अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अन्न प्रक्रियेवरील डिजिटल इंडो-इटालियन बिझनेस मिशनला केले संबोधित, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उदयोन्मुख कल आणि वाढीच्या संधींबद्दल केली चर्चा
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्र्यांनी दोन्ही देशांना परस्पर लाभदायक अन्न प्रक्रिया क्षेत्रातील प्रमुख विभाग केले अधोरेखित
Posted On:
15 JUL 2020 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2020
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज अन्न प्रक्रियेवरील डिजिटल इंडो-इटालियन बिझिनेस मिशनच्या आभासी उद्घाटन सत्राला संबोधित केले. दोन दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल परिषदा, व्यापार मेळावा आणि विविध उद्योगांच्या बैठका होणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीत अन्न प्रक्रिया क्षेत्राची भूमिका अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, उद्योगाच्या स्वरूपात बदलाच्या पार्श्वभूमीवर अनेक अन्न प्रक्रिया कंपन्या आपल्या उत्पादनामध्ये वैविध्य आणण्याचा आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या कि बहुउद्देशीय उपकरणे जी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करू शकतात अशा कंपन्यांना त्यांच्या सुविधांमध्ये कोणतेही मोठे बदल न करता त्यांचे उत्पादन वाढवण्यास परवानगी देण्याला प्राधान्य दिले जाईल. इटालियन खाद्य आणि उपकरणे संबंधित कंपन्यांना त्यांची जागतिक व्याप्ती वाढवण्यासाठी भारतीय बाजारपेठेकडे वळणे गरजेचे असल्यावर त्यांनी भर दिला. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत भारत आणि इटली नैसर्गिक भागीदार आहेत आणि युरोपीय महासंघात इटलीमध्ये भारतीय समुदाय मोठ्या संख्येने आहे असे बादल म्हणाल्या.
बादल यांनी संभाव्य बाजारपेठ म्हणून भारताच्या भूमिकेवर भर दिला. रेडी टू ईट, फ्रोजन फूड, सुपरफूड, न्यूट्रस्युटिकल्स यांसारखी महत्वपूर्ण क्षेत्र उदयाला येत असून अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संधींच्या नव्या युगावर त्यांनी भर दिला.
बादल पुढे म्हणाल्या की,अनेक देश त्यांची पुरवठा साखळीची पुनर्र्चना करण्याच्या विचारात आहेत आणि जगातील फळ आणि भाजीपाल्याचा पुरवठादार म्हणून ओळखला जाणारा भारत कच्चा माल पुरवण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देत आहे. तयार प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांसाठी वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत एक आहे. महामारीची स्थिती हाताळण्याच्या आमच्या अनुभवावरून असे दिसून येते की अन्न प्रक्रिया उद्योग हे एक महत्वपूर्ण क्षेत्र म्हणून उदयाला आले आहे असे त्या म्हणाल्या.
डिजिटल क्षेत्रीय बिझिनेस मिशनबद्दल बोलताना बादल म्हणाल्या की, या डिजिटल मिशनचा एक भाग असलेल्या 23 इटालियन कंपन्यांचे उत्पादन व सेवांचे आभासी प्रदर्शन असून ग्राहक तसेच भारतातील अन्य उद्योगांबरोबर (बी 2 बी) बैठक घेणार आहेत. फळे आणि भाजीपाला, तृणधान्ये, दूध आणि दुग्ध प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बॉटलिंग यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये बैठका आणि वेबिनारचे आयोजन केले जाईल तसेच मेगा फूड पार्कमध्ये असलेल्या कारखान्यांबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी संधी उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. भारत आणि इटली या दोन्ही देशांमधील संघटनांच्या सहभागामुळे संस्थागत संपर्क सुनिश्चित होईल असे त्यांनी सांगितले.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने मेगा फूड पार्क, कृषी निर्यात क्षेत्र आणि औद्योगिक पार्क / वसाहत / समूह / नोड्स यांसारख्या तयार पायाभूत सुविधांच्या रूपात विविध संधी उपलब्ध करून दिल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. पीएमकेएसवाय, पीएम एफएमई यासारख्या योजनांचा तपशील आणि आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत अलिकडेच करण्यात आलेल्या घोषणांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
त्यांनी भारत आणि इटली मधील सर्व सहभागींना कार्यक्रमाच्या यशस्वी फलश्रुतीसाठी शुभेच्छा दिल्या. अन्न प्रक्रिया क्षेत्रात भारत इटलीबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक आहे, ज्यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असे त्या म्हणाल्या.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638873)
Visitor Counter : 159