संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा सयंत्राचा शुभारंभ
Posted On:
23 JUL 2020 11:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2020
व्हाईस ॲडमिरल अनिल कुमार चावला, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएन, व्हीएसएम, एडीसी, ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, दक्षिणी नौदल कमांड यांनी आभासी परिषदेच्या माध्यमातून भारतीय नौदल अकादमी - एझिमाला येथील तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा संयंत्राचा शुभारंभ केला. राष्ट्रीय सौर मोहीमेच्या माध्यमातून 2022 सालापर्यंत 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टांतर्गत हे संयंत्र उभारण्यात आले आहे.
भारतीय नौदलाचे हे सर्वात मोठे सौरऊर्जा सयंत्र आहे. त्याचे अंदाजे जीवनमान 25 वर्षे इतके आहे. या संयंत्रात, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत कार्यक्षम अशा मोनोक्रिस्टलाइन सौर पॅनेल्ससह सर्वच घटक देशांतर्गत उत्पादित आहेत. केरळ राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळ लिमिटेड (KELTRON) तर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे.
मुसळधार पाऊस आणि कोविड–19 मुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही, केरळ राज्य विद्युत मंडळासह (केएसईबी) सर्व संबंधित संस्थांनी कोविड–19 शी संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करत या प्रकल्पाचे काम चालू ठेवले आणि हे काम पूर्ण केले.
एझिमाला येथील या सौर उर्जा प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल. स्वच्छ आणि हरीत पर्यावरणासाठी आयएनएने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक आहे. याद्वारे प्राप्त होणाऱ्या अतिरिक्त वीजनिर्मितीमुळे केएसईबी वीज ग्रीडलाही वीज मिळू शकेल.
* * *
U.Ujgare/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640831)
Visitor Counter : 214