गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी 15 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त


5.5 लाखांपेक्षा जास्त जणांना कर्ज मंजूर

जवळपास दोन लाखजणांना कर्जाचे वितरण

कर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगाने व्हावी, संस्थांना कर्ज देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी मदत ठरणारे सॉफ्टवेअर विकसित

Posted On: 24 SEP 2020 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

 

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-एसव्हीनिधी) योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त जणांकडून कर्जासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 5.5 लाखांपेक्षा जास्त जणांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. जवळपास दोन लाख जणांना कर्जांचे वितरण करण्यात आले आहे. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 टाळेबंदीनंतर 50 लाख पथ विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत यासाठी तारण मुक्त खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करीत आहे.

कर्जप्रकरणांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी पथ विक्रेत्यांनी त्यांना सोईच्या असलेल्या  बँक शाखांमध्ये अर्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे. या कर्जाच्या अर्जामध्ये प्राधान्य असलेल्या बँकेची, त्या शाखेची किंवा अर्जदाराचे बचत खाते, ज्या  बँकेत आहे, त्याची माहिती जाणून घेण्यात येत आहे. त्यानुसार कर्ज प्रकरणांवर काम करण्यात येत असल्यामुळे ती मंजूर करण्यास आणि निधीचे वितरण करण्याचे काम अतिशय कमी वेळेत होत आहे.

कर्ज प्रकरणांच्या मंजुरी आणि निधी वितरणाचे काम अधिक सुलभ व्हावे, यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. दि. 11 सप्टेंबर,2020 पासून त्यामार्फत काम केले जात आहे. आत्तापर्यंत अंदाजे 3 लाख अर्जांचे काम बँकांनी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले आहे. त्याच्या मदतीने अर्जदाराने दिलेल्या प्राधान्यानुसार त्याचे कर्जप्रकरण त्या विशिष्ट बँक शाखांकडे दर आठवड्याला पाठवण्यात येत आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी वेगाने करून, पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना तातडीने वित्तीय मदत संबंधित संस्थाकडून मिळण्यासाठी उपाय योजण्यात येत आहेत.

 

B.Gokhale /S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1658657) Visitor Counter : 311