पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर पंतप्रधानांनी साधला ‘स्वनिधी संवाद’


स्वनिधी योजनेमुळे महामारीचा प्रभाव कमी करून फेरीवाल्यांना पुन्हा आपले व्यवसाय करण्यासाठी मदत मिळेल- पंतप्रधान

एका वर्षामध्ये कर्ज परतफेड केल्यास 7 टक्क्यांपर्यंत व्याजसवलत आणि पुढेही लाभ देणार- पंतप्रधान

पथ विक्रेत्यांना व्यवसायासाठी आणि डिजिटल व्यवहारासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार-पंतप्रधान

Posted On: 09 SEP 2020 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर ‘स्वनिधी संवाद’ साधला. कोविड-19 महामारीमुळे पथ विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे, त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी सरकारने दि. 1 जून, 2020 रोजी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी 1.4 लाख पथ विक्रेत्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांना व्यवसायासाठी 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पथ विक्रेत्यांकडे अशा संकट काळानंतर पुन्हा व्यवसायाला प्रारंभ करण्यासाठी असलेल्या धडाडीचे, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्याकडे असलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रमाची प्रशंसा केली.

मध्य प्रदेश सरकारने राज्यभरातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांना चिन्हीत करण्याचे कार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्याचे कौतुक केले. यापैकी एक लाखांपेक्षा जास्त विक्रेत्यांच्या कर्जाची प्रक्रिया दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात आली आहे. महामारीचे प्रमाण वाढते असले तरीही इतक्या वेगाने हे काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्य सरकारचे कौतुक केले.

कोणत्याही आपत्तीचा गरीबांच्या रोजगारावर, त्यांच्या अन्न आणि बचतीवर सर्वात जास्त प्रभाव पडतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

अशा आपत्तीच्या काळामध्ये परप्रांतामध्ये असलेले बहुतांश श्रमिक, गरीब आपआपल्या गावी परतले, त्यांचेही या काळामध्ये खूप हाल झाले.

लॉकडाउन आणि कोविड-19 महामारीच्या काळामध्ये गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याचे काम सरकार अगदी पहिल्या दिवसापासून करीत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या माध्यमातून सरकारने मदत केलीच त्याशिवाय आर्थिक दुर्बल घटकातल्या जनतेसाठी मोफत अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देण्यात आले.

समाजातला आणखी एक असुरक्षित घटक म्हणजे पथ विक्रेते आहेत, हे जाणून त्यांच्या आर्थिक सुरक्षेचाही विचार सरकारने केला आहे. त्यांच्यासाठी ही स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता पुन्हा आपली रोजीरोटी कमावणे शक्य होणार आहे. पथ विक्रेत्यांना इतक्या स्वस्त, कमी व्याजदरामध्ये भांडवल प्रथमच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाखो विक्रेते थेट विक्री प्रणालीशी जोडले गेले आहेत. त्याचा लाभ त्यांना मिळू शकणार आहे.

स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वरोजगार, स्वावलंबन आणि स्वाभिमान  प्रदान करणे हा आहे.

प्रत्येक पथ विक्रेत्याला या योजनेची सर्व माहिती देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. स्वनिधी योजना अतिशय सोपी करण्यात आलेली आहे, त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. सामान्य पथ विक्रेत्याने ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ मार्फत अथवा नगरपालिका कार्यालयामध्ये आपला अर्ज अपलोड करायचा आहे. त्यासाठी रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही. इतकेच नाही तर, बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी आणि नगरपालिका कर्मचारी स्वतःहूनच या पथ विक्रेत्यांकडे येऊन त्यांचे अर्ज जमा करून घेऊ शकतील.

या योजनेतून कर्ज घेणाऱ्या पथ विक्रेत्याने कर्जाची परतफेड वर्षभरामध्ये केली त्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याजसवलत मिळू शकणार आहे. तसेच डिजिटल व्यवहार केले तर ‘कॅश बॅक’ची सवलत मिळू शकणार आहे. त्यामुळे या विक्रेत्याच्या खात्यामध्ये एकूण व्याजापेक्षा जास्त बचत जमा होईल. देशामध्ये गेल्या 3-4 वर्षांपासून डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, त्याचाही लाभ पथ विक्रेत्याला मिळू शकणार आहे.

जे लोक नव्याने व्यवसाय करणार आहेत, त्यांना सुकरतेने भांडवल मिळावे, यासाठी योजनेमुळे मदत होणार आहे. तसेच देशातले लाखो पथ विक्रेते पहिल्यांदाच ख-या अर्थाने नेटवर्क प्रणालीशी जोडले जाणार आहेत. त्यांना एक स्वतंत्र ओळख मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

या योजनेमुळे एखाद्याला पूर्णपणे व्याजमुक्त करण्यासाठी मदत करणार आहे. या योजनेअंतर्गत 7 टक्क्यांपर्यंत व्याजसवलत देण्यात येत आहे. बँका आणि डिजिटल व्यवहार यामध्ये कोणीही मागे राहू नये असे सरकारला वाटते, त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने पथ विक्रेत्यांनाही डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये ग्राहक रोखीचा व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहार जास्त करीत आहेत. हे लक्षात घेऊन पथ विक्रेत्यांनीही आता त्यांचे व्यवहार डिजिटल करण्याची गरज आहे.

पंतप्रधान म्हणाले की, सरकार आता एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्व पथ विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे, त्याच्या माध्यमातून सर्व व्यवहार डिजिटली करता येतील.

पंतप्रधान म्हणाले की, पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थींना उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत योजना अशा सुविधाही प्राधान्याने देण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री जन धन योजनेतून देशामध्ये 40 कोटींपेक्षा जास्त  गरीबांची बँकांमधून खाती उघडण्यात आली आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, गरीब, निम्न मध्यम वर्गातल्या लोकांना आता त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट अनुदान जमा होते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळणेही सोपे झाले आहे. डिजिटल आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि आयुष्मान भारत यासारख्या विविध योजनांचा लाभ समाजातल्या गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना किती झाला आहे, याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

गेल्या सहा वर्षात देशातल्या गरीबांचे जीवन अधिकाधिक सुलभ व्हावे, यासाठी सरकार अनेक योजना  राबवित असल्याचे सांगून मोदी म्हणाले, सरकारने शहरे आणि प्रमुख गावांमध्ये सहज परवडणाऱ्या भाड्यामध्ये घरकुल देण्याची मोठी योजना सुरू केली आहे.

देशात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजना सुरू झाली आहे, त्यामुळे आता कोणालाही देशात कुठूनही स्वस्त धान्य दुकानातून आपल्या नावाचे असलेले धान्य मिळू शकणार आहे.

पंतप्रधानांनी आगामी 1000 दिवसांमध्ये देशातील सहा लाख खेड्यांमध्ये ऑप्टीकल फायबर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. या कामाला प्रारंभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. याचा लाभ मिळून  संपूर्ण ग्रामीण भारत आता देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनाला चालना मिळणार आहे.

सर्व पथ विक्रेत्यांनी स्वच्छतेचे पालन करावे आणि कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाय योजण्यात यावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आणि त्याचा लाभ सर्वांना व्यवसाय वाढीसाठी होईल, असे सांगितले.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652654) Visitor Counter : 233