रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेमार्फत गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यात 5.5 लाखाहून अधिक मनुष्यदिन रोजगार निर्मिती

Posted On: 16 AUG 2020 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यात 5.5 लाखाहून अधिक मनुष्यदिन रोजगार निर्मिती केली आहे.

या योजने अंतर्गत प्रकल्पातील कामाची प्रगती व त्याद्वारे या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांना रोजगार निर्मितीच्या संधीवर रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या राज्यात सुमारे 2988 कोटी रुपये खर्चाचे सुमारे 165 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. 14 ऑगस्ट 2020 पर्यंत या अभियानामध्ये 11296 कामगार जोडले गेले असून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना 1336.84 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

राज्य सरकारबरोबर जवळून समन्वय स्थापित करण्यासाठी रेल्वेने प्रत्येक जिल्ह्यात तसेच राज्यांत नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. स्थलांतरितांना प्रकल्पात काम मिळण्याबरोबरच मोबदला मिळणे सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी विभागीय स्तरावर रेल्वे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रेल्वे कामांची रेल्वेने यादी केली आहे.  ही कामे म्हणजे (i) रेल्वे फाटकाला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम आणि देखभाल, (ii) रेल्वेमार्गालगतचे गाळयुक्त जलमार्ग, खंदक व नाल्यांची सफाई, (iii) रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या मार्गाचे बांधकाम व देखभाल, (iv) विद्यमान लोहमार्गांचे रुंदीकरण व दुरुस्ती (v) रेल्वेच्या जमिनीच्या सीमेवर झाडे लावणे आणि (vi) विद्यमान कठडे / पुलांची संरक्षण कामे.

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत टिकाऊ ग्रामीण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 50,000 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

125 दिवसांचे हे अभियान जलदगतीने राबविले जात आहे आणि 116 जिल्ह्यांमध्ये  25 प्रकारची कामे / उपक्रम बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान झारखंड आणि ओदिशा या सहा राज्यातील स्थलांतरित मजुरांच्या सहभागाने राबविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान 50,000 कोटी रुपयांची सार्वजनिक कामे हाती घेण्यात येत आहेत.

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646319) Visitor Counter : 214