक्ष महोदय,

कोविड-19 महामारीच्या या अतिशय अवघड काळामध्येही भारताच्या औषध उद्योगाने 150 पेक्षा अधिक देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला आहे. संपूर्ण विश्वातला सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून आज वैश्विक समुदायाला मी आणखी एक आश्वासन देवू इच्छितो. भारत आपल्याकडे असलेली लस उत्पादन क्षमता आणि लस सर्वत्र पोहोचविण्याची क्षमता संपूर्ण मानवजातीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येणार आहे. आम्ही भारतामध्ये आणि आमच्या शेजारी देशांमध्ये लस निर्माणासाठी, तिस-या टप्प्यांतील वैद्यकीय चाचण्यांपर्यंत पुढे जात आहोत. लशीचा शक्य तितक्या लवकर सर्वत्र पुरवठा करता यावा, यासाठी शीत श्रृंखला आणि साठवणूक करण्याच्या क्षमतेमध्ये वृद्धी करण्यासाठी भारत, सर्वांना मदत करेल.

 

अध्यक्ष महोदय,

पुढच्या वर्षी जानेवारीपासून भारत, सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडेल. जगभरातल्या अनेक देशांनी भारतावर जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी मी सर्व मित्र, सहकारी देशांचे आभार व्यक्त करतो. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रतिष्ठा आणि त्याचे अनुभव यांचा आम्ही विश्वाच्या हितासाठी उपयोग करू. आमचा मार्ग जन-कल्याणापासून सुरू होतो, तो जग-कल्याणापर्यंत आहे. भारताचा आवाज नेहमीच शांती, सुरक्षा आणि समृद्धी यांच्यासाठी उठला आहे. भारताचा आवाज मानवता, मानवजात आणि मानवी मूल्यांचे शत्रू- दहशतवाद, अवैध हत्यारांची तस्करी, ड्रग्स, पैशाची अफरातफरी, यांच्या विरोधात उठेल. भारताचा सांस्कृतिक वारसा, संस्कार, हजारों वर्षांचा अनुभव, हे सर्व विकसनशील देशांना नेहमीच ताकद देतील. भारताचे अनुभव, भारताची चढ-उतारांनी व्यापलेली विकासयात्रा, विश्व कल्याणाच्या मार्गाला अधिक मजबूत बनविणार आहे.

 

अध्यक्ष महोदय,

गेल्या काही वर्षांमध्ये रिफॉर्म- परफॉर्म- ट्रान्सफॉर्म हा मंत्रजप करीत भारताने कोट्यवधी भारतीयांच्या जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले आहे. हे अनुभव आम्हाला जितके उपयोगी पडले तितकेच विश्वातल्या अनेक देशांसाठी  उपयुक्त  ठरणारे आहेत. अवघ्या 4-5 वर्षांमध्ये 400 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे काही सोपे काम नाही. परंतु भारताने हे काम करून दाखवले आहे. केवळ 2-3 वर्षांमध्ये 500 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना मोफत औषधोपचार सुविधा मिळू शकणा-या योजनेमध्ये सहभागी करून घेणे, काही सोपे नाही. परंतु भारताने हे काम करून दाखवले आहे. आज भारत डिजिटल व्यवहार करणा-यांमध्ये दुनियेतला अग्रगण्य देशांपैकी एक आहे. आज भारत आपल्या कोट्यवधी नागरिकांना डिजिटल सुविधा देवून सक्षम करीत आहे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शक आणणे सुनिश्चित करीत आहे. आज भारत, सन 2025 पर्यंत आपल्या प्रत्येक नागरिकाला क्षयरोगातून मुक्त करण्याचे खूप मोठे अभियान चालवित आहे. आज भारत आपल्या गावातल्या 150 दशलक्ष घरांमध्ये जलवाहिनीव्दारे पेयजल पोहोचविण्याचे अभियान चालवित आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरने जोडण्याची एक खूप मोठी योजना सुरू केली आहे.

 

अध्यक्ष महोदय,

कोविड-19 महामारीच्या उद्रेकानंतरच्या परिस्थितीनंतर आम्ही आत्मनिर्भर भारतहे व्हिजननिश्चित करून पुढे वाटचाल करीत आहोत. आत्मनिर्भर भारत अभियान हे वैश्विक अर्थव्यवस्थेसाठीही असंख्य पटीने कार्यरत असलेली शक्ती म्हणून उपयोगी ठरू शकेल. देशात सुरू झालेल्या सर्व योजनांचा लाभ कोणत्याही प्रकारच्या भेदभावविरहीत राबविल्या जाव्यात, सर्व सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे भारतामध्ये आम्ही सुनिश्चित करीत आहोत. महिला उद्योजक आणि महिला नेतृत्व उदयास यावे,यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत, यासाठी मोठ्या प्रमाणावर, अगदी व्यापक विचार करून प्रयत्न सुरू आहेत. आज दुनियेतल्या सर्वात मोठ्या सूक्ष्म वित्तीय योजनेचा सर्वात जास्त लाभ भारतातल्या महिला घेत आहेत. जगातल्या ज्या देशांमध्ये महिलांना 26 आठवड्यांची  मातृत्वाची पगारी रजा दिली जाते, त्या देशांपैकी भारतही एक आहे. भारतामध्ये तृतीयपंथियांचे हक्क, अधिकार यांना संरक्षण देण्यासाठीही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

 

अध्यक्ष महोदय,

भारत विश्वाकडून खूप काही शिकत आहे आणि विश्वाला आपले अनुभव देत पुढे जावू इच्छित आहे. मला विश्वास आहे की, या 75 व्या वर्षामध्ये संयुक्त राष्ट्र आणि सर्व सदस्य देश, या महान संस्थेची प्रासंगिकता कायम राखण्यासाठी, कटिबद्ध होवून कार्य करतील. संयुक्त राष्ट्रामध्ये संतुलन आणि संयुक्त राष्ट्राचे सशक्तीकरण, विश्वाच्या कल्याणासाठी तितकेच अनिवार्य आहे. चला तर, संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्षानिमित्त आपण सर्वजण मिळून या विश्वाच्या कल्याणासाठी, समर्पित होण्याचा निश्चय करून, पुन्हा एकदा  वचनबद्ध होवूया ! 

धन्यवाद !!

****

B.Gokhale/S.Kane/S.Bedekar//P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659442) Visitor Counter : 437