श्रम आणि रोजगार मंत्रालय
कोविड-19 मुळे निर्माण होणाऱ्या सामान्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे- जी-20 राष्ट्रांच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांच्या बैठकीत संतोष गंगवार यांचे प्रतिपादन
Posted On:
11 SEP 2020 3:52PM by PIB Mumbai
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार काल संध्याकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, जी-20 सदस्य देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. जगात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या सामाईक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण सर्व राष्ट्रांनी एकत्रित काम करायला हवे, असे प्रतिपादन गंगवार यांनी या बैठकीत बोलतांना केले.
कोविड-19 आजारामुळे आता आपल्या जीवनशलीत बदल झाला असून, नवी जीवनपद्धती अंगीकारायला आपण शिकत आहोत.
विविध प्रदेशांमध्ये कोविड-19 चा वेगवेगळा प्रभाव जाणवत असल्याचे सांगत, गंगवार म्हणाले की या काळात कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी, भारताने कोविड काळातही, मालक किंवा कंपन्यांनी कामगारांना मजुरी द्यावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. स्थलांतरीत मजुरांना तात्पुरता निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. स्थलांतरीत मजुरांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी, केंद्र सरकारने ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजना राबवली, अशी माहितीही गंगवार यांनी दिली. कोविड-19 आणि त्याचा जगावर झालेला परिणाम यावरही या बैठकीत चर्चा झाली. कामगार क्षेत्रासमोर कोविडमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्नही यावेळी झाला.
20 युवा आराखडा 2025 विकसित करण्यासाठी,सौदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे गंगवार यांनी कौतुक केले. युवकांशी सबंधित मुद्द्यांवर पहिल्यांदाच जी-20 च्या मंचावर चर्चा होत असून त्यातून कामगार क्षेत्रातील युवावर्गाच्या प्रगतीचा आढावा घेता येईल, असे गंगवार म्हणाले. नवोन्मेश, स्वयंउद्योजकता आणि आणि उद्योगक्षेत्राला पाठबळ व प्रोत्साहन देण्यावर भारताचा दृढ विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. युवाशक्तीच्या विकासाची गुरुकिल्ली कौशल्य विकास ही आहे, असेही गंगवार यांनी स्पष्ट केले.
भारतात, संघटीत किंवा औपचारिक क्षेत्रात सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, एक प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक दृष्टीने योग्य अशी जनतेचे योगदान असलेली यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.असंघटीत किंवा अनौपचारिक क्षेत्रांना या समाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, यासाठी, भारतात एक विशिष्ट स्वेच्छा निवृत्तीवेतन योजना राबवली जात आहे, ज्याद्वारे सरकार या असंघटीत मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीत समान योगदान देते, अशी माहिती गंगवार यांनी दिली. स्त्री-पुरुष समानतेचा औचित्यपूर्ण मुद्दाही या परिषदेत समाविष्ट केल्याबद्दल गंगवार यांनी समाधान व्यक्त केले. भारतात महिला कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने त्यांना रात्रपाळीतही काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि त्यांच्या संमतीने, अगदी खाणींसारख्या क्षेत्रातही महिला आता रात्रीही काम करु शकतात, असे गंगवार यांनी सांगितले. स्वयंउद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकार महिलांना विना-तारण कर्जपुरवठा करते, अशी माहिती गंगावर यांनी यावेळी दिली.
******
B.Gokhale/ R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653308)
Visitor Counter : 186