गृह मंत्रालय

पोलिस संशोधन आणि विकास संस्थेचा (बीपीआरअँडडी) 28 ऑगस्ट,2020 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन

Posted On: 27 AUG 2020 8:20PM by PIB Mumbai

 

पोलिस संशोधन आणि विकास संस्थेचा (बीपीआरअँडडी) 28 ऑगस्ट,2020 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन  साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे  म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच  गृह सचिव अजय कुमार भल्ला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशभरामध्ये झालेल्या कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून वर्धापनदिन कार्यक्रम आभासी होणार आहे. बीपीआरअँडडीच्या मुख्य कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ लिंक प्रसारणाच्या माध्यमातून  कार्यालयाचे विविध विभाग, राज्यांचे पोलिस आणि सीएपीएफ सहभागी होवू शकणार आहेत.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एका ठरावाव्दारे दि. 28 ऑगस्ट  1970 रोजी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून पोलिसांना तपास आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये पारंगत करण्यासाठी शास्त्रशुद्ध संशोधन करून त्याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येते. प्रारंभी या संस्थेचे दोन विभाग म्हणजे संशोधन, प्रकाशन आणि सांख्यिकी विभाग आणि विकास विभाग कार्यरत होते. त्यानंतर 1973 मध्ये  पोलिस प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गोरे समितीच्या शिफारसीअनुसार प्रशिक्षण विभागही सुरू करण्यात आला. 1995 मध्ये सुधारणा विभाग सुरू करण्यात आला. यामध्ये कारागृह आणि कारागृह सुधारणा या मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी सुधारणात्मक विभाग प्रारंभ करण्यात आला. सन 2008 मध्ये राष्ट्रीय पोलिस मिशनची भर या संस्थेमध्ये पडली आणि विकास विभागाचे अत्याधुनिकीकरण करून त्याची फेररचना करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षाच्या कार्यानंतर बीपीआरअँडडीमध्येही काळानुरूप अनेक प्रकारे परिवर्तन करण्यात आले आहेत. वर्तमान काळाचा विचार करता अतिरिक्त जबाबदा-याही या संस्थेला पार पाडाव्या  लागत आहेत. यासाठी भोपाळ येथे पोलिस प्रशिक्षण आणि मध्यवर्ती अकादमी या नवीन विभागाची उभारणी करण्यात आली आहे. बीपीआरअँडडीमध्ये सहा बाह्य विभाग कार्यरत आहेत.

या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गृहमंत्री अमित शहा यांनी  संस्थेविषयी म्हटले आहे की,

‘‘ बीपीआरअँडडी संस्थेशिवाय चांगले पोलिसिंग होवू शकते, अशी कल्पनाही करता येणार नाही.’’

गेल्या पाच दशकामध्ये बीपीआरअँडडीचा प्रवास नेत्रदीपक आहे. या संस्थेने भारतीय पोलिसांना योग्य आकार देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नवीन काळाची आव्हाने पेलण्यासाठी आणि पोलिस दलामध्ये होत असलेले बदल लक्षणीय आहेत. आधुनिक उपक्रमाच्या माध्यमातून आता पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येवून त्यांच्या क्षमता वृद्धीचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या संस्थेने आत्तापर्यंत 55,000 पोलिस अधिकारी आणि उमेदवारांना प्रशिक्षित केले आहे.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649041) Visitor Counter : 240