उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभेच्या अध्यक्षांनी सध्या सुरू असलेल्या महामारी दरम्यान जनता आणि खासदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली


मास्क घालणे, सुरक्षित अंतर, योग्य स्वच्छता राखणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे सदस्यांना केले आवाहन

मास्कचा वापर कोविड-19 पासून संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे - राज्यसभा अध्यक्ष

ही महामारी जाईपर्यंत सुरक्षित अंतर आवश्यक : अध्यक्ष नायडू

संसदेत सुरक्षित अंतर राखण्याचे अध्यक्षांचे खासदारांना आवाहन

Posted On: 19 SEP 2020 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

राज्यसभेचे अध्यक्ष  एम. वेंकैया नायडू यांनी सध्या सुरू असलेल्या महामारीच्या काळात एकूणच  जनता आणि विशेषतः खासदारांच्या  सुरक्षेबाबत पुन्हा एकदा  चिंता व्यक्त केली.

अध्यक्ष नायडू यांनी सदस्यांना माहिती दिली की त्यांनी गृह सचिव,  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक तसेच राज्यसभा सचिवालयातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत  आणि सदस्यांनी घ्यावयाची सुरक्षा आणि खबरदारी याची माहिती घेतली. 

अध्यक्ष  नायडू यांनी महामारीला आळा घालण्यासाठी चार प्रमुख उपाययोजना अधोरेखित केल्या. ते म्हणाले की, बैठकीत दिलेल्या सल्ल्यानुसार सध्या महामारीच्या काळात मास्क घालणे हा विषाणूपासून बचाव करण्याचा उत्तम उपाय आहे. ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घराबाहेर एखाद्या व्यक्तीला भेटता किंवा तुमच्या घरी काम करणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना भेटता तेव्हा मास्क  घालणे महत्त्वाचे आहे. हे अतिशय महत्वाचे आहे.”

अध्यक्ष  म्हणाले की, दुसरी सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे सुरक्षित अंतर राखणे. ते म्हणाले, "दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित दअंतर राखणे.  ही महामारी निघून जाईपर्यंत हे आवश्यक आहे."  

ते म्हणाले, सुरक्षित  राहण्यासाठी तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता राखणे. ते म्हणाले, "तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे  - आपले हात धुणे, ते डेटॉल  किंवा इतर साबणाने वेळोवेळी साफ करणे आणि स्वत: ला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून मुक्त ठेवणे. "

अध्यक्षांनी नमूद केलेला चौथा सुरक्षा उपाय म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढविणे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग सुचवताना ते म्हणाले, " सकस आहाराच्या  सवयी, निरोगी जीवनशैली आणि काही प्रमाणात व्यायामाद्वारे , मग ते चालणे किंवा योगासने असेल,  हे शक्य आहे "

अध्यक्ष  नायडू म्हणाले की सकस  अन्न खाणे फार महत्वाचे आहे. सकस आहाराचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, "आपल्या घरातील आजीच्या औषधांचे स्मरण  करा आणि जे काही करायचे  ते सामान्य मार्गाने, स्वयंपाकात, खाण्यात आणि जगण्यात देखील करा. ते लक्षात ठेवले पाहिजे."

अध्यक्षांनी खासदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना त्यांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी आणि सहा फूट अंतराच्या मर्यादेचे पालन करण्याची विनंती केली. नायडू यांनी सभासदांना अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्षांशी  बोलण्यासाठी अध्यक्षांच्या टेबलजवळ  येऊ नये आणि  त्याऐवजी स्लिप पाठवायला सांगितले.

संसदेत करण्यात आलेल्या उपाययोजना व सुविधांचा पुनरुच्चार करताना अध्यक्ष म्हणाले, "कोविड -19  चाचणी सुविधा, दोन्ही रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर हे अधिवेशन सुरु असेपर्यंत   संसद भवनातील स्वागत कक्षात दररोज सकाळी 8.00 ते दुपारी  2.30 पर्यंत आणि  संसदेच्या तळमजल्यावरील सभागृहात सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.00  या वेळेत  उपलब्ध आहेत.  सदस्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि  त्यांच्या सोयीनुसार व आवश्यकतेनुसार चाचण्या कराव्यात असा सल्ला देण्यात आला. तसेच सदस्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशनची तपासणी करण्यासाठी ऑक्सिमीटर्सची पुरेशी संख्या संसद भवनाच्या फर्स्ट एड पोस्ट  येथे उपलब्ध आहेत. "

आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेसाठी ठरवलेल्या निकषांचे पालन करण्यासाठी त्यांनी सर्व सदस्यांना सहकार्य करायला सांगितले. 

वेळेची कमतरता लक्षात घेता त्यांनी वेळेचा अधिकाधिक उपयोग करून कामकाज सुरळीत पार पाडण्याची सूचना केली.

 

* * * 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656658) Visitor Counter : 255