आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

घटता मृत्यूदर लक्षात घेता व्हेंटीलेटर्सच्या निर्यातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Posted On: 01 AUG 2020 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

कोविड-19 संबंधी मंत्रीसमुहाने (जीओएम), केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा मेड इन इंडिया व्हेंटीलेटर्सच्या निर्यातीसंबंधीचा प्रस्ताव स्वीकारला असून त्याला मंजूरी दिली आहे. स्वदेशात निर्मित व्हेंटीलेटर्सच्या निर्यातीसंबंधी पुढील कार्यवाहीसाठी हा निर्णय विदेश व्यापार महासंचालकांना कळवण्यात आला आहे.

भारतातील कोविड-19 रुग्णांचा सातत्याने घटता मृत्यूदर पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मृत्यूदर 2.15% आहे, म्हणजे फार कमी सक्रीय रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. 31 जुलै 2020 रोजी देशभरात सक्रीय रुग्णांपैकी केवळ 0.22% रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. याव्यतिरिक्त, व्हेंटीलेटरच्या घरगुती उत्पादन क्षमतेतही भरीव वाढ झाली आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत सध्या 20 पेक्षा अधिक घरगुती व्हेंटीलेटर उत्पादक आहेत.

कोविड-19 चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्च 2020 मध्ये व्हेंटीलेटर निर्यातीवर प्रतिबंध / निर्बंध घालण्यात आले होते. 24 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या डिजीएफटी आदेश क्रमांक 53 अन्वये सर्व प्रकारच्या व्हेंटीलेटर निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. आता व्हेंटीलेटरच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आशा आहे की, भारतीय बनावटीचे व्हेंटीलेटर परदेशात नवीन बाजारपेठ शोधू शकतील.

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642902) Visitor Counter : 202