पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश मालिकेअंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित चौथे वेबिनार- "जालियनवाला बाग : स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्वपूर्ण वळण"चे केले आयोजन

Posted On: 17 AUG 2020 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाने  देखो अपना देश मालिकेअंतर्गत  "जालियनवाला बाग : स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्वपूर्ण वळण "हे एकूण 48 वे आणि स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित चौथे वेबिनार सादर केले.

'देखो अपना देश' या मालिकेतील 48 वे वेबिनार ‘पार्टिशन म्यूजियम’ / कला आणि सांस्कृतिक वारसा न्यासाच्या अध्यक्ष आणि 'जालियनवाला बाग 1919-द रिअल स्टोरी' पुस्तकाच्या लेखिका किश्वर  देसाई यांनी सादर केले. शेकडो निष्पाप जीवांना ठार मारण्याच्या त्या अमानुष  कृत्याचे आणि नंतर या जनसंहाराने ब्रिटीश राजवटीविरूद्ध लढण्यासाठी संपूर्ण देशाला कशा प्रकारे एकत्र आणले याचे वर्णन देसाई यांनी यावेळी केले. देखो अपना देश वेबिनार मालिका एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारताच्या समृद्ध विविधतेचे दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे.

देसाई यांनी जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी अमृतसर आणि उर्वरित भारतातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विशद केली.

त्या म्हणाल्या कि जालियनवाला बाग ही एक  नापीक जमीन होती जिथे लोक बरेचदा एकत्र भेटायचे तसेच शांततेने निदर्शने करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. यामुळे ब्रिटिश नाराज झाले कारण त्यांनी कधीही प्रतिकार झालेला  पाहिला नव्हता . डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल हे अमृतसर शहरातील प्रख्यात  राष्ट्रीय नेते होते. त्यांनी रोलेट  कायद्याविरोधात सत्याग्रह आयोजित केला. जालियनवाला बागेत झालेल्या शांततापूर्ण मेळाव्यात सर्व पंथातील लोकांनी भाग घेतला. यामुळे ब्रिटीशांमध्ये अनेक गैरसमज पसरले. ब्रिटिश सरकारने डॉ किचलु आणि डॉ सत्यपाल यांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांच्या अटकेच्या बातमीने अमृतसरमधील लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.

पंजाबमधील मार्शल लॉ राजवट अतिशय  कठोर होती. टपाल सेन्सॉर केले होते. मंदिरे आणि मशिदी सारखी प्रार्थनास्थळे  बंद केली होती. ज्यांचे राजकीय संबंध असल्याचा संशय होता अशा लोकांच्या घराचा  पाणी आणि वीज पुरवठा  खंडित केला गेला. याहूनही सर्वात भीषण होते निवडक बंडखोरांवर सार्वजनिक ठिकणी चाबकाने केलेली मारहाण आणि ज्या ठिकाणी  महिला मिशनरीवर हल्ला केला गेला त्या रस्त्यावर सर्व भारतीयांना रांगत जाणे अनिवार्य करण्याचे आदेश.

रविवार, 13 एप्रिल 1919 रोजी डायरने  एखादे मोठे बंड  होऊ शकते अशी शक्यता गृहीत धरून सर्व सभांवर बंदी घातली. याबाबतची सूचना व्यापकपणे प्रसारित केली गेली नव्हती, आणि अनेक ग्रामस्थ बागेत  बैसाखीचा भारतीय उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आणि सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु या दोन राष्ट्रीय नेत्यांना अटक आणि हद्दपार केल्याविरोधात शांतपणे निदर्शने करू लागले. डायर आणि त्याच्या सैन्याने बागेत प्रवेश केला आणि त्यांच्या मागचे  मुख्य प्रवेशद्वार रोखून धरले. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता एका उंच जागेवर चढून जवळपास दहा मिनिटे तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला, काही खुली प्रवेशद्वारे होती जिथून लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर दारूगोळ्याचा साठा पूर्ण संपेपर्यंत गोळीबार केला गेला. सुमारे 1,650 फैरी झाडण्यात आल्या. अनेक तरुण मुले यात मारली गेली  आणि फक्त दोन महिलांचे मृतदेह सापडले.  तीन महिन्यांनंतर मृत्यूंची मोजदाद करण्यात आली. हे  एक प्रचंड हत्याकांड होते आणि 1000 हून अधिक लोक मारले गेले. जखमींना वैद्यकीय सेवेच्या स्वरूपात कोणतीही मदत दिली गेली नव्हती. स्थानिक भारतीय डॉक्टरांनी उपचार केले.

रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध म्हणून 'सरदार '(नाईटहूड ) पदवीचा त्याग केला आणि महात्मा गांधींनी बोअर युद्धाच्या काळात  केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिशांनी दिलेली कैसर-ए-हिंद पदवी नाकारली.

पर्यटन मंत्रालय आपल्या विविध योजनांतर्गत पर्यटन पायाभूत विकास आणि सुविधांच्या विकासावर भर देत आहे. सध्या, जालियनवाला  बागचे नूतनीकरण, उन्नतीकरण केले जात आहे तसेच  स्मारकाच्या ठिकाणी संग्रहालय / गॅलरी उभारण्यात येत असून साऊंड अँड लाइट शो सुरू करण्यात येत आहे.

देखो अपना देश वेबिनार मालिका इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय  ई गव्हर्नन्स विभागाच्या तांत्रिक भागीदारीतून सादर केली जात आहे.  वेबिनारची सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured  वर आणि  भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1646493) Visitor Counter : 197