पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ


फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त तंदुरुस्तीबाबत उत्साही व्यक्तींशी संवाद साधला

फिट इंडिया डायलॉग प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीच्या आवडीवर लक्ष केंद्रित करते आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम दर्शवते-पंतप्रधान

Posted On: 24 SEP 2020 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला. औपचारिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागितांनी पंतप्रधानांसमवेत आपले अनुभव आणि तंदुरुस्तीच्या बाबी सामाईक केल्या. 

पंतप्रधानांचा देवेंद्र झाझडिया, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, भालाफेक यांच्याशी संवाद

पंतप्रधानांनी देवेंद्र यांचे विविध जागतिक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल कौतुक केले. देवेंद्र यांनी आव्हानांवर कशी मात केली, आणि एक प्रसिद्ध क्रीडापटू म्हणून नाव कमावले, याबद्दल पंतप्रधानांनी विचारपूस केली.

देवेंद्र झाझडिया यांनी कठीण काळातील प्रसंग विशद करताना सांगितले की, इलेक्ट्रीक शॉकमुळे त्यांना हात गमवावा लागला आणि आईने त्यांना सामान्य बालकांप्रमाणे वागण्यास आणि तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची प्रेरणा दिली. 

पंतप्रधानांनी चौकशी केली की, देवेंद्र यांनी नुकत्याच झालेल्या खांद्याच्या दुखापतीवर कशी मात केली आणि क्रीडाक्षेत्रातून निवृत्त होण्याचा मानस कसा बदलला. देवेंद्र झाझडिया यांनी सांगितले की, प्रत्येकाला प्रथम स्वतःवर विश्वास असला पाहिजे जेणेकरुन मानसिक आणि शारिरीक आव्हानांवर मात करता येईल.

त्यांनी काही व्यायामांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले आणि दुखापतीवर विजय मिळविण्यासाठी अनुसरण केलेल्या तंदुरुस्तीविषयी चर्चा केली.

पंतप्रधानांनी पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते देवेंद्र यांचे प्रेरणात्मक कार्याबद्दल कौतुक केले आणि त्यांच्या आई, ज्या 80 व्या वर्षीही तंदुरुस्त आहेत, त्याबद्दल प्रशंसा केली.

पंतप्रधानांचा फुटबॉलपटू अफसान अशिक यांच्याशी संवाद

जम्मू आणि काश्मीर संघाच्या गोलकीपर म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे, कारण तिला मातेच्या भूमिकेत पूर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. एम एस धोनी यांच्या शांत चित्ताने खेळण्याच्या शैलीतून प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सकाळी ध्यानधारणा केल्यामुळे शांत आणि संतुलित राहता येते, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधानांनी विचारले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामान परिस्थितीत तंदुरुस्तीबाबत पारंपरिक पद्धती काय आहेत. अफसान यांनी सांगितले गिर्यारोहण (ट्रेक) च्या माध्यमातून तंदुरुस्ती वाढते. जम्मू आणि काश्मीरमधील लोक उंचावर राहत असल्यामुळे त्यांची श्वसन क्षमता चांगली आहे आणि त्यामुळे इतर शारिरीक कसरतींच्या वेळी त्यांना श्वसनाची समस्या जाणवत नाही.

अफसान यांनी गोलकीपर म्हणून मानसिकदृष्ट्या केंद्रीत आणि शारिरीकदृष्ट्या लवचिक राहावे लागते याबद्दलही सांगितले.

पंतप्रधानांचा मिलिंद सोमण, अभिनेते, मॉडेल यांच्याशी संवाद

मिलिंद सोमण यांचे ‘मेड इन इंडिया मिलिंद’, असे वर्णन करत पंतप्रधान म्हणाले, स्वतः आपल्या पद्धतीने ते मेक इन इंडियाचे पुरस्कर्ते आहेत. मिलिंद सोमण याप्रसंगी म्हणाले, फिट इंडिया मुव्हमेंटमुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे, त्यांना आता शारिरीक आणि मानसिक शक्तीची जाण झाली आहे. त्यांनी आपल्या आईच्या तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. पूर्वीचे लोक तंदुरुस्त होते आणि खेड्यांमध्ये 40-50 किलोमीटर अंतरावरुन पाणी आणत होते, असे ते म्हणाले. पण, आता तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बैठी जीवनशैली झाली आहे, त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, फिटनेसला वयाचे बंधन नाही आणि मिलिंद सोमण यांच्या आई 81 व्या वर्षीही पुश-अप्स काढून तंदुरुस्त असल्याबद्दल प्रशंसा केली.      

मिलिंद सोमण म्हणाले, आपल्याकडे जे काही आहे त्याचा वापर करुन एखादी व्यक्ती तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकते, त्यासाठी केवळ आत्मविश्वास आणि दृढ विचारांची आवश्यकता आहे.

मिलिंद यांनी पंतप्रधानांना विचारले की, ते कशापद्धतीने टीकांना सामोरे जातात. यावर पंतप्रधान म्हणाले, पूर्ण समर्पण भावनेने केलेल कार्य, सर्वांच्या सेवेसाठी केलेले कार्य यामुळे कर्तव्यपूर्तीची भावना निर्माण होते, ज्यामुळे तणाव येत नाही. पंतप्रधान म्हणाले, स्पर्धा हे विचार करण्याच्या सुदृढ मार्गाचे प्रतीक आहे, मात्र त्याचवेळी प्रत्येकाने स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे, इतरांशी नाही. 

पंतप्रधानांचा ऋजूता दिवेकर, पोषणतज्ज्ञ यांच्याशी संवाद

ऋजूता दिवेकर यांनी आहाराच्या - डाळ, भात आणि तूप जुन्या पद्धतींचे महत्व विशद केले. पंतप्रधान म्हणाले, जर आपण स्थानिक उत्पादनाचा आहारात समावेश केला तर आपल्या शेतकऱ्यांना आणि अर्थव्यवस्थेला लाभ होईल. व्होकल फॉर लोकल फार महत्त्वाचे आहे.

त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर तूप कसे तयार करायचे याकडे कल वाढला आहे आणि हळदीच्या दुधाचे महत्त्व लक्षात आले आहे. 

दिवेकर यांनी सांगितले की, शारिरीक आणि मानसिक बाबीवर परिणाम करणारे अन्न आपण टाळले पाहिजे. प्रत्येक प्रांताचे स्वतःचे अन्न वैशिष्ट्ये आहे आणि घरचे जेवण नेहमीच महत्त्वपूर्ण आहे. आपण पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाण्याचे थांबविल्यास आणि अधिक घरगुती पदार्थ खाल्ल्यास, आपल्याला बरेच फायदे दिसू शकतात.

स्वामी शिवध्यानम सरस्वती यांच्याशी पंतप्रधानांचा  संवाद

स्वामी शिवाध्यानम सरस्वती म्हणाले की सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजे सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा  आनंद  या प्रसिद्ध म्हणीमधून त्यांना  प्रेरणा मिळाली.

त्यांनी आपल्या गुरूंबद्दल आणि  योगाच्या महत्वाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेविषयी  सांगितले. त्यांनी प्राचीन गुरु -शिष्य गुरुकुल परंपरेचा उल्लेख केला ज्यामध्ये  विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांनी योग हा केवळ एक व्यायाम नव्हे तर जीवनशैली असल्याचे सांगितले, जे गुरुकुल शिक्षणादरम्यान रुजवले जाते. 

बदलत्या जीवनशैलीनुसार योगामध्ये बदल  करण्याविषयी पंतप्रधानांनी सूचना केली.

विराट कोहलीशी पंतप्रधानांचा संवाद

पंतप्रधानांनी विराट कोहलीशी त्यांच्या तंदुरुस्तीच्या दिनचर्येबद्दल  चर्चा केली. विराट म्हणाला, मानसिक शक्ती तुमच्या शारीरिक सामर्थ्याबरोबर येते.

दिल्लीचे प्रसिद्ध छोलेभटूरे  कसे सोडलेस  हे पंतप्रधानांनी विचारले असता, विराटने तंदुरुस्ती वाढवण्यासाठी आहारात शिस्त आणण्याबरोबरच घरचे साधे जेवण कशा प्रकारे सहाय्यक ठरते याबाबत माहिती दिली.

मोदींनी कॅलरीचे सेवन कसे राखावे याबाबत चर्चा केली. विराट म्हणाला की अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला वेळ देणे आवश्यक आहे. पंतप्रधान योयो चाचणी विषयी बोलले आणि तंदुरुस्तीची संस्कृती आणण्याच्या गरजेवर भर दिला. तुला थकवा येत नाही का याबाबत पंतप्रधानांनी विचारले असता विराट म्हणाला  की चांगली झोप, आहार  आणि तंदुरुस्तीमुळे  आठवड्याभरात शरीर पूर्ववत होते.

 शिक्षणतज्ज्ञ मुकुल कानिटकर  यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद

मुकुल कानिटकर  म्हणाले की, तंदुरुस्ती  ही संकल्पना केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी देखील आहे. आरोग्य संस्कृती निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्यांनी सूर्यनमस्काराचे समर्थन केल्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा केली.  भगवद्गीता ही दोन तंदुरुस्त लोकांमधील चर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -  2020 मध्ये तंदुरुस्तीला  अभ्यासक्रमाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि  सर्वांना फिट इंडियासाठी काम करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. ते म्हणाले की तंदुरुस्ती ही मन  (भावना), बुद्धी (ज्ञान ) आणि भावना (विचार) यांचे मिश्रण  आहे.

पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की फिट इंडिया संवाद प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीवर केंद्रित आहे आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम साकारत आहे.

फिट इंडिया चळवळ सुरु झाल्यानंतर देशात तंदुरुस्तीबाबत मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्ती बाबत जागरूकता निरंतर वाढत असून सक्रियता देखील वाढत आहे. त्यांनी  आनंद व्यक्त केला कि योग, आसन, व्यायाम, चालणे, धावणे , पोहणे , सकस आहाराच्या सवयी , निरोगी जीवनशैली हे सर्व आता आपल्या नैसर्गिक जाणिवेचे अविभाज्य घटक बनले  आहेत. फिट इंडिया चळवळीने आपला  प्रभाव आणि प्रासंगिकता या कोरोना काळात निर्बंध असूनही  सिद्ध करून दाखवली असे ते म्हणाले.

तंदुरुस्त  राहणे  जेवढे काहींना  वाटते तितके कठीण काम नाहीअसे पंतप्रधान म्हणाले. थोडेसे नियम आणि थोडेसे परिश्रम यामुळे तुम्ही कायम तंदुरुस्त राहू शकता.  'फिटनेसचा डोस , अर्धा तास रोज' या मंत्रात सर्वांचे आरोग्य, सर्वांचे सुख लपलेले आहे. त्यांनी प्रत्येकाला  योगासने करण्याचे  किंवा बॅडमिंटन, टेनिस , फुटबॉल कराटेकबड्डी रोज  किमान 30 मिनिटे खेळण्याचे आवाहन केले. युवक मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने एकत्रितपणे  फिटनेस प्रोटोकॉल देखील जारी केल्याचे त्यांनी सांगितले.  

आज जगभरात  तंदुरुस्तीबाबत  जागरूकता आहे. जागतिक आरोग्य संघटना -WHO ने आहार, व्यायाम आणि आरोग्याबाबत जागतिक धोरण तयार केले आहे असे पंतप्रधान म्हणाले. शारीरिक व्यायामावर जागतिक शिफारशी देखील त्यांनी जारी केल्या आहेत. आज ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, अशा अनेक देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंदुरुस्ती अभियान सुरु आहे.आणि जास्तीत जास्त नागरिक दररोज शारीरिक व्यायामात सहभागी होत आहेत.

 

B.Gokhale/S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1658806) Visitor Counter : 270