पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

मानव- हत्ती यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी दीर्घकालीन आणि परिणामकारक तोडगा काढण्यास केंद्र सरकार कटिबद्ध :- केंद्रीय पर्यावरण मंत्री


जागतिक हत्ती दिनाच्या पूर्वसंध्येला “भारतातील मानव-हत्ती संघर्ष व्यवस्थापनाच्या उत्तम उपाययोजना” यावरील संकलन प्रकाशित

Posted On: 10 AUG 2020 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

‘मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वन्यप्राण्यांना जंगलातच अन्न आणि पाणी मिळेल, याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न अत्यंत वेगाने सुरु आहेत,’ अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जागतिक हत्ती दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

हत्ती आणि इतर प्राण्यांचे संरक्षण करण्यास भारत कटिबद्ध आहे, असे पर्यावरण मंत्री यावेळी म्हणाले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी एक व्यावहारिक, परिणामकारक आणि दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत,असेही त्यांनी सांगितले. वनविभागातील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यावर जावडेकरांनी भर दिला.

हे संघर्ष टाळणे आणि मानव तसेच प्राणी या दोघांचेही जीव वाचले जावे, यासाठी मानव-हत्ती सहजीवन अधिक दृढ करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. जावडेकर यांच्या हस्ते, भारतातील मानव-हत्ती संघर्ष व्यवस्थापनाच्या उत्तम उपाययोजना या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

या पुस्तिकेत, हत्तींची संख्या अधिक असलेल्या राज्यात, त्यांच्या व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपायोजनांची चित्रमय माहिती आहे. मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी काय करता येईल, याचेही उपाय आहेत.

यावेळी बोलतांना पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी देशात हत्तींची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हत्तींचे संरक्षण करणे आणि मानव हत्ती संघर्ष व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. निरपराध प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी, जावडेकर, बाबुल सुप्रियो आणि इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते मानव-हत्ती संघर्षविषयक पोर्टलच्या बेटा व्हर्जनचे उद्‌घाटन देखील झाले. ‘सुरक्षा’नावाच्या या राष्ट्रीय पोर्टलवर अद्ययावत माहिती आणि हे संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळू शकेल. यातून संकलित झालेल्या माहितीच्या आधारावर, धोरणकर्त्यांना हा संघर्ष टाळण्यासाठीची धोरणनिर्मिती आणि कृती आराखडा तयार करता येईल. सध्या या पोर्टलचे बेटा व्हर्जन सुरु करण्यात आले असून चाचण्या यशस्वी झाल्यावर, वर्षाखेरीस  देशभरासाठी हे पोर्टल उपलब्ध केले जाईल.

12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिन साजरा हित असून, जगभरात हत्तींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. हत्तींचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजनांचे आदानप्रदान व्हावे या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.

निसर्ग संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय महासंघ, IUCN  च्या लाल यादीत म्हणजेच धोकादायक स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आशियाई हत्तींचा समावेश करण्यात आला आहे. भारत वगळता आशियातील अनेक देशात, हत्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सध्या जगात 50,000  ते 60000 आशियाई हत्ती असून, त्यापैकी 60 टक्के हत्ती भारतात आहेत. भारतासाठी हत्ती हा नैसर्गिक वारसा प्राणी असून या दिवशी हत्तींच्या संवर्धन जनजागृती केली जाते.

या कार्यक्रमाला, पर्यावरण विभागाचे महासंचालक डॉ संजय कुमार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Best practices of Human-Elephant Conflict Management in Indiaपुस्तिकेसाठी येथे क्लिक करा

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644798) Visitor Counter : 436