नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषेदेचे उद्या उद्घाटन
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यांच्यामध्ये भागीदारीचे चार करार होणार
सौर तंत्रज्ञानाविषयी आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू करणार
Posted On:
07 SEP 2020 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2020
आयएसए म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या आभासी परिषदेचे उद्या दि. 8 सप्टेंबर, 2020 भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता उद्घाटन होणार आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 149 देशांच्या 26,000 पेक्षा जास्त लोकांनी नाव-नोंदणी केली आहे. यामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातले अत्याधुनिक, पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात येणार असून त्याविषयी विचार विनिमय करण्यात येणार आहे. सर्वांना परवडणारी आणि निरंतर मिळणारी ऊर्जा, तसेच शाश्वत, स्वच्छ हरित ऊर्जेचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
आयएसए समितीचे अध्यक्ष आणि भारताच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग आणि आयएसएच्या सह-अध्यक्षा आणि फ्रान्सच्या पर्यावरण संक्रमण मंत्री बार्बरा पॉम्पिली तसेच आफ्रिका, एशिया पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका तसेच कॅरेबियन क्षेत्रातले नेते परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन उद्घाटनप्रसंगी परिषदेत होणा-या चर्चेसंबंधी माहिती देणार आहेत.
आयएसएच्या अनेक सदस्य देशांचे मंत्री तसेच उच्चस्तरीय मान्यवर, वरिष्ठ सरकारी अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या आघाडीनुसार आयएसएचे भागीदार, व्यावसायिक, उद्योजक आणि सौर प्रकल्प विकासक, सौर ऊर्जा उत्पादक, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था तसेच शैक्षणिक क्षेत्रातले विचारवंत, संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमे, बहुपक्षीय आणि व्दिपक्षीय एजन्सी सहभागी होणार आहेत.
लिथियम आयऑन बॅटरीच्या क्रांतीकारी शोधासाठी 2019 मध्ये रसायनशास्त्रामधला नोबेल पुरस्कार मिळविणारे डॉ. एम स्टॅनले व्हिंटिंगहॅम तसेच स्वित्झर्लंडच्या सौर प्रेरणा फौंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड पिकार्ड परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही भाषण होणार आहे.
आयएसए समितीचे अध्यक्ष आर.के. सिंग, आणि आयएसएच्या सह-अध्यक्षा आणि फ्रान्सच्या बार्बरा पॉम्पिली यांची अनुक्रमे अध्यक्षीय आणि सह-अध्यक्षीय भाषणे होतील. यावेळी उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच परिषदेमध्ये तंत्रज्ञानविषयक चार सत्रे होणार आहेत. यामध्ये युरोपियन कमिशनच्या कादरी सिम्पसन यांचे बीज भाषण होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमामध्ये कृती कार्यक्रम निश्चितीबरोबरच तीन आंतरराष्ट्रीय कराराविषयी घोषणा करण्यात येणार आहे. आयएसए आणि आंतरराष्ट्रीय रेफ्रिजरेशन संस्था, वैश्विक हरित वृद्धी संस्था आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाबरोबर हे करार करण्यात येणार आहेत. या त्रिपक्षीय करारावर भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यांच्या स्वाक्षरी होणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये साउथ फ्लोरिडा विद्यापिठाचे प्राध्यापक आणि स्वच्छ ऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. धरेंद्र योगी गोस्वामी यांच्या वतीने ‘आयएसए तंत्रज्ञान, सोलर कम्पास 360’ या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
परिषदेच्या उद्घाटनानंतर जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अक्षय, शाश्वत सौर ऊर्जेची साठवण करण्यामध्ये कशा प्रकारे योगदान देता येईल, यावर भर देण्यात येणार आहे. या चारही तंत्रज्ञान विषयक चर्चासत्रांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातले नामवंत, वैज्ञानिक, संशोधक तसेच उद्योजक सहभागी होणार आहेत. यामध्ये सौर पीव्ही तंत्रज्ञानाची भविष्यातल्या संभाव्यतेविषयी चर्चा करण्यात येणार आहे. कमीत कमी खर्चामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत कशी होवू शकेल, यावर सखोल चर्चा होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला सर्व स्तरातील नेते, नामवंत मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकजण यामध्ये प्रत्यक्ष सहभागीही होत आहेत. यामध्ये आयएसएचे उपाध्यक्ष आणि एशिया पॅसिफिक क्षेत्राचे प्रतिनिधी, टोंगाचे मंत्री पाओसी मट्टेल तेई, सुदानचे मंत्री खैरी अबडेलरामन अहमद यांची भाषणे होणार आहेत. भारताचे रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भाषणे होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव राहुल छाब्रा, ऊर्जा सचिव एस.एन सहाय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा सचिव इंदू शेखर चतुर्वेदी आदिंची भाषणे होणार आहेत.
या शिखर परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी आयएसएच्यावतीने नवसंकल्पना संयोजक म्हणून फिक्कीने घेतली आहे.
या परिषदेच्या कामकाजाची माहिती इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी या चार भाषांमध्ये थेट अनुवाद करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम आयएसएच्या यू ट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच फिक्कीच्या यू ट्यूब वाहिनीवरही उपलब्ध होणार आहे.
परिषदेच्या कार्यक्रमाचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651953)
Visitor Counter : 299