वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वैश्विक स्थिरता, सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मजबूत हितसंबंधांद्वारे भारत-अमेरिका यांच्यातले व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ - पीयूष गोयल
भारत-अमेरिका सीईओ फोरम 2020 बैठकीचे आयोजन
Posted On:
15 JUL 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2020
भारत-अमेरिका सीईओ फोरमची बैठक दि.14 जुलै 2020 रोजी ‘टेलिफॉनिक कॉन्फरन्स’च्या माध्यामातून आयोजित करण्यात आली होती. भारत आणि अमेरिका सरकारच्यावतीने डिसेंबर,2014 मध्ये पुनर्रचनेनंतर अशा प्रकारच्या फोरम बैठकांचे आत्तापर्यंत पाच वेळा आयोजन करण्यात आले आहे. उभय देशांमध्ये व्यावसायिक संस्थांमध्ये केला जाणारा व्यवहार आणि होणारे कामकाज यादृष्टीने या फोरममध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाते. अशा प्रकारच्या कामकाजांसाठी प्रस्तुत फोरममुळे एक प्रभावी मंच उपलब्ध झाला आहे. या फोरममध्ये दोन्ही अर्थव्यवस्थांना एकमेकांच्या कामामध्ये सहकार्य करून कशा पद्धतीने लाभ मिळू शकेल, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या फोरमचा कसा उपयोग होवू शकेल, याचा प्राधान्याने विचार केला जातो.
या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर राॅस यांनी संयुक्तपणे भूषविले. उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी विभागाचे सचिव डॉ. गुरूप्रसाद महापात्रा, अमेरिकेतले भारतीय राजदूत तरनजीत संधू आणि भारतातले अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
सीईओ फोरममध्ये भारतातल्या आणि अमेरिकेतल्या प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीही सहभागी आहेत. या फोरमचे सहअध्यक्ष म्हणून टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि लाॅकहीड मार्टिनचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी जेम्स टायकलॅट कार्यरत आहेत. या दोन्ही देशांच्यावतीने सहअध्यक्षांनी याआधीच्या बैठकीमध्ये म्हणजे फेब्रुवारी 2019मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशींअनुसार सुधारणा करण्यासाठी आणि धोरणात्मक निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामांचे कौतुक केले. सीईओ फोरम सदस्यांनी संयुक्तपणे विचार-विनिमय करून ज्या सुधारणा सुचविल्या आहेत. त्या धोरणात्मक कार्यपद्धतीचा एक नवीन संच या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. यामुळे आरोग्य सेवा आणि औषधे, अंतराळ आणि संरक्षण, पायाभूत सुविधा आणि उत्पादन, उद्योजकता आणि लघु व्यवसायाला प्रोत्साहन देणे, ऊर्जा, जल आणि पर्यावरण, आयसीटी आणि डिजिटल पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधून त्यांना प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे.
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी कोविड-19 महामारीमुळे उत्पन्न झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले, याबद्दल भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, फोरमचे सह-अध्यक्ष, सदस्य यांना विशेष धन्यवाद दिले. ते म्हणाले, या महामारीमुळे औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि यासंबंधित सर्व साधनांची पुरवठा साखळी नियमित कार्यरत रहावी, यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य राखून उभय देशांचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वैश्विक स्थिरता, सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मजबूत हितसंबंधांद्वारे भारत -अमेरिका यांच्यातले व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ झाले असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये लहान व्यावसायिकांना विशेष महत्व असल्याचे सांगून या क्षेत्रामध्ये रोजगार आणि कौशल्यामध्ये वाढ करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. तसेच कोविडपश्चात संपूर्ण जगामध्ये एक नवीन मार्ग प्रस्थापित करण्यासाठी जे कार्य करावे लागणार आहे, त्यासाठी फोरमच्या माध्यमातून पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आग्रहपूर्वक सांगितले.
अमेरिकी सह-अध्यक्ष टायसलॅट यांनी कोविड-19 महामारीच्या काळात दोन्ही देशांमध्ये निरंतर सहकार्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी व्दिपक्षीय गुंतवणूक वाढविणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम यापुढेही सुरू राहील, असे सांगितले. त्यांनी विविध क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत करून अप्रतिबंधित विदेशी स्वामित्व, धोरणात्मक स्थिरता तसेच ज्या विषयी विवाद आहेत, त्या प्रश्नांवर उत्तरे शोधणे, बौद्धिक संपदेचे रक्षण करणे तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याविषयी मते मांडली.
भारतीय सह-अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी व्यापार संबंधाच्या विषयांवर वैश्विक पुरवठा साखळीचे पुन्हा संतुलन करण्यासाठी विश्वस्तरावर प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. त्याचबरोबर त्यांनी भारतासाठी अमेरिकेतल्या खासगी क्षेत्रांमध्ये आणि सरकारबरोबर सहकार्य करण्यासाठी मिळत असलेल्या संधींचे स्वागत केले. त्यांनी दोन्ही देशांमध्ये वृद्धिंगत होत असलेल्या वाणिज्यिक सहकार्यामुळे जी स्वाभाविक प्रगती साध्य होत आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे मुक्त व्यापार करारांमध्ये होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यांनी अमेरिकेच्या सरकारला आग्रह केला की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या मनुष्यबळ विकास स्त्रोतांच्या योगदानाबरोबरच भारतीयांच्या प्रतिभेला कोणतीही अडकाठी घालण्यात येवू नये, तसेच सीमा घालण्याशिवाय त्यांच्या प्रतिभेच्या आवश्यकतांचा स्वीकार करण्यात यावा.
राजदूत जस्टर यांनी भारत- अमेरिका यांच्यातल्या वाणिज्यिक संबंधांमध्ये आलेली विशालता, व्यापकता त्याचबरोबर कोविड काळामध्ये स्वकेंद्रित धोरणाचे संभाव्य धोके यांच्याकडे लक्ष वेधले. त्यांनी फोरमच्या प्रत्येक कार्यदलाने नीतिगत स्तरावर सूचना, शिफारसी करव्यात, असा आग्रह केला. या सल्ल्यांचा उभय पक्षांना स्वीकार करणे सहज शक्य व्हावे, तसेच त्यांची अंमलबजावणी करणेही सोपे असावे, असे त्यांनी नमूद केले.
राजदूत संधू यांनी खासगी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून परिवर्तन घडवून भारत-अमेरिका यांच्यामधल्या सामंजस्याला विषिष्ट रूप देण्यासाठी सीईओ फोरमच्यावतीने निभावण्यात येत असलेली महत्वपूर्ण भूमिका कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. यामध्ये आलेल्या अनेक शिफारसींमुळे धोरण निर्मात्यांना विविध सुधारणांना योग्य स्वरूप देण्यास मदत मिळत आहे, असे ते म्हणाले.
प्रारंभीच्या निवेदनानंतर वेगवेगळ्या कार्यदलांपैकी प्रत्येक कार्यदलाच्या सह-अध्यक्षांच्यावतीने विविध शिफारसी आणि सल्ले प्रस्तुत करण्यात आले. यात आरोग्य सेवा आणि औषध, अंतराळ, संरक्षण, पायाभूत सुविधा, उत्पादन, उद्योजकता आणि लहान व्यवसाय, ऊर्जा, जल आणि पर्यावरण, आयसीटी आणि डिजिटल पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा, व्यापार आणि गुंतवणूक ही क्षेत्रे होती.
कार्यदलांच्या सह-अध्यक्षांच्या निवेदनानंतर शेवटी डीपीआयआयटीचे सचिव महापात्रा यांनी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये अभूतपूर्व व्दिपक्षीय संबंध निर्माण झाल्याचे नमूद केले. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि संपर्क यंत्रणा या क्षेत्रामध्ये सातत्याने वेगाने व्यापक संबंध प्रस्थापित होत असल्याचे सांगितले.
उभय पक्षांच्या सरकारी प्रतिनिधींनी आणि सीईओंनी दोन्ही देशांच्या वाणिज्य आणि उद्योगांना लाभ देणासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांविषयी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी यावेळी सादर केलेल्या शिफारसींवर विचार करण्याबरोबरच कोविडपश्चात वैश्विक व्यवस्थेमध्ये व्दिपक्षीय सहभागिता वाढीसाठी आपआपसांमध्ये मिळून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638912)
Visitor Counter : 244