वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

17व्या आसियान - भारत अर्थविषयक मंत्र्यांचे सल्ला-मसलत

Posted On: 30 AUG 2020 4:24PM by PIB Mumbai

 

17 व्या आसियान-भारत अर्थविषयक मंत्र्यांची आभासी सल्ला-मसलत बैठक दि. 29ऑगस्ट,2020 रोजी झाली. आसियान  10 देशांचे अर्थ, वाणिज्य विषयक मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. भारताचे केंद्रीय वाणिज्य , उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि व्हिएतनामचे उद्योग आणि व्यापार मंत्री त्रान तुआन अन्ह यांनी या सल्ला-मसलत बैठकीचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले. या बैठकीत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 आसियान  देशांचे व्यापार, आर्थिक, वाणिज्य विषयक मंत्री सहभागी झाले होते. संपूर्ण जगभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यामुळे सर्वच देशांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. अशा संकटकाळामध्ये आसियान देशांनी आर्थिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे अनुपालन करून या देशांनी जीवनावश्यक वस्तू आणि औषधांना निरंतर पुरवठा करण्याचे निश्चित केले. तसेच आसियान क्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीत आसियान-भारत आसियान इंडिया ट्रेड गुडस अॅग्रीमेंट (एआयटीआयजीए)चा  आढावा घेण्यात आला. आसियान देशांमध्ये व्यापार वृद्धी होत असल्याचे सर्व मंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी आसियान इंडिया बिझिनेस कौन्सिलचा अहवाल (एआयबीसी) मंत्र्यांसमोर मांडण्यात आला. या अहवालामध्ये व्यापार वाढीसाठी आणि आर्थिक दृष्ट्या परस्परांना लाभदायक ठरतील अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत. भारत आणि आसियान देशांमध्ये व्यापाराची व्याप्ती निश्चित करून, मुक्त व्यापार कराराच्या दृष्टीने अनुकूलता आणणे, व्यापार सुलभता निर्माण करणे याविषयी सूचना करण्यात आल्या. सुव्यवस्थित व्यापार पद्धतीच्या नियामक प्रक्रियेचे पुनरावलोकन करून  करारांमध्ये अद्यतन करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये चर्चेचा प्रारंभ भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला. मुक्त व्यापार करार सर्वांच्या दृष्टीने परस्पर लाभदायक ठरण्याच्या आवश्यकतेवर गोयल यांनी भर दिला. असे झाले तर सर्वच देशांना विन -विनस्थिती गाठणे शक्य होणार आहे, असे गोयल यांनी यावेळी नमूद केले. यासाठी नियमांना बळकटी आणणे, करविषयक अडथळे दूर करणे आणि बाजारपेठेमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. आगामी नोव्हेंबर 2020 मध्ये आसियान-भारत नेत्यांची शिखर परिषद होणार आहे. त्यापूर्वीच एआयटीआयजीच्या अहवालाचा विचार करून त्यामधील शिफारसींची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आसियान देशांबरोबर भारताचे घनिष्ट संबंध आहेत. कारण या देशांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक समृद्धीचा आणि भारताचा दृढ संबंध आहे, आणि यापुढेही हे संबंध वृद्धिंगत होतील, असे गोयल यांनी सांगितले.

एआयबीसीला अधिक बळकट करण्यासाठी भारताच्यावतीने काही सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे दोन्ही पक्षांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असल्यामुळे या सूचनांचा विचार करण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649786) Visitor Counter : 331