पर्यटन मंत्रालय

‘देखो अपना देश’ वेबमालिकेमध्ये पर्यटन मंत्रालयाच्यावतीने हैदराबादच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन

Posted On: 24 AUG 2020 8:43PM by PIB Mumbai

 

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देखो अपना देश’ वेबमालिकेमध्ये दि. 22 ऑगस्ट,2020 रोजी हैदराबादच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखविण्यात आली. दि.14 एप्रिल,2020 पासून सुरू झालेल्या या वेबमालिकेचे  50 वे सत्र पार पडले.  देशातल्या अनेक स्थानांविषयी लोकांना फारशी माहिती नसते, त्यामुळे त्यांना अशा स्थानांना भेट देणे आणि पर्यटनाचा आनंद घेणे साध्य होत नाही. पर्यटकांमध्ये अशा दुर्लक्षित स्थानांच्या विविध पैलूंची माहिती करून देण्यासाठी आणि देशातल्या पर्यटन स्थानांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देशया वेबमालिकेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेला बळकटी मिळत आहे.

हैदराबादच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणा-या मालिकेमध्ये निजामाच्या काळापासून आलेला वारसा, इस्लामिक संस्कृतीचा एकूणच हैदराबाद शहरावर असलेला प्रभाव, उर्वरित तेलंगणापेक्षा हे शहर भिन्न आहे, याची माहिती देण्यात आली. तसेच हैदराबादची स्थापत्यकला, भोजन आणि जीवनशैली तसेच भाषा यांच्यावर असलेला प्रभाव, यांची माहिती देण्यात आली. हैदराबादच्या नवीन भागावर आता जागतिक संस्कृतीच्या खुणा जाणवतात, हेही या वेबमालिकेत सादरकर्त्याने  स्पष्ट केले. हैदराबादला साहित्य आणि ललित कला यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. शहरामध्ये विविध प्रकारची संग्रहालये, कलादालने आणि प्रदर्शन सभागृहे आहेत.

हैदराबाद शहराला मोत्यांचे शहरआणि निजामांचे शहरअसे का म्हटले जाते, याची माहिती वोटेरी यांनी यामध्ये दिली. कुतुबशाहीची स्थापना या शहरामध्ये झाली, त्याचा एक ज्वलंत इतिहास या शहराचा आहे. काही वर्षांनंतर या शहरावर मुघलांचे साम्राज्य होते. तसेच असफजाही घराण्याच्या ताब्यातही हे शहर होते. हैद्राबादच्या संस्कृतीमध्ये अशा सर्व शाही घराण्यांच्या भूतकाळाचे प्रतिबिंब दिसून येत  असल्याचे वेबमालिकेत सांगण्यात आले. गोवळकोंडा किल्ला आजही शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. तसेच शहराच्या गजबजलेल्या भागातील  चारमिनारसारख्या वास्तू गतकाळच्या वैभवशाली स्थापत्यशैलीचा नमूना आहेत.

हैद्राबादचे जुळे शहर म्हणून सिंकदराबादचा उल्लेख केला जातो. याविषयी माहिती देताना वोट्टेरी यांनी 1798 मध्ये निझाम आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या युतीविषयी माहिती दिली. चारमिनारच्या उत्तरेकडे शहराला छावणी -बनविण्यात आली  आणि तिसरा निजाम नवाब सिकंदर याच्या नावावरून सिकंदराबाद शहराचे नाव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

 

या वेबसत्राची माहिती -https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/ येथे उपलब्ध आहे. पर्यटन मंत्रालयाशी संबंधित सर्व संकेत स्थळावर आणि सरकारच्या वेबपेजवर सर्व वेबमालिकांचा  तपशील उपलब्ध आहे. तसेच यापुढील सत्र 29 ऑगस्ट,2020 रोजी 11.00 वाजता प्रसारित होणार आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648326) Visitor Counter : 207