पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धमेंद्र प्रधान यांनी 56 सीएनजी स्टेशन राष्ट्राला केले समर्पित
उद्योजकांनी धोरणात्मक सुधारणांचा लाभ घेवून इंधन आणि विपणन क्षेत्रात नाविन्य आणण्याचे श्री धमेंद्र प्रधान यांचे आवाहन
Posted On:
10 SEP 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज देशातले 56 सीएनजी स्टेशन राष्ट्राला समर्पित केले. ही स्टेशन्स 13 राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात आली आहेत. गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंउ, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आणि चंदिगड या केंद्रशासित प्रदेशात ही सीएनजी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
यावेळी मंत्री प्रधान यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांमध्ये सीएनजी स्टेशनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आधी 947 सीएनजी स्टेशन होते आता ही संख्या वाढून 2300 झाली आहे. तसेच देशातल्या 400 पेक्षा जास्त जिल्ह्यांना शहर गॅस वितरण नेटवर्कच्या कक्षेत आणण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ आता 11व्या सीजीडी बोलीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयारी करीत असून त्यानंतर 50तेे100 अतिरिक्त जिल्ह्यांना स्वच्छ इंधन मिळू शकणर आहे.
गॅसआधारित अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने भारत वाटचाल करीत आहे. यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या उद्देशपूर्तीसाठी 17,000 किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्यात येत असल्याचे धमेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. देशातल्या ईशान्य भागातील राज्ये आणि पूर्वेकडील राज्ये आत्तापर्यंत गॅसच्या सुविधेपासून वंचित होते, त्यांनाही यापुढे आता या सुविधेचा लाभ मिळू शकणार आहे.
इतर साधनांमधून ऊर्जा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेविषयी बोलताना मंत्री धमेंद्र प्रधान म्हणाले, भारताने अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा स्वीकार करून या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू केेले आहे. प्रदूषणाच्या स्तरामध्ये घट आणून स्वच्छ इंधन पुरवठा करण्यासाठी हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणात्मक सुधारणांचा लाभ घेवून इंधन आणि विपणन क्षेत्रात नाविन्य आणण्याचे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री प्रधान यांनी यावेळी उद्योजकांना केले. स्टार्ट-अपसुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणू शकतात, असे सांगून गॅस स्टेशन तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
भारत हा सर्वात जास्त ऊर्जा वापरणारा देश आहे. देश सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे, त्यामुळे यापुढील काळातही ऊर्जेला असणारी मागणी सातत्याने वाढणार आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा आणि इंधन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत बनविण्याचे ध्येय आपल्याला साध्य करायचे आहे त्याच बरोबर शाश्वत, सुलभ आणि सर्वांना परवडणारे इंधन, ऊर्जा असली पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही प्रधान यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरूण कपूर यांचेही भाषण झाले. यावेळी आयओसीएलचे अध्यक्ष एस.एम वैद्य तसेच पेट्रोलियम मंत्रालय, तेल विपणन कंपन्यांचे आणि सीएनजी स्टेशन सुरू करणा-या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653189)
Visitor Counter : 129