राष्ट्रपती कार्यालय

आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशातील पूरग्रस्त नागरिकांना मदतपुरवठा करण्याच्या रेड क्रॉस च्या अभियानाला राष्ट्रपतींनी दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 24 JUL 2020 1:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनातून रेड क्रॉस मदत संस्थेचे आठ ट्रक हिरवा झेंडा दाखवून पूरग्रस्त भागाकडे रवाना केले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन देखील उपस्थित होते. राष्ट्रपती, इंडियन रेड क्रॉस सोसायटी या मदत आणि पुनर्वसन सेवाभावी संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असतात.

हे मदत साहित्य दिल्लीहून आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशातील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत ट्रेनद्वारे पोहचवले जाणार असून त्या त्या राज्यातील रेड क्रॉस सोसायटीच्या शाखा त्याचे वितरण करतील.

या मदत साहित्यात, ताडपत्री, तंबू, साड्या, कपडे, पांघरूण, बादल्या आणि दोन जलशुद्धीकरण यंत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय, कोविडपासून संरक्षणासाठीचे साहित्य, जसे की सर्जिकल मास्क, पीपीई किट्स, हातमोजे, चेहरा झाकण्याची साधने यांचाही समावेश या साहित्यात आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीसाठी काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तसेच स्वयंसेवकांच्या संरक्षणासाठी हे साहित्य पाठवण्यात आले आहे.

इंडियन रेड क्रॉस सोसायटी सातत्याने पूरग्रस्त भागात मदतीचा पुरवठा करत असून त्याचाच भाग म्हणून हे अतिरिक्त साहित्य देखील आज पाठवण्यात आले. याआधीही सोसायटीद्वारे अशी मदत पूरग्रस्तांना वाटण्यात आली आहे.

यावेळी IRCS चे सरचिटणीस आर के जैन यांनी राष्ट्रपतींना संस्थेने पूरग्रस्त आणि कोविड-19 च्या काळात केलेल्या मदतकार्याची माहिती दिली. राष्ट्रपती सचिवालयातील आणि IRCS कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640859) Visitor Counter : 257